पेट्रोल-डिझेल महागले…चला घोड्यावर ;  काँग्रेसचे नगरमध्ये अभिनव आंदोलन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पेट्रोल-डिझेल महागले…चला घोड्यावर ; काँग्रेसचे नगरमध्ये अभिनव आंदोलन

पेट्रोलच्या दराने गाठलेली शंभरी व डिझेलचा झालेला 92 रुपयांचा दर यांचा निषेध शहर जिल्हा काँग्रेसने सोमवारी अभिनव केला.

शासकीय अधिकार्‍यांनी सामाजिक भावनेने काम करावे
कोपरगावकरांचा धारणगाव रस्त्याचा त्रास होणार कमी रस्त्याचे लवकरच काम सुरु होणार -आ. आशुतोष काळे
वीजबिल वसुलीच्या कामाला गती द्या ; सहव्यवस्थापकीय संचालक प्रसाद रेशमे यांचे निर्देश

अहमदनगर/प्रतिनिधी- पेट्रोलच्या दराने गाठलेली शंभरी व डिझेलचा झालेला 92 रुपयांचा दर यांचा निषेध शहर जिल्हा काँग्रेसने सोमवारी अभिनव केला. बाजारपेठेतून घोड्यावरून फिरताना कार्यकर्त्यांनी त्यामागे दुचाकी हाताने लोटण्याचे आंदोलन केले तसेच 100 रुपये लिटर दर असतानाही वाहनांतून पेट्रोल भरणार्‍या नागरिकांना गुलाबाचे फुल देऊन गांधीगिरी केली. 

    पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात नगर शहरामध्ये आगळेवेगळे आंदोलन काँग्रेसने केले. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह बाजारपेठेत चक्क घोड्यावरून फेरफटका मारत आंदोलन करून नागरिकांचे भाववाढीवर लक्ष वेधले. सर्जेपुरातील सबलोक पेट्रोल पंपाच्या ठिकाणी काँग्रेसने निदर्शने करीत आंदोलन केले. यात ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब धोंडे, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, उपाध्यक्ष खालील सय्यद, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण गीते, युवक काँग्रेस अध्यक्ष अक्षय कुलट, विद्यार्थी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष वीरेंद्र ठोंबरे, नगर तालुका विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष सुजित जगताप, इंटक जिल्हाध्यक्ष हनीफ शेख, सेवादल महिला शहर जिल्हाध्यक्ष कौसर खान, सेवादल शहर जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज लोंढे, शहर जिल्हा सरचिटणीस नलिनी गायकवाड, ज्येष्ठ नेत्या जरीना पठाण, अल्पसंख्याक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, शहर जिल्हा सचिव प्रशांत वाघ, शहर जिल्हा सचिव मुबिन शेख, खजिनदार मोहनराव वाखुरे आदी सहभागी झाले होते.

घोड्यावर बसून जागृती

निदर्शनानंतर काँग्रेसच्यावतीने बाजारपेठेमध्ये घोड्यावरुन फेरफटका मारत भाजप सरकारच्या दरवाढीचा निषेध करीत जनजागृती केली. सर्जेपुरा ते एमजी रोडवरील घास गल्ली चौकापर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली. घोड्यावर काळे स्वतः बसले होते. मोदी सरकारच्या विरोधामध्ये दरवाढीच्या विरोधात घोषणा दिल्या जात होत्या. यामुळे बाजारपेठ दणाणून गेली. यावेळी कार्यकर्त्यांनी दुचाकी गाड्या लोटत सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला. यावेळी काळे म्हणाले, पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पुढे गेले आहेत. डिझेलचा भाव 92 रुपयाला येऊन ठेपला आहे. स्वयंपाकाच्या गॅसचे दर 900 रुपयांच्या पुढे गेले आहेत. मोदी सरकारने कोरोना संकट काळामध्ये मोठ्या प्रमाणावर डिझेल, पेट्रोल, गॅस यांच्यावर कर लादून लाखो-कोटी रुपयांचा नफा मिळवला असून सामान्य माणसाला मात्र महागाईच्या खाईमध्ये ढकलले आहे, असा आरोप त्यांनी केला. कोरोना संकटाने आधीच आर्थिक विवंचनेत सर्वसामान्य जनता सापडली असताना आता या दरवाढीमुळे आता घरातील सर्व माणसे काम करून देखील घर खर्च भागवू शकत नाहीत, असा दावाही त्यांनी केला. यावेळी गुंदेचा, सय्यद, गारदे, चुडीवाला यांची भाषणे झाली.

कार्यकर्त्यांची गांधीगिरी

आंदोलनाच्यावेळी पेट्रोल पंपावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी गांधीगिरी केली. पेट्रोल भरणार्‍या नागरिकांना गुलाबाचे फुल देत पेट्रोलचे दर त्यांना विचारले. त्यावेळी नागरिकांनी शंभर रुपये दर असल्याचे सांगितल्यानंतर, आपण या दरवाढीबद्दल खूष आहात का, असे विचारल्यावर नागरिकांनी पेट्रोलच्या वाढलेल्या दराबद्दल तीव्र नाराजी केंद्र सरकारबद्दल व्यक्त केली. यावेळी दरवाढीच्या विरोधातील जनजागृतीत लखन छजलानी, शहर जिल्हा सहसचिव शंकर आव्हाड, सिद्धू झेंडे, क्रीडा विभागाचे मच्छिंद्र साळुंखे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रशांत जाधव, शरीफ सय्यद, अक्षय पाचारणे, अजय घोलप, आदित्य यादव,अजय खराडे आदी सहभागी झाले होते.

COMMENTS