कारागृह पोलिस शिपाई परीक्षेत नगरच्या दोन केंद्रांवर गैरप्रकार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कारागृह पोलिस शिपाई परीक्षेत नगरच्या दोन केंद्रांवर गैरप्रकार

अहमदनगर/प्रतिनिधी : कारागृह पोलिस शिपाई भरतीसाठी नगरला दोन दिवसांपूर्वी झालेल्या परीक्षेच्यावेळी काही गैरप्रकार झाले. एकाने डमी परीक्षार्थी बसवला तर

भूतबाधा काढण्यासाठी घेतले आठ हजार रुपये; नगरच्या वैदूवाडीत अंधश्रद्धेचा प्रकार
बोअरवेलमध्ये पडलेल्या सागरला वाचवण्यात अपयश
डंपरच्या चाकाखाली येऊन चार वर्षाच्या चिमूर्डीचा मृत्यू

अहमदनगर/प्रतिनिधी : कारागृह पोलिस शिपाई भरतीसाठी नगरला दोन दिवसांपूर्वी झालेल्या परीक्षेच्यावेळी काही गैरप्रकार झाले. एकाने डमी परीक्षार्थी बसवला तर एकाने प्रश्‍नपत्रिकेचा मोबाईलमध्ये फोटो काढून व्हॉटस अ‍ॅप ग्रुपवर पाठवला आणि कानातील मायक्रो स्पीकरद्वारे उत्तरे ऐकत प्रश्‍नपत्रिका सोडवत होता, हे दोन्ही प्रकार उघडकीस आल्याने तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारागृह पोलिस पदासाठी अहमदनगर येथे झालेल्या लेखी परीक्षेमध्ये एका बहाद्दराने मोबाईलच्या सहाय्याने कॉपी केली तर दुसर्‍याने परीक्षेला डमी उमेदवार बसविल्याचे उघड झाले. या दोघांवर व त्यांना सहकार्य करणारांवर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारागृह पोलिस या पदासाठी शनिवारी (दि.11) रोजी परीक्षा घेण्यात आल्या. यावेळी नगर शहरातील दोन परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार करताना दोघांना पोलिस व पर्यवेक्षकांच्या सावधगिरीमुळे पकडण्यात आले.
सिद्धीबागेनजिक असणार्‍या दादासाहेब रुपवते विद्यालय परीक्षा केंद्रावर गणेश सुरेश भवर (रा. टाकळी कदीम, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) याने तोतया (डमी) उमेदवार म्हणून निलेश कमल सुंदरदंडे याला परीक्षेत बसविल्याचे निदर्शनास आले. परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यालयाच्या प्रवेशद्वारामध्येच परीक्षा ओळखपत्र तपासणीत हा संशय आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला थांबण्यास सांगितले. पण, यावेळी गर्दीचा फायदा घेऊन निलेश सुंदरदंडे पळून गेला. त्यानंतर परीक्षा समन्वयकांनी वास्तव उमेदवार गणेश भवर याला पकडले. या दोघांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक नितीन शिवराम खैरनार यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक भान्सी करत आहेत. दुसरी घटना रेसिडेन्शिअल विद्यालयामध्ये झाली. विकास बारवाल (रा. नांदी, ता. आंबड, जि. जालना) या बहाद्दराने चप्पलमध्ये मोबाईल हॅण्डसेट आणला होता व कानामध्ये मायक्रो स्पीकर लपवला होता. त्याच्या बॅगेमध्ये एका डिव्हाईस होता. त्या डिव्हाईसच्या माध्यमातून तो ऐकता होता. त्याने त्याच्या मोबाईलवरून प्रश्‍नपत्रिकेचा फोटो काढला. तो फोटो एका व्हॉटसअप ग्रुपमध्ये पाठविला. त्या ग्रुपमध्ये अन्य दोनजणांचा समावेश होता. तो मोबाईलवरून फोटो पाठवत असल्याचे पर्यवेक्षिका वर्षा विजयकुमार परदेशी यांच्या निर्दशनास आले. त्यांनी ही माहिती परीक्षा समन्वयक कैलास गोरे यांना दिली. यानंतर पंचांसमक्ष त्याची तपासणी करण्यात आली. त्याच्याजवळील मोबाईल हॅण्डसेट, सीमकार्ड, डिव्हाईस, मायक्रो स्पीकर जप्त करण्यात आले. शहर विभागाचे प्रभारी पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. या दाखल गुन्ह्यांचा तोफखाना पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी या तपास करीत आहेत. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. बारवाल याने मोबाईलद्वारे प्रश्‍नपत्रिकेचे तीन फोटो काढून व्हॉट्सअ‍ॅपद्वारे ‘राजपूत डीमेंट’ या ग्रुपवर टाकले होते. पर्यवेक्षकांच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिसात माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (ड), महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परिक्षांमध्ये होणार्‍या गैरप्रकारास प्रतिबंध अधिनियम 1982 चे कलम 7, भादवि कलम 417 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS