कोपरगाव प्रतिनिधी ः आपल्याला ज्ञानाचा खजिना हा पुस्तक वाचनातून मिळत असतो; परंतु सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात माणूस यंत्रवत होत चालला अस

कोपरगाव प्रतिनिधी ः आपल्याला ज्ञानाचा खजिना हा पुस्तक वाचनातून मिळत असतो; परंतु सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात माणूस यंत्रवत होत चालला असून, वाचन संस्कृती कमी होत चालली आहे. ‘वाचाल तर वाचाल, ज्ञान मिळवाल,तर यशस्वी व्हाल’ हा विचार आजच्या काळात खूप महत्त्वाचा असून, वाचन संस्कृती टिकवण्यासाठी आपल्या घरात इतर सुखसोयीबरोबरच लायब्ररी असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांनी केले.
कोपरगाव येथे नाते शब्दांचे साहित्य मंचच्या वतीने तिसरे राज्यस्तरीय काव्य संमेलन आयोजित केले होते. या कविसंमेलनात प्रमुख अतिथी म्हणून स्नेहलता कोल्हे बोलत होत्या. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रजनी लुंगसे (धुळे) यांनी या काव्यसंमेलनाचे अध्यक्षस्थान भूषवले, तर संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकांत वानखेडे (पुणे) यांच्या हस्ते झाले. कोपरगावच्या माजी नगराध्यक्षा ऐश्वर्यालक्ष्मी संजय सातभाई यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. यावेळी नाते शब्दांचे साहित्य मंचचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, उपाध्यक्ष बाळासाहेब देवकर, सचिव आकाश वाकचौरे, सौ. चंदन तरवडे, सहसचिव डॉ.जी.के. ढमाले, कार्याध्यक्ष पंडित निंबाळकर, दिनेश चव्हाण, शबाना तांबोळी, संयोजक विलास नवसागरे, नंदकिशोर लांडगे, कवयित्री श्रावणी शिंदे, राजश्री लोंढे, सुरेखा बिबवे, उज्ज्वला कोल्हे, रत्नप्रभा दवंगे, बाबासाहेब दाभाडे, नारायण सोनवणे आदींसह पुणे, नगर, नाशिक, शिर्डी, धुळे, लातूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, रायगड, सातारा, परभणी, भंडारा आदी राज्याच्या विविध भागातून आलेले कवी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रजनी लुंगसे म्हणाल्या, कोपरगाव शहरात साहित्य क्षेत्राशी संबंधित कार्यक्रम घेण्यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून साहित्यिकांसाठी एक सभागृह उपलब्ध करून द्यावे. दरवर्षी आम्ही तेथे विविध कार्यक्रम घेऊ. कोपरगाव हे पुस्तकांचे, वाचकांचे, रसिक मनाचे आणि विचारांचे आदानप्रदान करणारे केंद्र होईल आणि यामध्ये स्नेहलता कोल्हे ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई या दोघींचे नाव सर्वात पुढे असेल.
COMMENTS