Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिग्गज मल्ल घडविणार्‍या माजी ऑलिम्पियनच्या गावातील तालीम मोजतेय शेवटची घटका !

लातूर प्रतिनिधी - कुस्तीत लातूरचे नाव सातासमुद्रापार नेणारे रुस्तुमे-ए-हिंद तथा माजी ऑलिम्पियन हरिश्चंद्र बिराजदार यांच्या गावातील तालीम खिळखिळी

जळकोट तालुक्यातील शेतक-यांचे डोळे आकाशाकडे
मुस्लिम समाज इफ्तार पार्टी, खजूरपुरता मर्यादित नाही !
सहा दिवसांत पाऊण कोटीची कर वसूली

लातूर प्रतिनिधी – कुस्तीत लातूरचे नाव सातासमुद्रापार नेणारे रुस्तुमे-ए-हिंद तथा माजी ऑलिम्पियन हरिश्चंद्र बिराजदार यांच्या गावातील तालीम खिळखिळी झाली असून, या जीर्ण झालेल्या तालमीमुळे नवोदित पैलवानांना चितपट होण्याची वेळ या घडीला येऊन ठेपली आहे. 35 वर्षांपूर्वी तयार झालेल्या या तालमीला राजाश्रयाची गरज असून, जिल्हा प्रशासनाने दुरुस्तीसाठी पुढाकार घेण्याची मागणी गावातील कुस्तीपटूंमधून होत आहे.
निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथे 1982 मध्ये स्थापन झालेल्या हरिश्चंद्र बिराजदार व्यायामशाळेला सध्या घरघर लागली असून, ही तालीम जीर्ण झाली आहे. तालमीतील स्लॅब कमकुवत झाला असून, पावसाळ्यात गळती लागत आहे. यासह दारे, खिडक्या तुटल्या असून, मल्लांच्या निवासासाठी असलेली रूमही मोडकळीस आली आहे. जिल्हा परिषदेच्या निधीतून उभारलेली ही इमारत सध्या शेवटची घटका मोजत आहे. नियमित याठिकाणी जवळपास 30 ते 40 मल्ल दैनंदिन सराव करतात. मात्र, मोडकळीस आलेल्या या तालमीमुळे मल्लांना जीव धोक्यात घालून सराव करावा लागत असल्याचे सध्या चित्र आहे. याच तालमीतून 1982 मध्ये म्युनिक येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील लातूर येथील कुस्तीतील तारा हरिश्चंद्र बिराजदार (मामा) यांची जडणघडण झाली. यासह पंढरीनाथ गोचडे, अप्पासाहेब सगरे, मधुकर बिराजदार, नामदेव गोचडे, गुंडाप्पा पुजारी, जीवन बिराजदार, ज्ञानेश्वर गोचडे, सागर बिराजदार यासह नवोदित भैय्या माळी, पवन गोरे, मधुकर दुधनाळे आदी नामवंत मल्ल तयार झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वात जुन्या असलेल्या या तालमीला विशेष महत्त्व आहे. ऑलिम्पियन घडलेल्या रामलिंग मुदगड येथील तालमीची ही अवस्था आहे तर बाकी ठिकाणचे काय, असाही प्रश्न उपस्थित होत असून, तालमीची दुरुस्ती व्हावी व नवोदित मल्लांना अद्ययावत तंत्रशुद्ध तालीम तयार करून मिळावी, अशी अपेक्षा गावातील जुन्या कुस्तीप्रेमींसह नवोदित मल्लांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, याच तालमीतून शेकडो राष्ट्रीय खेळाडूंसह अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूही घडले आहेत. तालमीला पुनर्जीवित करण्यासाठी माजी कुस्तीपटूंनी पुढाकार घेतला असून, त्यांनी लातूरच्या प्रशासनाला तालमीचे अंदाजपत्रक काढून प्रस्तावही सादर केला आहे. तालमीतील दुरुस्ती लवकरात लवकर व्हावी, अशी अपेक्षा ठेवून असलेल्या या कुस्तीपटूंना गतवैभव मिळवून देण्यासाठी धडपड सुरू आहे. दरम्यान, लोकप्रतिनिधीही रामलिंग मुदगड येथील तालीम दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहे. मात्र, प्रशासनाकडून आतापर्यंत कोणतीही हालचाल झालेली नाही. रुस्तुमे-ए-हिंद हरिश्चंद्र बिराजदार यांनी कुस्ती खेळात किमया केली होती. त्यांनी महाबली सतपालला हरवत 1977 मध्ये इतिहास रचला होता. त्यावेळी त्यांची कोल्हापुरात हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली होती. यासह त्यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनवीर काका पवार, महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर, रावसाहेब मगर, राहुल काळभोर, दत्ता गायकवाड, राष्ट्रकूल सुवर्णविजेता राहुल आवारे, गोविंद पवार असे मल्ल घडले आहेत. त्यांच्याच गावात तालमीची ही झालेली वाताहत कुस्तीप्रेमींच्या हृदयाला टोचणारी आहे.

COMMENTS