Homeताज्या बातम्यासंपादकीय

राजकारणाचा उकीरडा

महाराष्ट्राचे राजकारण सध्या कोणत्या वळणावर आहे, याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केल्यास, आजमितीस राज्याचे राजकारण वेगळ्याच पातळीवर पोहचल्याचे दिसून

वंचितांचा नायक  
 महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल
शरद पवारांची संदिग्ध भूमिका

महाराष्ट्राचे राजकारण सध्या कोणत्या वळणावर आहे, याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केल्यास, आजमितीस राज्याचे राजकारण वेगळ्याच पातळीवर पोहचल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून कधी नव्हे तो, महाराष्ट्र अस्थिर करण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. त्यातच काही नेत्यांनी तर दररोज सकाळी उठून गटारगंगा आपल्या तोंडून ओतण्याची अखंडित परंपरा चालवली आहे. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसा सांगणारा हा महाराष्ट्र आजमितीस अशांत करून सोडला आहे. या राज्यात कधी दंगली होतील, कधी अशांतता होईल, कधी राज्य बेचिराख करून टाकण्यासाठी प्रयत्न केले जाईल सांगता येत नाही. कायदा व सुव्यवस्था आपली रखेल असल्यासारखे काही जण वागतांना दिसून येत आहे. खरंतर भारतामध्ये लोकशाही असून, संविधानानुसार देशाचा कायदा चालतो. अशावेळी कायदा हा सर्वांसाठी समान आणि सारखाच असतांना, काही जण आपण कायद्यापेक्षा वेगळे असल्याचा भास निर्माण करतांना दिसून येत आहे. आपल्याकडे काही हजारो-लाखो कार्यकर्ते असल्यामुळे आपण पाहिजे ती गोष्ट करू शकतो, असा अविर्भाव काही जण बाळगतांना दिसून येत आहे. त्यामुळे त्यांना तुम्ही कायद्यापेक्षा मोठे नाहीत, ही समज देण्याची वेळ आलेली आहे. वास्तविक पाहता महाराष्ट्रात फोडा-फोडीचे राजकारण झाल्यामुळे अनेक पक्ष धास्तावलेले दिसून येत आहे. आपले राजकीय अस्तित्व संपते की काय, अशी भीती त्यांना दिसून येत आहे. त्यामुळे आपले राजकीय अस्तित्व शाबूत राहण्यासाठी या लोकांनी राज्याला अस्थिर करण्यासाठी डाव आखलेला दिसून येत आहे. वास्तविक पाहता महाराष्ट्रात सध्या राजकारण्यांनी रोजच शिव्यांचा शिमगा सुरू केला आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडता झाडता शिव्या देण्यापर्यंत त्यांनी मजल मारली गेली आहे. हा शिमगा काही एक दिवस सुरू नाही, तर तो रोजच सुरू आहे. या शिमग्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती रसातळाला चालल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणांचा सध्या उकिरडा झाला आहे. नळावरच्या बायका जश्या सकाळी कर्ण-कर्कश आवाजात भांडण करतात, त्याचप्रकारे राज्यात देखील एकमेकांवर पत्रकार परिषदा घेऊन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. बरं या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत कोणताही तर्कशुद्धपणा नाही. एकमेकांना शिव्या काय, एकमेकांना धमक्या काय, या संपूर्ण प्रकरणावरून महाराष्ट्राचे राजकारण पार रसातळाला गेल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या मातीला जसा संत तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्‍वर, एकनाथ यांचा वारसा आहे, तसाच तो वारसा महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा देखील आहे. या समृद्ध वारश्याने महाराष्ट्र समृद्ध झाला आहे. तीच पंरपरा महाराष्ट्राच्या राजकारणात देखील कायम होती. एकमेकांवर संयमी भाषेत आणि चिमटे घेणारी, मार्मिक टीका केली जायची. त्यात एकप्रकारची खिलाडूवृत्ती होती, तशीच त्यात एकप्रकारे समोरच्या चुका दाखविण्याचा देखील प्रयत्न होता. शिवाय आपण चुकत असेल, तर समोरचा ते खुलेपणाने कबूल करायचा, आणि त्यात दुरूस्ती करायचा. मात्र गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणांचा पार उकिरडा झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात यशवंतराव चव्हाण, सुधाकर नाईक, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, शरद पवार, शंकरराव चव्हाण यासारखे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले आहेत. मात्र या कालावधीत कधी राजकारणांची पातळी खालावली नाही. किंवा राजकारणाचा पोत घसरला नाही. विधीमंडळात देखील आपल्या विद्वत्तापूर्ण भाषणांनी संपूर्ण विधीमंडळ दणाणून सोडणारे नेते महाराष्ट्रात होते. पण आता त्यांचा वारसा लोप पावतो की काय, अशी भीती आता वाटायला लागली आहे. त्यामुळे सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी आपल्या वाचाळ नेत्यांना आवर घालण्याची गरज आहे. आणि राजकारणाची गटारगंगा होण्यापासून वाचवण्याची खरी गरज आहे. 

COMMENTS