दोन लाखांहून अधिक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा आस्वाद 300 क्विंटल ज्वारीच्या भाकरी, 500 क्विंटल मिश्र भाजीची निर्मिती तामसा । प्रतिनिधी तामसा येथी

दोन लाखांहून अधिक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा आस्वाद
300 क्विंटल ज्वारीच्या भाकरी, 500 क्विंटल मिश्र भाजीची निर्मिती
तामसा । प्रतिनिधी
तामसा येथील ऐतिहासिक बारालिंग देवस्थानच्या पारंपरिक भाजी-भाकरी महाप्रसादाचा सोहळा यावर्षीही मोठ्या थाटात आणि भक्तिभावात पार पडला. पंचक्रोशीसह विविध जिल्हे व राज्यातून आलेल्या सुमारे दोन लाखांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
मकर संक्रांतीच्या ‘करी’ दिनी म्हणजेच गुरुवार, दि. 15 जानेवारी रोजी पहाटे बारालिंग महादेवाचा अभिषेक, भजन, पूजन व महाआरतीनंतर नैवेद्य अर्पण करण्यात आला. सकाळी दहा वाजल्यापासून रांगेतून भाजी-भाकरीच्या महाप्रसादाचे वितरण सुरू झाले. दिवसभर हा भक्तिभावाचा सोहळा सुरू होता. बारालिंग देवस्थानातील भाजी-भाकरी महाप्रसादाची परंपरा पावणे दोनशे वर्षांहून अधिक जुनी आहे. मंदिराचे पुजारी रेवण महाराज कंठाळे यांचे पूर्वज महादलिंग महाराज कंठाळे यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने ही परंपरा सुरू केली होती. आजही तामसेकर तीच परंपरा तितक्याच निष्ठेने जपत आहेत. यंदा पानभाज्या, फुलभाज्या, फळभाज्या, शेंगभाज्या व मूळभाज्या अशा विविध प्रकारच्या भाज्यांचा समावेश असलेली नैसर्गिक व आयुर्वेदिक मिश्र भाजी तयार करण्यात आली होती. भाजीसाठी तेल व मसाल्याचा वापर न करता, गुळवणाच्या दोन मोठ्या कढईत दिवसभर भाजी शिजवण्यात आली. हजारो स्वयंसेवक या सेवेत सहभागी झाले होते. एक भाकरी व त्यावर भाजी असा महाप्रसाद शिस्तबद्ध रांगेतून वाटप करण्यात आला. या सोहळ्यासाठी मंदिर समितीचे अध्यक्ष संतोष निलावार, रमेश घंटेलवार, रवी बंडेवार, दिलीप बाष्ठेवाड, सुभाष धरमुरे, सुरेश देशमुख, गणपत हनवते, बंडू बंडेवार यांच्यासह तामसेकरांनी मोठे परिश्रम घेतले. सुरक्षेच्या दृष्टीने तामसा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शहादेव खेडकर, हदगावचे पोलीस निरीक्षक संकेत दिघे, फौजदार बालाजी नरोटे, रामेश्वर कत्ते, एएसआय अशोक शिंगणवाड, बीट जमादार श्यामसुंदर नागरगोजे, डीएसबी प्रमुख प्रकाश कबले तसेच पोलीस मित्र संघटना (नवी दिल्ली) चे 110 पोलीस मित्र यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
यावर्षी 300 क्विंटलपेक्षा अधिक ज्वारीच्या भाकरी व 500 क्विंटलपेक्षा अधिक मिश्र भाजी तयार करण्यात आली.
ग्रामपंचायत सदस्य साहेबराव देशमुख यांनी 5 क्विंटल ज्वारीच्या भाकरी दिल्या, तर सारंग लाभशेटवार यांनी 5 हजार पाण्याच्या बाटल्या तसेच फिल्टर पाण्याची अमर्याद सुविधा उपलब्ध करून दिली. भाजी-भाकरी महाप्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर, भास्कर वानखेडे, कृष्णा पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, संभाजी लांडगे, भाजपाचे भागवत देवसरकर, गटविकास अधिकारी आडेराघो, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपीकृष्ण पाटील, डॉ. राम मुसांडे, कार्यकारी अभियंता संजय शिंदे यांच्यासह अनेक राजकीय व सामाजिक मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS