Homeताज्या बातम्यासंपादकीय

वंचितांचा नायक  

भारतासारख्या विशाल देशामध्ये अनेक जात-समूहातील जनता अजूनही वंचित आहे. या वंचित, मूक्या समाजाला खर्‍या अर्थाने बोलण्याचे, त्यांच्या वेदना प्रगट कर

भाजपचे धक्कातंत्र !
नितीशकुमार संधीसाधू राजकारणी
गुन्हेगारीचे ‘हब’  !

भारतासारख्या विशाल देशामध्ये अनेक जात-समूहातील जनता अजूनही वंचित आहे. या वंचित, मूक्या समाजाला खर्‍या अर्थाने बोलण्याचे, त्यांच्या वेदना प्रगट करण्याचे काम मूकनायक या वर्तमानपत्राने केल्याचे दिसून येत आहे. मूकनायक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 31 जानेवारी 1920 साली समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी सुरू केलेले मराठी भाषेतील एक पाक्षिक होते. आपल्या चळवळीची भूमिका आणि आपल्या समाजाचे प्रश्‍न मांडण्यासाठी वृत्तपत्राची गरज असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लक्षात आले होते. कोणत्याही चळवळीसाठी वर्तमानपत्र गरजेचे आहे. वर्तमानपत्र नसेल तर, कोणत्याही चळवळीची अवस्था पंख नसलेल्या पक्ष्यासारखी होते, त्यामुळे चळवळीसाठी वर्तमानपत्राची नितांत गरज असल्याचे डॉ. आंबेडकरांचे मत होते, त्या भूमिकेतूनच बाबासाहेबांनी मूकनायक पाक्षिकाची सुरुवात केली. मूकनायकचा पुढील तीन वर्ष सुरु होता. मूकनायकची स्थापना करताना बाबासाहेब आंबेडकर यांच्यापुढं आर्थिक प्रश्‍न निर्माण झाला होता. मात्र, राजर्षी शाहू महाराज यांनी अडीच हजार रुपयांची मदत केली होती. मूकनायकचे ब्रीदवाक्य म्हणून बाबासाहेबांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची निवड केली होती. काय करु आता धरुनिया भीड । नि:शंक हे तोंड वाजविले ॥ नव्हे जगी कोणी मुकियांचा जाण । सार्थक लाजून नव्हे हित ॥ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची निवड ब्रीदवाक्य म्हणून करुन बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक सुरु करण्यामागील वैचारिक भूमिका काय असेल याचे संकेत दिले होते. 31 जानेवारी  रोजी या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. हे पाक्षिक मुंबईहून निघत असे. पांडुरंग नंदराम भटकर या पाक्षिकाचे संपादक होते. कारण आंबेडकर हे सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करीत असल्यामुळे त्यांना उघडपणे संपादकपदावर कार्य करणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी मूकनायकाच्या व्यवस्थापकपदी ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांची नेमणूक केली होती. पहिल्या अंकातील ’मनोगत’ नावाचा अग्रलेख आंबेडकरांनी स्वतः लिहिला होता. पुढील तेरा अंकातही त्यांनी लेख लिहिले. मूकनायकासाठी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी 2,500 रुपयांची आर्थिक मदत दिली होती. आंबेडकरांनी मूकनायक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले, कारण मराठीच त्यावेळेची सामान्य जनतेची भाषा किंवा लोकभाषा होती आणि बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र (कर्मभूमी) महाराष्ट्र होते. तसेच तेव्हा महाराष्ट्रातील दलित जनता जास्त शिकलेली नव्हती, ती केवळ मराठीच समजू शकत होती. या पाक्षिकाचा मुख्य उद्देश दलित, गरीब व शोषित लोकांच्या व्यथा त्यांचा आवाज सरकारपर्यंत आणि इतर जनतेपर्यंत पोहचवणे हा होता. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखांमधून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायावर प्रकाश टाकून त्या समाजाच्या उन्नतीसाठी तत्कालिन ब्रिटिश सरकारला काही उपाययोजना सुचवल्या. अस्पृश्यांचा उद्धार किंवा विकास होण्यासाठी अस्पृश्यांनी राजकिय सत्ता व शैक्षणिक ज्ञान मिळवणे गरजेचे आहे, असे त्यांना नेहमी वाटत असे. 5 जुलै 1920 रोजी आंबेडकर पुढील शिक्षणासाठी लंडनला रवाना झाले. त्यानंतर 31 जुलै 1920 पासून मूकनायकाचे संपादक पद ज्ञानेश्‍वर ध्रुवनाथ घोलप यांच्याकडे आले.  पहिल्या अंकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिहितात, आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणार्‍या अन्यायंवर उपाययोजना सुचविण्यास तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खर्‍या स्वरुपाची चर्चा होण्यास वर्तनामनपत्रासारखी अन्य भूमी नाही; परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या पत्रांकडे पाहिले असता असे दिून येईल की. त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ठ अशा जातींचे हितसंबध पाहणारी आहेत. इतर जातींच्या हिताची पर्वा त्यांना नसते. इतकेच नव्हे, तर केव्हा केव्हा त्यांना अहितकारक असेही प्रलाप त्यातून निघतात. अशा वृत्तपत्रकारांना आमचा एवढाच इशारा आहे की, कोणतीही एखादी जात अवनत झाली, तर तिच्या अवनतीचा चट्टा इतर जातींस बसल्याशिवाय राहणार नाही.. एका जातीचे नुकसान केल्याने प्रत्यक्ष व नुकसान करणार्‍या जातींचेही नुकसान होणार यात शंका नाही. म्हणून स्वहितसाधू पत्रांनी इतरांचे नुकसान करुन आपले हित करायचे पढतमुर्खाचे लक्षण असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते. मूकनायकनंतर बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत, समता, त्यानंतर जनता आणि त्याचेच पुढे प्रबुद्ध भारतसारखे वर्तमानपत्र काढून चळवळीला गती देण्याचे काम केले. 

COMMENTS