मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर खळबळ उडाली असून, शरद पवार यांनी अध
मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर खळबळ उडाली असून, शरद पवार यांनी अध्यक्षपदावर कायम राहावे अशी मागणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सातत्याने करतांना दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पवारांनी गुरूवारी कार्यकर्त्यांना संबोधित करतांना म्हटले आहे की, तुमच्या भावनांचा आदर करून, दोन दिवसांत अंतिम निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करतांना ते बोलत होते.
यावेळी बोलतांना पवार म्हणाले की, तुम्हाला बोलूनच निर्णय घ्यायला हवा होता. परंतु, तो मी घेतला नाही. मात्र, तुम्हाला विचारून निर्णय घेतला असता तर तुम्ही तो घेऊ दिला नसता अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली आहे. त्याचवेळी ते असही म्हणाले की, तुम्ही जी भूमिका घेतली आहे त्याचा विचार करून दोन ते तीन दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल. तुम्हाला असे बसण्याची वेळ येणार नाही. तसेच, जो काही निर्णय होईल तो आपल्या भावनांचा आदर करूनच घेतला जाईल असा शब्द पवार यांनी जमलेल्या कार्यकर्त्यांना यावेळी दिला आहे.
आता हा जो निर्णय घेतला, त्यासाठी महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा अनेक तुमचे सहकारी या ठिकाणी आले. माझ्याशी त्यांना बोलायचे आहे. माझी आणि त्यांची भेट संध्याकाळी होईल, ती झाल्यानंतर तुमच्या सर्वांची जी भावना आहे, ती नजरेसमोर ठेऊन आणि बाहेरुन आलेल्या सहकार्यांना विश्वासात घेऊन अंतिम निर्णय एक ते दोन दिवसांत करण्याची भूमिका घेऊ. पण ती घेत असताना कार्यकर्त्यांच्या मनातील भावना दुर्लक्षित केली जाणार नाही, एवढचे सांगतो, असा शब्द पवारांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला आहे.
कार्याध्यक्षपदाची होणार निर्मिती ? – राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते शरद पवारांनी घेतलेल्या या पवित्र्यामुळे शरद पवार अध्यक्षपदी कायम राहण्याची शक्यता असून, पक्षात मात्र कार्याध्यक्ष पदाची निर्मिती करण्यात येणार असल्याचे समजते. आणि या पदावर सुप्रिया सुळे यांची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
COMMENTS