पुणे : परदेशातील नामांकित शैक्षणिक संस्थेत प्रवेशाच्या आमिषाने विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळल्याप्रकरणी विमाननगरमधील ‘माय कॉलेज खोज’ या कंपनीच
पुणे : परदेशातील नामांकित शैक्षणिक संस्थेत प्रवेशाच्या आमिषाने विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळल्याप्रकरणी विमाननगरमधील ‘माय कॉलेज खोज’ या कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कंपनीच्या कार्यालयातील दोघांना अटक करण्यात आली. प्राथमिक तपासात आरोपींनी चार ते पाच विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
या प्रकरणी माय कॉलेज खोज कंपनीचे संचालक अमित कुमार, प्रतिभा भाटी, सौरभ झा, पूनम राजपुरोहीत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झा आणि राजपुरोहीत यांना अटक करण्यात आली असून, मुख्य आरोपी पसार झाले आहेत. याबाबत एका महाविद्यालयीन तरूणीने फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी मूळची ठाण्यातील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीला उच्च शिक्षणासाठी इटलीला जायचे होते. तिने परदेशातील नामांकित शैक्षणिक संस्थांची माहिती संकेतस्थळावरुन घेतली. माय कॉलेज खोज या कंपनीच्या संकेतस्थळावर परदेशात उच्चशिक्षणाची संधी, अशी जाहिरात तिने पाहिली. तिने संकेतस्थळावर नोंदणी केली. त्यानंतर तिला पुण्यातील विमाननगर भागातील कार्यालयात बोलविण्यात आले. इटलीचा व्हिसा आणि शिक्षणासाठी सहाय्य करण्याचे सांगून तिच्याकडून वेळोवेळी दोन लाख सहा हजार रुपये घेण्यात आले. तरुणीला इटलीतील शैक्षणिक संस्थेत प्रवेश न मिळाल्याने तिने विचारणा केली. तेव्हा कंपनीतील प्रतिनिधींनी टाळाटाळ केली. तरूणीला संशय आल्याने तिने चौकशी केली. तेव्हा चार ते पाच विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले. तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. अर्थिक गुन्हे शाखा आणि विमानतळ पोलिसांनी माय कॉलेज कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकला. विमानतळ पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
COMMENTS