मुंबई: ‘ओमेगा’ या नामांकीत विदेशी कंपनीच्या घड्याळांचा परस्पर अपहार करणार्या 47 वर्षीय कर्मचार्याला बोरिवली पोलिसांनी 48 तासांत अटक केली. आरोपी

मुंबई: ‘ओमेगा’ या नामांकीत विदेशी कंपनीच्या घड्याळांचा परस्पर अपहार करणार्या 47 वर्षीय कर्मचार्याला बोरिवली पोलिसांनी 48 तासांत अटक केली. आरोपीने सुमारे 27 लाख रुपयांच्या घड्याळांचा अपहार केला होता. त्यातील सुमारे 20 लाख रुपयांची घड्याळे हस्तगत करण्यात बोरिवली पोलिसांना यश आले आहे. बोरिवली येथील स्वीस पॅराडाईज या घड्याळाच्या शोरुममध्ये काम करणारा कर्मचारी सुरेशभाई बाबुभाई राठोड (47) याच्याकडे ओमेगा कंपनीची चार वेगवेगळी महागडी घड्याळे ग्राहकांना वितरीत करण्यासाठी देण्यात आली होती. त्याने घड्याळांचे वितरण न करता ती स्वतः कडेच ठेवली आणि तो पसार झाला होता. याप्रकरणी बोरिवली पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर पोलिसांनी अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक निनाद सावंत, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेश कदम व त्यांच्या पथकाने याप्रकरणी तपासाला सुरूवात केली. आरोपी राठोडचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केला असता त्याचा कोणताही थांगपत्ता लागत नाही. अखेर तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी बोरिवली पश्चिम येथील गोराई परिसरातील हॉटेलमधून त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी त्याची चौकशी केली असता त्यानेच घड्याळांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले. अखेर त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली. आरोपीकडून तीन महागडी घड्याळे हस्तगत करण्यात आली असून त्यांची किंमत 19 लाख रुपये आहे. आरोपीने एकूण 26 लाख 81 हजार रुपयांच्या घड्याळांचा अपहार केला आहे. आरोपीने यापूर्वीही घडाळांचा अपहार केला आहे का, याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.
COMMENTS