पुन्हा एक पॅट्रिओट !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

पुन्हा एक पॅट्रिओट !

 पॅट्रिओट अर्थात देशभक्त नावाची एक इंग्रजी कविता शालेय अभ्यासक्रमात होती. ज्या कवितेचा आशय होता की, एकेकाळी देशाने देशभक्त म्हणून ज्याच्यावर जिवापाड

शरद पवारांना एनडीएत आणण्याचा होता डाव
नूतन गुजराती समाजाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करुन नागरिकांचे लसीकरण
कंत्राटी वीज कर्मचार्‍यांचे राज्यभर आंदोलन

 पॅट्रिओट अर्थात देशभक्त नावाची एक इंग्रजी कविता शालेय अभ्यासक्रमात होती. ज्या कवितेचा आशय होता की, एकेकाळी देशाने देशभक्त म्हणून ज्याच्यावर जिवापाड प्रेम केलं होतं, अशा नेत्याची परिस्थिती बदलते अन् तीच जनता त्याला वधस्तंभाकडे जाताना दगडगोटे मारते. एका इंग्रजी कविची ती कविता त्यावेळी न पटण्यासारखी आणि निखालस काल्पनिक अशी वाटे. परंतु, आता श्रीलंकेचे महिंदा राजपक्षे यांची अवस्था पाहिली तर त्या कवितेची यथार्थता नुसती जाणवत नाही, तर, वास्तवदर्शी ठरते, हे आज प्रकर्षाने जाणवते आहे. एकेकाळी ब्रिटीशांनी त्यांच्या चहा मळ्यात काम करण्यासाठी भारतातून मजूर श्रीलंकेत नेले होते. पुढे ब्रिटिश जसे भारत सोडून गेले तसे श्रीलंकेलाही सोडून गेले. त्यानंतर ते भारतीय मजूर जे प्रामुख्याने तामिळनाडू या राज्यातून नेले होते, त्यांची तेथे प्रचंड मोठी वसाहत निर्माण झाली. जाफना बेटाकडे वसलेली ही वसाहत तमिळी म्हणून ओळखली जाऊ लागली होती. नवस्वतंत्र झालेल्या श्रीलंकेत उपरे ठरलेल्या तमिळींनी आपल्यासाठी अधिकार मागण्याची आंदोलने केली आणि बरेच अधिकार पदरी पाडून घेतले. पण त्याच तमिळींमध्ये स्वतंत्र तमिळ राष्ट्र मागणारे एक आक्रमक आणि हिंसक नेतृत्व व्ही. प्रभाकरन् नावाने उभे राहिले आणि त्याने आपल्या प्रचंड हिंसक संघटनेतून संपूर्ण तमिळ समाज बेचिराख करून घेतला.        तमिळी हे प्रामुख्याने तामिळनाडू राज्यातील मागासवर्गीय म्हणजे एससी, एसटी, ओबीसी या प्रवर्गातून होते. त्यामुळे, त्यांना भारतीय उच्चजात वर्गाची सहानुभूती असण्याचे कारण नव्हतेच. त्यामुळे त्यांचे शांततेच्या नावाने शिरकाण करण्यासाठी भारतीय मुत्सद्दींनी शांती सेना श्रीलंकेत पाठवली आणि येथूनच पुढे अनेक श्रीलंकन नेत्यांसह राजीव गांधींच्या खूना पर्यंत अनेक क्रोर्याच्या परिसिमा गाठणाऱ्या घटना प्रभाकरनच्या नेतृत्वाखाली घडवल्या गेल्या. याच कारणास्तव तमिळ विरूद्ध सिंहली ही उभी शत्रूत्वाची दरी पडली. यातूनच तमिळींचे शिरकाण घडवून आणणारे नेतृत्व श्रीलंकेच्या तमिळी जनतेने निवडले. हे नेतृत्व म्हणजे महिंदा राजपक्षे. जगातील सर्वात हिंसक संघटन असलेल्या लिट्टे शी चर्चेची मध्यस्थी करण्यासाठी जगातील सर्वाधिक शांततावादी आणि एकही तुरूंग नसलेला नाॅर्वे सारखा देश बोलणी करत असतानाही राजपक्षे यांनी प्रभाकरन् याच्यासह तमिळींचा वंशसंहार घडवला. यातूनच लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान झालेले राजपक्षे सत्तेने बेभान झाले होते. देशातील शांतता आणि सद्भावना पूर्ववत करावी या हेतूने जनतेने पसंतीक्रम दिलेले राजपक्षे यांच्यासारखे नेतृत्व इतक्या हवेत गेले की, त्यांनी देशच लुटायला सुरूवात केली. आख्खी राजपक्षे खानदान सत्तेवर विराजमान झाली आणि श्रीलंकेचे होत्याचे नव्हते म्हणजे पूर्णपणे वाटोळे करून टाकले. आजच्या श्रीलंकेत उद्भवलेल्या परिस्थितीचे ही मुख्य कारणे आहेत. जे महिंदा राजपक्षे एकेकाळी श्रीलंकेच्या लोकांचे परमप्रिय नेतृत्व होते, त्याच नेतृत्वावर आज जनतेच्या हिंसक आंदोलनामुळे परांगदा होण्याची पाळी आली आहे. याठिकाणी पॅट्रिओट अर्थात देशभक्त नावाची ती कविता किती सार्थक ठरते हे आपणांस जाणवल्यावाचून राहत नाही. श्रीलंकेची जनता ही समयसूचक निर्णय घेते. हेच भारताच्या जनतेचे वैशिष्ट्ये आहे. आणीबाणीच्या काळानंतर भारतीय जनतेने हा सुज्ञपणा दाखवून दिला होता. श्रीलंकेत निर्माण झालेली आर्थिक अवस्था ही अतिशय भीषण स्वरूपाची आहे. यातून देशाला यशस्वीपणे बाहेर काढणारे नेतृत्व श्रीलंकन जनता मिळवेलच कारण विचाराने जनता नेहमीच प्रगल्भ असते. फक्त काही राजकारण्यांना त्याचे आकलन होत नाही एवढेच!

COMMENTS