मुंबई : भारतासारख्या लोकशाही देशात निवडणूक प्रक्रिया ही खूप महत्त्वपूर्ण बाब आहे. येथील मतदारांचा स्वयंप्रेरीत मतदानासाठीचा उत्साह आणि त्यांच्या
मुंबई : भारतासारख्या लोकशाही देशात निवडणूक प्रक्रिया ही खूप महत्त्वपूर्ण बाब आहे. येथील मतदारांचा स्वयंप्रेरीत मतदानासाठीचा उत्साह आणि त्यांच्या चेहर्यावरील आनंद हे आयोगामार्फत राबवण्यात आलेल्या मतदान जागृती कार्यक्रमाचे यश असून मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाने उत्कृष्ट नियोजन केल्याचे मत निवडणूक प्रक्रियेच्या पाहणीसाठी आलेल्या परदेशी शिष्टमंडळांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले. भारत निवडणूक आयोगाने इतर देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्थांबरोबर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहभागासाठी आइव्हीपी कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या अंतर्गत परदेशी शिष्टमंडळ प्रतिनिधी निवडणूक प्रक्रियेच्या पाहणीसाठी महाराष्ट्रात आलेले आहेत. रायगड येथील मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रियेची पाहणी केल्यानंतर या शिष्टमंडळाने आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांची भेट घेऊन भारतातील निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती जाणून घेतली. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या शिष्टमंडळात बांगलादेश, श्रीलंका, कझाकिस्तान आणि झिम्बाबाब्वे या देशातील प्रतिनिधींचा समावेश आहे. यात बांगलादेशमधील निवडणूक आयोगातील अधिकारी महम्मद मोनिरुइझमन टी, जी एम शाहताबुद्दीन, कझाकिस्तान केंद्रीय निवडणूक आयोगातील नुरलान आब्दीरोव, आयबक झिकन, श्रीलंकेच्या निवडणूक आयोगाच्या सिलया हिलक्का पासिलिना आणि झिम्बाब्वे निवडणूक आयोगाच्या सिम्बराशे तोंगाई आणि न्यायमूर्ती प्रशिला चिगुम्बा यांचा शिष्टमंडळात समावेश आहे. यावेळी राज्याचे विशेष निवडणूक निरीक्षक धर्मेंद्र एस. गंगवार, विशेष निवडणूक पोलीस निरीक्षक एम.के.मिश्रा, सहसचिव मनोहर पारकर, अवर सचिव भास्कर बनसोडे, योगेश गोसावी उपस्थित होते. शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी यावेळी मतदान केंद्रावरील पाहणीबाबत आपला अनुभव व्यक्त करताना येथील मतदारांची मोठी संख्या लक्षात घेता त्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावरील सुव्यवस्था, सुरळित सुरु असलेली मतदान प्रक्रिया ही निश्चितच यंत्रणेच्या तयारीचे यश असल्याचे सांगितले. तसेच भारतात तरुण मतदार मोठ्या प्रमाणात असून मतदान केंद्रावर तरुण मतदार त्याच सोबत सर्व वयोगटातील मतदारांचा उत्साह मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाला. विशेषतः मतदारांच्या चेहर्यावर मतदान करण्याचा असलेला आनंद हा एखाद्या सणात सहभागी झाल्यासारखा होता असे या प्रतिनिधींनी आवर्जून सांगितले. या सगळ्यांतून मतदारांचा मतदान प्रक्रियेवर असलेला विश्वास ठळकपणे दिसून आला. मतदारांसोबतच येथील मतदान केंद्रावरील बुथ प्रतिनिधी देखील माहितीगार असल्याचे समाधान सुद्धा प्रतिनिधींनी यावेळी व्यक्त केले. एस.चोक्कलिंगम यांनी भारतातील निवडणूक प्रकिया पारदर्शक, निर्भय वातावरणात पार पाडण्याला निवडणूक आयोगाचे प्रथम प्राधान्य आहे. त्यादृष्टीने सर्व संबंधित यंत्रणा कार्यरत असून महाराष्ट्रात आतापर्यंत तीन टप्प्यात झालेली मतदान प्रक्रिया सुव्यवस्थित, शांततापूर्ण पद्धतीने यशस्वीरित्या पार पडली असल्याची माहिती त्यांनी दिली. निवडणूक प्रक्रियेत पैश्यांचा, बळाचा कुठल्याही प्रकारचा गैरवापर कुणाकडूनही केल्या जाऊ नये यासाठी कटाक्षाने लक्ष ठेवण्याच्या आयोगाच्या सूचना आहेत. त्यानुसार सर्व आवश्यक यंत्रणांना नियुक्त करण्यात आलेले आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे आणि कायदेशीर मार्गाने पार पाडण्यासाठी विविध संबंधित यंत्रणांना जबाबदारी निश्चित करण्यात आली असून ठिकठिकाणी तपासणी नाके, भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत.
COMMENTS