कोरोनाचे मृत्यू दडविल्याचं सार्वत्रिक सत्य

Homeसंपादकीयदखल

कोरोनाचे मृत्यू दडविल्याचं सार्वत्रिक सत्य

कोणत्याही साथीच्या आजाराचा जागतिक परिणाम होत असतो. यापूर्वी प्लेग, स्वाईन फ्लू, पटकी, अतिसार आदींमुळं लाखो मृत्यू होतात. कोरोनानं त्यापेक्षाही अधिक बळी घेतले आहेत.

फडणवीस यांचे नेतृत्व आता केंद्रातही !
इतिहास आकलनाच्या अभावातून चौंडीचा संघर्ष!
मोदी है तो मुमकीन कैसे?

कोणत्याही साथीच्या आजाराचा जागतिक परिणाम होत असतो. यापूर्वी प्लेग, स्वाईन फ्लू, पटकी, अतिसार आदींमुळं लाखो मृत्यू होतात. कोरोनानं त्यापेक्षाही अधिक बळी घेतले आहेत. वैद्यकीय यंत्रणांचं अपयश त्यामुळं ढळढळीतपणे पुढं येत असलं, तरी खरंतर काहीही न लपविता वस्तुस्थितीदर्शक आकडेवारी दिल्यानं पुढची काळजी घेता येते.

    कोरोनामुळं झालेल्यामृत्यूंची संख्या दडविली जात असल्याचा आरोप सार्वत्रिक आहे. त्यात काही प्रमाणात तथ्य असलं, तरी सर्वंच आरोप खरे नाहीत, हे ही तितकंच खरं. आतापर्यंत जगात जेवढे साथीचे विकार आले, त्यात सर्वाधिक नुकसान करणारा साथीचा विकार म्हणून कोरोनाकडं पाहिलं जातं. आजार नवीन, औषधं नाहीत. त्यामुळं इतर विकारांवरची औषधं वापरण्यात आली. लसीचा शोध घेण्यात काही काळ गेला, तरी सर्व जगाचं लसीकरण इतक्या वेगानं शक्य नाही. मानवी आणि वैज्ञानिक प्रयत्नांना तिथं मर्यादा आल्या. हे सर्व खरं असलं, तरी आरोग्य व्यवस्था दुबळी असल्यानंही मृत्यूंचं प्रमाण वाढलं. कोरोनामुळं झालेले मृत्यू लपवून ठेवण्यामुळं काहीच साध्य होणार नसतं. उलट वस्तुस्थिती समोर आली, तर उपाययोजना करता येतात; परंतु वस्तुनिष्ठ आकडे समोर आले नाहीत, तर उपाययोजनांतलं गांभीर्य कमी होतं. कोरोनामुळे झालेलं मृत्यू दडपण्याचा आरोप काही एका राज्यापुरता मर्यादित नाही, तर ते जागतिक सत्य आहे. महाराष्ट्र असो, की गुजरात; तेथील मुख्यमंत्री कोरोनाच्या मृत्यूची आकडेवारी लपविली जात नसल्याचं सांगतात, तरीही मृत्यू दडवले जातात, असे आरोप होत आहेत. गुजरातमध्ये मात्र कोरोनाची आकडेवारी लपविली जात असल्याचं आठ जिल्ह्यांतील यंत्रणांनी दिलेले मृत्यूचे दाखले आणि सरकारने कोरोनामुळं दाखविलेले मृत्यू यांच्यातील तफावत लक्षात येते. महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार कोरोनाच्या मृत्यूचे आकडे दडविले जात असल्याचा आरोप केला आहे. राज्य सरकारशी पत्रव्यवहार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्यानं त्यांनी थेट काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र पाठविलं होतं. कोरोनानं आतापर्यंत महाराष्ट्रात एक लाखांहून अधिक जणांचे मृत्यू झाले

