अर्धापूर : नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव हद्दीत खडकूत पाटीजवळ असलेल्या देशमुख पेट्रोलपंपाच्या परिसरात एका हायवा ट्रकला अचानक आग

अर्धापूर : नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव हद्दीत खडकूत पाटीजवळ असलेल्या देशमुख पेट्रोलपंपाच्या परिसरात एका हायवा ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महामार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, एम एच 09 एच एच 4832 या क्रमांकाचा हायवा ट्रक नांदेडकडून अर्धापूरच्या दिशेने जात असताना अचानक वाहनाच्या पुढील भागातून धूर व ज्वाळा बाहेर येऊ लागल्या. ही बाब लक्षात येताच चालकाने तत्काळ प्रसंगावधान राखत वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले व स्वतः सुरक्षित बाहेर पडला. काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यानंतर अग्निशामक दल, महामार्ग पोलीस तसेच रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशामक दलाच्या कर्मचार्यांनी तातडीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. काही वेळाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. दरम्यान, आगीमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलीस व महामार्ग प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दीही झाली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून हायवा ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, हायवा ट्रकला आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

COMMENTS