Homeताज्या बातम्यासंपादकीय

गोवरचा विळखा

कोरोनानंतरच्या विळख्यानंतर देखील आपण जर आपल्या आरोग्य व्यवस्थेला सक्षम बनवू शकत नसेल तर, ती आपली शोकांतिका ठरू शकते. नुकत्याच एका अहवालातून भारता

महाविकास आघाडीतील फूट ?
फुटीरवादी संघटनांवर चाप
क्रीडाक्षेत्रातील लैंगिक शोषण

कोरोनानंतरच्या विळख्यानंतर देखील आपण जर आपल्या आरोग्य व्यवस्थेला सक्षम बनवू शकत नसेल तर, ती आपली शोकांतिका ठरू शकते. नुकत्याच एका अहवालातून भारताची लोकसंख्या 142 कोटींच्या घरात पोहचली असून, पुढील वर्षात भारत चीनला मागे टाकण्याची शक्यता आहे. अशावेळी एवढा अवाढव्य लोकसंख्येचा आरोग्याचा भार आपल्याला पेलायचा असेल तर, आरोग्यव्यवस्था भक्कम करणे गरजेचे आहे. कोरोनाच्या काळात आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजवारा सर्वांनी पाहिला आहे. आरोग्य क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्याची देखील गरज आहे. आरोग्य क्षेत्रावर दोन-अडीच टक्क्यांपेक्षा अधिक खर्च करण्याच्या पलीकडे आपण जाऊ शकलेलो नाही. किमान हा खर्च 6 टक्क्यांच्या जवळपास गेल्यास आरोग्य क्षेत्र सक्षम होईल, नवनवे, संशोधन होऊ शकेल. भारतच नव्हे तर संपूर्ण जगाने अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करत वेगवान प्रगती करण्याची किमया साधली आहे. मात्र कोरोनाच्या संकटात अत्याधुनिक तंत्रज्ञान लाखो रुग्णांना वाचवू शकले नाही. कोटयवधींची संपत्ती असलेले अनेक जण हक-नाक आपल्या प्राणाला मुकले. कोरोनातून सावरत असतांना, महाराष्ट्रात गोवरचा विळखा चिमुकल्याचे जीव घेतांना दिसून येत आहे. मुंबईमध्ये तर गोवरचा विळखा चांगलाच वाढतांना दिसून येत आहे. मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यात आठ ठिकाणी गोवरचा प्रादुर्भाव वाढला आहे. बुधवारपर्यंत गोवर रुग्णांची संख्या हजारापर्यंत पोहचली आहे. संशयित रुग्णांची संख्या 1,263 एवढी नोंदविण्यात आली आहे. तर गोवर बाधित 7 रुग्णांचा संशयित मृत्यू झाला आहे. यावरून या गोवरचा विळखा किती घट्ट होतांना दिसून येत आहे, याची कल्पना येते. गोवर हा जन्मलेल्या बाळापासून ते 2 वर्षांच्या मुलांपर्यंत होऊ शकतो. गोवर लसीची पहिली मात्रा नऊ महिने पूर्ण झालेल्या बाळांनाच दिली जाते. मात्र मुंबईत लसपात्र वयापूर्वीच बाळांना गोवरची लागण होत असल्याचं समोर आलं आहे. सर्वाधिक आठ महिन्यांच्या बाळाला गोवरची बाधा झाली आहे. मुंबईत आढळून आलेल्या 169 बालकांपैकी 157 रुग्ण हे लस घेण्यास पात्र नसलेल्या म्हणजेच शून्य ते आठ महिने वयोगटातील आहेत. त्यामुळे नवजात बालकांबद्दल चिंता वाढू लागली आहे. हा संसर्गजन्य आजार असून, ‘पॅरामिक्सो’ व्हायरसमुळे हा आजार होतो. हा विषाणू सर्वप्रथम श्‍वसनमार्गाला संक्रमित करीत असल्याने, लहानग्यांसाठी तो सध्या जीवघेणा ठरत आहे. गोवर हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. या आजारावर प्रतिबंधात्मक लसीकरणाचा पर्याय उपलब्ध आहे. पाच वर्षांखालील मुलांमध्ये आढळणार्‍या या आजारात ताप, खोकला, वाहणारे नाक, डोळ्यांची जळजळ, सुरुवातीला चेहर्‍यावर आणि नंतर उर्वरित शरीरावर लाल, सपाट पुरळ ही लक्षणे आढळतात. गोवरमुळे काही मुलांमध्ये अतिसार, मध्य कर्ण संसर्ग, न्यूमोनिया, क्वचित फेफरे, अंधत्व किंवा मेंदू संसर्ग अशी गुंतागुंत होऊ शकते. त्यामुळे गोवरच्या या विळख्यात हजारो चिमुकले अडकतांना दिसून येत आहे. त्यामुळे गोवरचा विळखा रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. कोरोनानंतरच्या काळात संपूर्ण जगभरात आरोग्यव्यवस्थेवर मंथन होतांना दिसून येत आहे. त्याचबरोबर नव-नवीन शोध आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यात यत असले तरी, अनेक साथीच्या आजारांमुळे अनेकांचा जीव जातांना दिसून येत आहे. डेंग्यु, मेलेरिया, चिकण गुनिया यानंतर गोवर या संसर्गजन्य आजारामुळे अनेकांना आपल्या जीवांना हक-नाक मुकावे लागत आहे प्रतिबंधक लसीमुळे याला आळा घालण्यात यश मिळाले असले तरी, ते शंभर टक्के नाही. त्यामुळे आरोग्यव्यवस्थे समोरील आव्हाने पुन्हा एकदा अधोरेखित होतांना दिसून येत आहे. त्यातच 142 कोटींच्या लोकसंख्येसाठी आरोग्य यंत्रणा सक्षम करणे गरजेचे आहे. अन्यथा साथीच्या आजारामध्ये संसर्ग वेगाने फैलाव होण्याची शक्यता आहे. जसे कोरोनाच्या साथीत झाले. त्यामुळे आरोग्यव्यवस्थेची बांधणी करुण सक्षम करणे खरी गरज आहे. 

COMMENTS