आहेत. प्रत्यक्षात ही संख्या त्याहून अधिक असल्याचं स्पष्ट झालं आहे. मृतांच्या संख्येची माहिती देणार्‍या पोर्टलवर अतिरिक्त 11 हजार 617 मृत्यूंची नोंद झालेली नसून, ती येत्या दोन दिवसांत करण्याचा आदेश राज्याच्या आरोग्य विभागानं दिला. यावरून मृतांची आकडेवारी अपडेट करण्यात चूक झाली असा होतो. जिल्हा आरोग्य विभागांनी पाठविलेले कोरोना बळींचे आकडे राज्य सरकारच्या पोर्टलवर वेळीच अपडेट होत नाहीत, असा त्याचा दुसरा अर्थ निघतो. कोरोनामुळं सर्वाधिक मृत्यू होणार्‍या सात देशांच्या पंगतीत महाराष्ट्र बसला आहे. आकडे लपवायचे असते, तर आकडा आणखी कितीतरी कमी दाखविता आला असता. आकडे कमी दाखविले गेलेले नाहीत, तर पोर्टलवर अपडेट करण्यात झालेला विलंब हे त्याचं कारण आहे. जिल्हास्तरावरील स्मशानभूमीत कोरोनामुळं मृत झालेल्यांवर अंत्यसंस्कार केलेल्यांची एकूण संख्या आणि पोर्टलवर त्यादिवशी दाखविण्यात आलेले मृत्यू यात बर्‍याच जिल्ह्यांत तफावत आहे, याबाबतची वृत्तं वारंवार प्रसिद्ध झाली. त्याचे समाधानकारक खुलासे प्रशासनानं केले नाहीत. या पार्श्‍वभूमीवर नोंदी न झाल्यास संबंधित जिल्हा शल्यचिकित्सकांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. नोंदी पूर्ण झाल्यानंतर राज्यातील मृतांच्या संख्येत किमान दहा टक्के वाढ होणार असून, आतापर्यंत या बाबतीत एवढा निष्काळजीपणा का दाखविला, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. आरोग्य खात्याकडून बाधितांसह मृतांची आकडेवारी दररोज जाहीर करण्यात येते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वत: अनेकदा मृत्यूदराचं प्रमाण जाहीरपणे सांगितलं आहे. 18 सप्टेंबर 2020 ते 20 मे 2021 या काळात जिल्ह्यांच्या आरोग्य यंत्रणेनं राज्याच्या आरोग्य खात्याला पाठविलेल्या अहवालात नोंदविलेले मृत्यू आणि राज्याच्या आरोग्य खात्यानं दाखविलेल्या मृतांच्या संख्येत तफावत असल्याचं स्पष्ट झालं आहे. विविध जिल्ह्यांतील एकूण मृतांच्या संख्येपेक्षा कमी संख्या राज्याच्या दैनंदिन अहवालात दाखविण्यात आल्याचं दिसतं. 18 सप्टेंबर ते 20 मे या काळात राज्यात 11 हजार 617 रुग्णांचा कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची नोंद अद्याप पोर्टलवर झालेली नाही. राज्याचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी खात्यातील अधिकार्‍यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर याबाबत संदेश पाठविला असून, नोंद नसलेल्या मृतांच्या आकडेवारीबाबत आरोग्य अधिकार्‍यांना ’अलर्ट’ केलं आहे. ’आतापर्यंतच्या रुग्णसंख्येबरोबरच गेल्या 48 तासांत झालेल्या मृत्यूंपैकी काही मृत्यू आणि जुन्या मृत्यूंच्या नोंदी अशा आतापर्यंत दाखवत होतो. ते आता थांबवा. काही मृत्यू नोंदी राहिल्यास त्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांवर कारवाई करण्यात येईल,’ अशा शब्दांत त्यांनी अधिकार्‍यांना तंबी दिली आहे. याबाबत संबंधित जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांच्याशी संपर्क साधल्याचंही त्यांनी संदेशात म्हटलं आहे. मृतांची आकडेवारी लपविण्यात आली नाही. आम्ही जबाबदारीनं काम करीत आहोत. आम्ही विभागातील अधिकार्‍यांना पोर्टल दररोज अपडेट्स करण्याबाबत विचारणा करतो. या बाबीमुळं