लातूर प्रतिनिधी - उदगीर- लातूर महामार्गावर थांबलेल्या एसटी महामंडळाच्या ‘लालपरी’ला पाठीमागून भरधाव इनोव्हा कार धडकल्याची घटना डिग्रस पाटी येथे बु
लातूर प्रतिनिधी – उदगीर- लातूर महामार्गावर थांबलेल्या एसटी महामंडळाच्या ‘लालपरी’ला पाठीमागून भरधाव इनोव्हा कार धडकल्याची घटना डिग्रस पाटी येथे बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातात कारचा चेंदामेंदा झाला असून, एक जागीच ठार तर सहा गंभीर जखमी झाले आहे. जखमींना तातडीने उदगीर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. याबाबत उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांनी सांगितले, उदगीर येथून लातूरच्या दिशेने निघालेली एस.टी. महामंडळाची बस (एमएच 24 एयू 7972) डिग्रस पाटी येथे तिकीट तपासणीसाठी थांबविण्यात आली होती. दरम्यान, पाठीमागून भरधाव येणार्या इनोव्हा कारने (एमएच 02 एक्यू 7868) थांबलेल्या बसला जोराची धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, कारचा पार चेंदामेंदा झाला. या कारमधून प्रवास करणार्या सातपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला असून, इतर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उदगीर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा अपघात बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास उदगीर-लातूर महामार्गावरील डिग्रस पाटी येथे घडला. अपघाताची माहिती मिळताच उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सुमेध बनसोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. माजी राज्यमंत्री आ. संजय बनसोडे हे उदगीर येथून लातूरच्या दिशेने बुधवारी दुपारी निघाले होते. दरम्यान, वाटेत डिग्रस पाटी येथे अपघात झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी आपले वाहन घटनास्थळी थांबवून अपघाताची पाहणी केली. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेले पोलिस अधिकारी, संबंधितांना उपचाराबरोबरच मदतीसाठी त्यांनी सूचना केल्या.
COMMENTS