नाशिक - नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नात यंदाच्या वर्षी एकट्या एप्रिलमध्येच तब्बल ८४ लाख रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे बाजार समिती
नाशिक – नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नात यंदाच्या वर्षी एकट्या एप्रिलमध्येच तब्बल ८४ लाख रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये झालेली पदभरती खऱ्या अर्थाने लाभदायी ठरल्याचे सांगत विद्यमान सभापती तथा माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी या पदभरतीला विरोध करणाऱ्या माजी सभापतींचा दावाही फोल ठरल्याचे म्हटले आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिंडोरी रोडवरील मुख्य बाजार आवारात जिल्हाभरातून हजारो शेतकरी भाजीपाला व फळभाज्या विक्रीसाठी घेऊन येत असतात. तसेच, पेठरोडवरील शरदचंद्रजी मार्केट यार्डामध्ये कांदा, बटाटा, लसूण डाळींब, इतर फळे व अन्नधान्याची मोठी उलाढाल होत असते. त्यामुळे दैनंदिन मार्केट फी हे बाजार समितीचे मूळ उत्पन्नस्त्रोत आहे. मात्र अपुऱ्या कर्मचारीसंख्येमुळे या उत्पन्नात हवी तशी वाढ होत नसल्याची बाब सभापती पिंगळे यांच्या निदर्शनास आली. या बाबीचा सखोल अभ्यास करून त्यांनी बाजार समितीमध्ये विविध पदांवर ४७ कर्मचाऱ्यांची नव्याने
भरती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शासकीय नियमानुसार भरतीप्रक्रिया पारही पडली आणि नवीन कर्मचाऱ्यांच्या नेमणुकाही करण्यात आल्या. त्याचा परिणाम असा झाला की, बाजार समितीला मागील वर्षी एकट्या एप्रिलमध्ये १ कोटी ४५ लाख १४ हजार ४९२ रुपये इतके उत्पन्न झाले होते. त्या तुलनेत यावर्षी एप्रिलमध्येच २ कोटी २९ लाख ५६ हजार ६६९ रूपये उत्पन्न झाले. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी उत्पन्नात तब्बल ८४ लाख ४२ हजार १७७ रुपयांनी वाढ झाली आहे.
उत्पन्न वाढीसाठी सभापतींची रणनीती – गेल्या अनेक वर्षांचा सहकारातील अनुभव गाठी असल्याने सभापती पिंगळे यांनी या अनुभवाच्या जोरावर आखलेली रणनीती आणि उत्पन्नाचे स्तोत्र असलेल्या विभागांमध्ये कर्मचाऱ्यांच्या कामकाजामध्ये केलेल्या बदलाचा परिणाम म्हणून बाजार समितीच्या उत्पन्नात भरघोस वाढ झाली आहे, अशी प्रतिक्रिया अन्य संचालकांनी व्यक्त केली आहे.
“शेतकऱ्यासाठी विशिष्ठ पथक” – बाजार समितीच्या आवारात संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून शेतकरी पालेभाज्या फळभाज्या घेऊन येत असतात. शेतकऱ्यांना बाजार समित्यांच्या आवारात कुठल्याही प्रकारची अडचण किंवा त्रास झाल्यास ते कार्यालयात संपर्क साधतात. सहा कर्मचाऱ्यांचे नेमलेले पथक तात्काळ त्या शेतकऱ्याच्या मदतीस धावून जाते आणि त्यांच्या समस्येचे निराकरण करते.
“माजी सभापतींचा दावा ठरला फोल” – नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या भरती प्रक्रियेला माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी विरोध दर्शविला होता. या भरतीमुळे बाजार समितीचे आर्थिक नुकसान होईल, असा दावा त्यांनी केला होता. मात्र कर्मचाऱ्यांची भरती झाल्यानंतर एप्रिलमध्ये ते कामावर रुजू झाले आणि त्याच महिन्यात तब्बल ८४ लाखांनी उत्पन्न वाढले आहे. यामुळे माजी सभापतींनी केलेला दावा फोल ठरल्याचे सभापती पिंगळे यांनी म्हटले आहे.
बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी शासनाच्या नियमानुसार भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यावेळी केवळ विरोधक म्हणुन विरोध करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, शासनाकडून हिरवा कंदील मिळल्याने भरती प्रक्रिया राबवून ४७ कर्मचारी नियुक्त करण्यात आले. काहींनी जिल्हा बँकेत भरती प्रक्रिया राबवून बँक डबघाईला आणली, मात्र आम्ही केलेल्या केलेल्या भरतीमुळे बाजार समितीचे कुठलेही नुकसान झाले नसून उत्पन्नात वाढ झाली आहे. देविदास पिंगळे, सभापती, नाशिक बाजारसमिती
COMMENTS