सनसनाटी पसरवू नका, असं आवाहन त्यांनी केलं. महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाबतच्या आकडेवारीमध्ये कोणताही फेरफार केला जात नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी जाहीरपणे सांगितलं होतं. असं असतानाही काही मृत्यूंची नोंद का गेली नाही, याचा खुलासा आरोग्य विभागाने करणं आवश्यक आहे. या आकडेवारीत सुधारणा करण्याची गरज राज्याच्या आरोग्य विभागातील अधिकार्‍यांना का वाटली नाही, याची कारणं जनतेला मिळायला हवीत. झालेले मृत्यू आणि जाहीर होणारी आकडेवारी यामध्ये आता पुढील काही दिवस तफावत दिसेल. या सर्व गोंधळाला कोण जबाबदार आहे, याची चौकशी खुद्द मुख्यमंत्र्यांनी करावी. बाधित रुग्णसंख्येबाबतही अशी तफावत असू शकते; त्यामुळं त्याबाबतही माहिती घेणं गरजेचं आहे.     जगभरातच कोरोनानं झालेले मृत्यू लपविले गेले आहेत. अधिकृत जाहीर आकड्यांपेक्षा दुप्पट ते तिप्पट मृत्यू झाले असल्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार कोरोनामुळं झालेल्या मृत्यूच्या निम्मेच मृत्यू दाखविण्यात आले आहेत. भारत सरकारवरही कोरोनामुळं झालेले मृत्यू कमी दाखविल्याचा आरोप जागतिक आरोग्य संघटनेनं केला होता; परंतु भारतानं हा आरोप फेटाळून लावला. भारतातील विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर आकडे कमी दाखविल्याचे आरोप वारंवार केले आहेत. कोरोनामुळं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होत आहे; मात्र या सर्वच आकडेवारीची आपल्याकडं नोंद झालेली नाही. अनेक ठिकाणाहून समोर येणारे आकडे प्रत्यक्षात खूप मोठे असल्याची भीती आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. मे 2021 पर्यंत कोरोनामुळं 34 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे; मात्र ही सरकारी आकडेवारी असून खरी संख्या दोन ते तीन पट अधिक असण्याची दाट शक्यता आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या असिस्टट डायरेक्टर-जनरल (डेटा आणि एनालिटिक्स विभाग) समीरा आसमा यांनी म्हटलं आहे. आपल्याला दिसत असलेल्या आकडेवारीपेक्षा खरे आकडे दोन ते तीन पट अधिक आहेत. तसं असेल, तर कोरोनाचा अधिक गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. आत्तापर्यंत 60 ते 80 लाख लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. दुसर्‍या आणि पहिल्या महामारीतही अनेक ठिकाणी रुग्णांना दवाखाने आणि खाटा उपलब्ध होऊ शकत नव्हत्या. तेवढी आरोग्य व्यवस्थाच नव्हती. त्यावेळी नोंदीपेक्षा अधिक मृत्यू झाले असावेत असं त्यांनी म्हटलं आहे. अहमदाबाद, सुरत, राजकोट, भावनगर, जामनगर या जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाची रुग्णसंख्या समोर आली आहे. या महानगरांमध्ये स्मशानभूमीबाहेर अंत्यसंस्कार करण्यासाठी रांगा लागल्या आहेत. आता एका सरकारी विभागानं सरकारच्या कोरोना रुग्णसंख्येवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केलं आहे. एका अहवालानुुसार राज्यात 71 दिवसांत 1.23 लाख मृत्यू प्रमाणपत्रं जारी करण्यात आली; मात्र येथे मृतांचा आकडा 4218 असल्याचं सांगितलं जात आहे. अर्थात सर्वंच मृत्यू कोरोनामुळं झाले असण्याची शक्यता नाही. अन्य आजारामुळंही मृत्यू झालेले असू शकतात.

COMMENTS