पाच रुपयांचा मास्क पंधराला, तर दीड हजाराचा पलंग साडेसात हजाराला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाच रुपयांचा मास्क पंधराला, तर दीड हजाराचा पलंग साडेसात हजाराला

अहमदनगर/प्रतिनिधी : महापालिकेने केलेल्या कोरोना निधी खर्चात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप येथील जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष डॉ. सुहासभाई मुळेंनी केला आहे

दिलीप कुडके यांचा पाथरवट समाजाच्या वतीने गौरव
मनपाचे प्रभाग अधिकारी पैसे घेऊन सेटलमेंट करतात : शिवसेना नगरसेवक शिंदेंचा आरोप
ज्योती सहकारी पतसंस्थेचा ३६४ कोटींचा एकत्रित व्यवसाय ऍड : रविकाका बोरावके

अहमदनगर/प्रतिनिधी : महापालिकेने केलेल्या कोरोना निधी खर्चात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप येथील जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष डॉ. सुहासभाई मुळेंनी केला आहे. पाच रुपयांचा मास्क पंधरा रुपयांना तर, बाराशे ते पंधराशे रुपयांचा पलंग साडेसात हजारांना दाखविण्यात आला असून पलंग-गाद्या खरेदीतही मोठा भ्रष्टाचार झाला आहे व या बिलांवर आयुक्त शंकर गोरे यांनी दबावाखाली स्वाक्षरी केल्याचा गंभीर आरोपही डॉ. मुळे यांनी केला. दरम्यान, मनपा आरोग्य सेवकांना मागील तीन महिन्यांपासून थकीत पगार मिळालेला नाही व दुसरीकडे कोरोना निधीतून अव्वाच्या सव्वा दराने साहित्य खरेदी झाल्याने आयुक्तांच्या दालनाला टाळे ठोकून जाब विचारण्याचा इशाराही डॉ. मुळेंनी दिला आहे.
याबाबत मुळे यांनी सांगितले की, करोनासाठी मनपाला आलेल्या निधीतून आजपर्यंत किती रक्कम खर्च झाली आहे, यासाठी माहिती अधिकारात अर्ज देत आहे. पलंग, गाद्या खरेदीत प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. पंधराशे रुपयाचा पलंग साडेसात हजार रुपयांना दाखविण्यात आलेला आहे. पाच रुपयांचा मास्क पंधरा रुपयाला लावलेला आहे. त्यामुळे तातडीने कोरोनाच्या निधीतून केलेल्या साहित्य खरेदीची माहिती द्यावी तसेच करोनासाठी बजेटची व निधीची ठोस तरतूद करून अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही, याची तजवीज करावी आणि येत्या 31 डिसेंबरपर्यंत आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांच्या पगाराचा पेच सोडविला नाही तर आयुक्तांच्या दालनाला व आस्थापना कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा डॉ. मुळे यांनी दिला आहे.
यासंदर्भात डॉ. मुळे यांनी मनपा आयुक्त गोरे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, मनपात आरोग्य सेवकांच्या पगाराबाबत तसेच कोरोना निधीबाबत प्रचंड सावळागोंधळ सुरू आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी तीन महिन्याचा पगार थकविला म्हणून आरोग्य सेवकांसमवेत तीव्र आंदोलन करावे लागले होते. तेव्हा कुठे दिवाळी झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी या आरोग्य सेवकांचे पगार झाले होते. आतादेखील दिवाळीच्या पगारानंतर आता पुन्हा तीन महिन्यांचा त्यांचा पगार थकविण्यात आला आहे. दुसरीकडे मनपात 2-2 आरोग्य अधिकारी कागदोपत्री अजूनही कार्यरत असून, विविध आरोपाखाली सक्तीच्या रजेवर पाठवलेले आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना मागील सहा महिन्यापासून दीड लाख रुपये प्रतिमाहप्रमाणे घरी बसून फुकट पगार दिला जात आहे. त्यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशीही केली जात नाही, अहवालही दिला जात नाही व कारवाईदेखील होत नाही. डॉ. बोरगे हे घरी बसून मागील सहा महिन्यापासून पगार घेत आहेत. तर दुसरीकडे दिवस-रात्र काम करणार्‍या आरोग्य सेवकांचे पगार मात्र तीन-तीन महिने थकवले जात आहेत. त्यामुळे डॉ.बोरगे यांना दिलेल्या फुकट पगाराची रक्कम आपल्या व प्रशासनाच्या पगारातून वसूल करण्यासाठी आम्ही दावा दाखल करणार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला.

