हिंगोली ः जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथील एका तरूण शेतकर्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या तरूण शेतकर्याने कपाशीचा बियाणाचा
हिंगोली ः जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथील एका तरूण शेतकर्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या तरूण शेतकर्याने कपाशीचा बियाणाचा प्लॉट खराब झाल्याने मानसिक तणावाखाली येऊन शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात रविवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथील शेतकरी विठ्ठल दत्तराव तांबीले (38) यांना वाघजाळी शिवारात 20 गुंठे शेत आहे. त्यांच्या कुटुंबांमध्ये पत्नी व दोन मुले असून या शेतावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. यावर्षी वेगळा प्रयोग म्हणून त्यांनी कपाशीचा बियाणाचा प्लॉट घेतला होता. शेतामध्ये कपाशीचे बियाणे उत्पादनासाठी त्यांनी एका कंपनीसोबत चर्चाही केली होती. त्यानुसार त्यांना बियाणे देखील देण्यात आले होते. त्यानंतर तांबीले यांनी शेतात कपाशीचे बियाणे लावले मात्र कपाशी खराब झाल्याने मागील काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. आता सीड प्लॉट खराब झाल्याने पैसे कसे उभे करावे तसेच उदरनिर्वाह कसा करावा याची चिंता त्यांना लागली होती. शेतात रोही प्राणी जास्त येत असल्याने त्यांना हाकलण्यासाठी शेतात जात असल्याचे सांगून शनिवारी ता. 17 रात्री ते शेतात गेले होते. त्यानंतर रात्री उशीरा पर्यंत ते घरी परतले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरु केला. यावेळी शेतात एका झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेषराव राठोड, जमादार किसन डवरे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर मयत विठ्ठल यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला.
COMMENTS