अहमदनगर/प्रतिनिधी- नगर जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सुमारे तीन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील खरीपाची पिके अडचणीत साप
अहमदनगर/प्रतिनिधी- नगर जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सुमारे तीन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील खरीपाची पिके अडचणीत सापडली आहेत. सुरुवातीचा पाऊस थोडाफार झाल्यावर पेरण्या झाल्याने आता परतीच्या पावसाची प्रतीक्षा शेतकर्यांना आहेत. राज्यातील पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ व अन्य भागात पावसाने पूर परिस्थिती निर्माण झाली असताना दुसरीकडे त्याच काळात नगर जिल्ह्यात फक्त अकोले तालुक्याच्या पश्चिम भागातील तीस ते चाळीस गावांचा परिसर वगळता अन्य ठिकाणी कोठेही जोरदार पाऊस झाला नाही. पुरेशा पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. प्रशासनाकडे मात्र जुलै महिन्यातही सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची नोंद आहे. अर्थात ती अकोल्यात झालेल्या पावसाचा समावेश करून असली तरी अकोले वगळता जिल्ह्यात अन्यत्र पाऊस नाही.
अपुर्या पावसावरच पेरण्या
नगर जिल्ह्यात यंदा आतापर्यंत 5 लाख 97 हजार 783 हेक्टरवर म्हणजे 133 टक्के खरीप पिकांची पेरणी झाली आहे. त्यात सर्वाधिक 1 लाख 17 हजार 559 हेक्टरवर सोयाबीन, त्या पाठोपाठ कापसाची 1 लाख 9 हजार 247 हेक्टरवर, 98 हजार 760 हेक्टरवर बाजरी, 61 हजार 873 हेक्टवर मका, 74 हजार 855 हेक्टर उडीद, 56 हजार 783 हेक्टरवर तुरीची पेरणी झाली आहे. पावसाळ्याच्या सुरवातीपासूनच पेरणी सुरू होती. पण कापूस लागवड काळात पुरेसा पाऊस झाला नाही. बहुतांश भागात अपुर्या पावसावरच पेरण्या झाल्या आहेत. गेल्या महिनाभरात अकोले तालुक्यातील कळसूबाई, हरिचंद्रगड, रतनवाडी, घाटघर परिसरात जोरदार पाऊस झाल्याने भंडारदरा, मुळा व निळवंडे धरणात पाण्याची मोठी आवक झाली. अकोले तालुक्यातील पश्चिम भाग वगळता पावसाळ्याचे दोन महिने उलटले तरीही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला नाही. पंधरा दिवसांपासून पूर्णतः उघडीप दिल्याने पिके सुकू लागली आहेत. कापसाची वाढ खुंटली आहे. कृषी विभागातून मिळालेल्या माहितीनुसार साधारण तीन लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना पाऊस नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.
आवर्तन सोडण्याची मागणी
राहुरी, कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर, नेवासा, शेवगाव तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. खरीप हंगामातील पिके सुकू लागली असल्याने भंडारदरा व मुळा धरणातून खरीप हंगामासाठी कालव्यांना आवर्तन सोडण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. जिल्ह्यातील बहुतांश भागात खरीप हंगामातील सोयाबीन, मका, बाजरी आदी पिके पावसाअभावी अडचणीत सापडली आहेत. पण, पिकांना पाण्याची नितांत गरज असल्याने तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी होत आहे.
जिल्ह्यातील पाऊस
जून-जुलैमध्ये झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये (कंसात टक्केवारी)-नगर – 244 (121), पारनेर – 211 (112), श्रीगोंदा – 270 (159), कर्जत- 252 (130), जामखेड – 271 (105), शेवगाव – 324 (159), पाथर्डी – 279 (127), नेवासा – 239 (127), राहुरी -247 (125), संगमनेर – 195 (118), अकोले – 446 (129), राहाता – 208 (103)
COMMENTS