नगरची एकमात्र महापालिका
14 व्या वित्त आयोगातील निधी कोरोनाच्या खर्चासाठी वापरण्यात यावा, असे निर्देश आहेत. परंतु, आरोग्य सेवकांच्या पगारातून कुठलेही कमिशन मिळत नसल्यामुळे त्याकडे प्रशासन, सत्ताधारी आणि विरोधक देखील सोयीस्करपणे डोळेझाक करत आहेत. सर्वांनी मिळून 14व्या वित्त आयोगाचा लाखो रुपयांचा मिळालेला निधी अगोदरच न ठरलेल्या आणि कधी न होणार्‍या विकास कामांसाठी टेंडरमध्ये टक्केवारी कमिशन मिळत असल्यामुळे खतवून ठेवल्यामुळे शासनाचा आदेश धुडकावून कोरोना निधीमधील एक रुपया देखील वापरायची तजवीज ठेवली गेली नाही, असा प्रकार करणारी आपली एकमात्र मनपा असेल, असे उद्वेगजनक भाष्य निवेदनात डॉ. मुळे यांनी केले आहे. त्यामुळे एका आरोग्य अधिकार्‍याला मागील सहा महिन्यापासून घरी बसून दहा लाख रुपये फुकट पगार देणार्‍या परंतु तळहातावर जीव घेऊन प्रामाणिकपणे काम करणार्‍या आरोग्य सेवकांचा तीन महिन्यांचा थकित पगार थकवणार्‍या आयुक्त व आस्थापना कार्यालयाला टाळे लावून बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सतत कोविडच्या व्यवस्थापनेमधील आरोग्य अधिकारी अडचणीत येतात, आरोग्य अधिकार्‍याचे काम आरोग्य यंत्रणा सांभाळणे हे असून आरोग्य सेवकांचे पगार भीक मागून आणणे किंवा खिशातून देणे हे त्याचे काम नाही. त्यामुळे ही पगाराची जबाबदारी सतत आरोग्य अधिकार्‍यांवर व आस्थापनावर आयुक्तांनी ढकलू नये. आस्थापनामधली मंडळी हा सगळा निधी खतवून ठेवल्याचे सांगून हात वर करून मोकळे होतात. वास्तविक हा चौदाव्या वित्त आयोगाचा निधी लाखो रुपये मागील वर्षांपासून बँकेत पडूनच राहिलेला असल्यामुळे त्यावर पुन्हा लाखो रुपये व्याज जमा झाले आहे, परंतु केवळ खतवलेल्या कामाच्या कमिशनच्या लोभापोटी हे पैसे वाळवीलागेपर्यंत तसेच राहणार आहेत, अशी खंतही डॉ. मुळे यांनी व्यक्त केली.

आरोग्य कर्मचारी हवालदिल
ऐन दिवाळीच्या दिवशी आंदोलन केल्याने आरोग्य सेवकांचा तीन महिन्याचा पगार त्यावेळी मनपाला द्यावा लागला, पण त्यानंतर तीन महिने पुन्हा त्यांचे पगार थकल्याने ते हवालदिल झाले आहेत, असे सांगून डॉ. मुळे म्हणाले, शुक्रवारी सकाळी दहा-पंधरा आरोग्य कर्मचारी त्यांची कर्मकहाणी मांडत होते, त्यापैकी एकजण बोल्हेगावला भाडोत्री खोली घेऊन राहत असून त्याचे सामान शुक्रवारी सकाळीच त्याच्या घरमालकाने बाहेर काढले, कारण सतत पगार होत नाही व तो भाडे देऊ शकत नाही, असे तो रडून डोळ्यात पाणी आणून सांगत होता, आई-वडिलांना देखील तो पैसे पाठवू शकत नाही. किमान या कर्मचार्‍यांच्या वेदनांची दखल तरी मनपाने घ्यायला हवी, अशी भावनाही डॉ. मुळेंनी व्यक्त केली.

COMMENTS