Homeताज्या बातम्यादेश

लोकसभेच्या चौथ्या टप्प्याची आज रणधुमाळी

देशातील 49 तर महाराष्ट्रातील 13 मतदारसंघाचा समावेश

नवी दिल्ली ः लोकसभा निवडणूक 2024 च्या चौथ्या टप्प्यासाठी आज सोमवारी मतदान होत असून, यासाठी अनेक ठिकाणी लक्षवेधी लढती होतांना दिसून येत आहे. देशाम

नवी मुंबई विमानतळचा पहिला टप्पा मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होणार
शिंदे गटातील दोन नेत्यांमध्ये राडा
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शिर्डी येथे भव्य छायाचित्र प्रदर्शनास सुरूवात

नवी दिल्ली ः लोकसभा निवडणूक 2024 च्या चौथ्या टप्प्यासाठी आज सोमवारी मतदान होत असून, यासाठी अनेक ठिकाणी लक्षवेधी लढती होतांना दिसून येत आहे. देशामध्ये 49 मतदारसंघात लढती होत असल्या तरी, यात सर्वाधिक महाराष्ट्रात 13 लोकसभेच्या जागेसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये अहमदनगरमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे विरूद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्यात थेट लढत होतांना दिसून येत आहे. तर दुसरीकडे शिर्डी मतदारसंघात तिरंगी लढत बघायला मिळत आहे. महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे विरूद्ध महाविकास आघाडीचे अर्थात उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे भाऊसाहेब वाकचौरे आणि वंचितच्या उत्कर्षा रूपवते यांच्यात तिरंगी लढत होत आहे. दुसरीकडे शिरूरमधून अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील विरूद्ध शरद पवार गटाचे डॉ. अमोल कोल्हे यांच्यात लढत होत आहे.
पुण्यात महायुतीचे मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढत होत आहे. शिवाय वंचितचा उमेदवार देखील लक्षवेधी मतदान घेऊ शकतो. दुसरीकडे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांना भाजपने बीडमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. मात्र त्यांच्यासमोर शरद पवारांच्या पक्षाचे बजरंग सोनवणे यांचे कडवे आव्हान आहे. त्यामुळे यावेळेस पंकजा मुंडे संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्यावर त्यांनी भर दिला होता. तर दुसरीकडे त्यांना धनंजय मुंडे यांची सोबत लाभली आहे. मात्र बजरंग सोनवणे यांच्याकडून कडवे आव्हान उभे करण्यात आले आहे. त्यामुळे चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांचे राजकीय भवितव्य मतदानयंत्रात बंद होणार आहे.

आज या मतदारसंघात मतदान – चौथ्या टप्प्यासाठी आज सोमवारी अहमदनगर, शिर्डी, नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, बीड या तेरा मतदारसंघात मतदान होत आहे. त्यामुळे या मतदारसंघात अनेक ठिकाणी हायहोल्टेज लढती रंगण्याची शक्यता आहे. शिवाय 13 मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होणार आहे.

मतदानावर अवकाळीचे संकट – महाराष्ट्रातील पहिल्या, दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यात प्रचंड उष्णतेचे सावट होते. प्रचंड उष्णता असल्यामुळे लोकांनी मतदान करण्यास टाळाटाळ केल्यामुळे विदर्भात मतदानाची टक्केवारी घसरली होती. मात्र देशात आणि राज्यात सोमवारी होत असलेल्या चौथ्या टप्प्याच्या मतदानावर मात्र अवकाळी पावसाचे सावट आहे. जर सोमवारी पावसाने जोरदार हजेरी लावली तर, मतदानांची टक्केवारी पुन्हा एकदा घसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्या त्यावेळी देखील पावसाने अनेक सभांची दाणादाण उडवली होती. असे असतांनाही अनेक नेत्यांनी भर पावसात सभा घेत वातावरण चांगलेच तापवले. राज्यात सांगली, पुणे, सातारा, कोल्हापूर, नागपूर आदि जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. अनेक ठिकाणी वार्‍याच्या जोरामुळे झाडे उन्ममळून पडली. तर विद्युत खांबाचे देखील मोठे नुकसान झाले.

COMMENTS