Homeताज्या बातम्यासंपादकीय

भुजबळांच्या मनुवादाचा पर्दाफाश!

एकजातीय नेते असूनही आता ओबींसी नेते म्हणून जे स्वतःला मिरवताहेत त्या नामदार छगनराव भुजबळ यांच्या राजीनामा प्रकरणी दिसून आलेला त्यांचा स्वाभिमान न

राज ठाकरे यांचे तुणतुणे !
अन्यायाची मालिका म्हणजे न्यायपालिका ?
बेगानी शादी में……….! 

एकजातीय नेते असूनही आता ओबींसी नेते म्हणून जे स्वतःला मिरवताहेत त्या नामदार छगनराव भुजबळ यांच्या राजीनामा प्रकरणी दिसून आलेला त्यांचा स्वाभिमान निश्चितपणे अभिमानास्पद आहे. खरेतर, महाराष्ट्रात जातींच्या प्रवर्गनिहाय द्वेषमूलक संघर्ष कधीही उभा राहिला नव्हता; परंतु, मराठा आरक्षणाचे जरांगे पाटील आणि मंत्री छगनराव भुजबळ यांच्या आरक्षण संघर्षात मराठा विरुद्ध ओबींसीं असे समीकरण जाणीवपूर्वक वाढविण्यात आले. ओबींसीं समुदाय हा तसे पाहिला तर कारागीर समुह. आपल्या कारागिरीच्या कसबातून रोजीरोटी कमावून आपली उपजीविका चालविणारा हा समुह. मग, त्यातील कोणतीही जात घ्या, ती आपल्या कारागीरीचा व्यवसाय करूनच पोट भरतो. अशावेळी, आमचे नाभिक बांधव गावात छोटीसे दुकान थाटून आपल्या रोजगाराची निर्मिती करतो. अशा आमच्या नाभिक बांधवांना गावात मराठा समाजाचे केस कापू नये, असे सांगणे म्हणजे जातीद्वेष उभा करणे होय. भुजबळ सध्या जो लढा देत आहेत, तो निश्चितपणे ओबीसींच्या हिताचा आहे, यात दुमत असण्याचे कारण नाही! परंतु, एका जातीने दुसऱ्या जातीवर बहिष्कार टाकण्यासाठी उद्युक्त करण्याची भाषा करणे म्हणजे, मनुस्मृतीच्या तत्त्वांना स्विकारण्यासारखे आहे. ज्या मनुस्मृतीने धर्माच्या नावाखाली ओबीसींवर अन्याय केला त्यातील तत्त्वांना प्रत्यक्षाप्रत्यक्ष प्रोत्साहन देणे म्हणजे आम्ही विचारांच्या गर्तेत वाहवत जाण्यासारखे आहे. त्यामुळे, छगनराव भुजबळ यांच्या या मताशी आम्ही अजिबात सहमत नाहीत. याउलट, सध्या मराठा आणि ओबीसी यातील संघर्ष वाढणे यात राजकीय सत्ताधारी जातवर्गाचे हितसंबंध असू शकतील; परंतु, दोन्ही समुदायातील सामान्य जनतेचे नाहीत. तसे पाहिले तर आलक्षणाच्या प्रश्नावर इरेला पेटलेल्या या दोन्ही नेत्यांचे बोलविते धनी कोणी अन्य असावेत, या चर्चेला आता उधाण येऊ लागले आहे. अर्थात, त्या दोघांच्या बोलविते धनी कोणीही असले तरी तो आपल्या आजचा चर्चेचा विषय नाही. त्यावर कधीतरी बोलू. एखाद्या जातीवर बहिष्कार घालण्याची भाषा ही अनाठायी नव्हे तर जातीग्रस्त समाज व्यवस्थेला पोषक ठरणारी आहे. समतेच्या तत्वातून आरक्षणाचा जन्म होतो. त्या तत्वाला अनुसरूनच आरक्षणाची मागणी आणि बचाव केला जातो. अशावेळी, बेमालूमपणे आपण विषमतेच्या जोखडात अडकून नेमके काय साध्य करणार आहात, हा मुलभूत प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. समाज व्यवस्थेचे हे वास्तव लक्षात घेतले तर भुजबळ हे विचारांच्या कक्षेबाहेर जात आहेत. कोणत्याही प्रकारच्या द्वेषाची भावना ही माणसाला समता आणि बंधुता या तत्त्वांपासून लांब नेते. भुजबळ हे राजीनामा प्रकरणी एका बाजूला हिरो बनू पाहत असले तरी सामाजिक द्वेषाच्या चिथावणीखोर भाषणातून ते मनुवादाकडे कलंडले हे त्यांच्या लक्षात आले नसेल तर; एक समाजप्रहरी म्हणून आम्ही ते लक्षात आणून देऊ इच्छितो. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर आम्ही सातत्याने भुजबळ यांच्या पाठीशी उभे राहीलो. मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावरही आम्ही सडकून टीका केली. त्याविरोधात आम्हाला खूप फोन आणि धमक्या देखील दिल्या; परंतु, आम्ही कशालाही बधलो नाही. परंतु, जेव्हा, विचारांची दिशाच बदलली जाते, तेव्हा, त्याविरोधात भूमिका घ्यावीच लागते. भुजबळ हे पहिल्या दिवसापासून मनुवादी संघटना आणि राजकीय विचारातून पुढे आले आहेत. त्यामुळे, त्यांना त्यांच्या वक्तव्यातील विरोधाभास लक्षात येणार नाही; परंतु, आम्ही फुले-शाहू-आंबेडकरी विचारसरणीच्या मुशीतून घडलो आणि राहीलो आहेत. त्यामुळे, भुजबळांच्या जाती बहिष्काराच्या भूमिकेचा आम्ही ठाम विरोध करित आहोत! थोडक्यात, भुजबळांच्या मनुवादाचा आम्ही हा पर्दाफाश करित आहोत!

COMMENTS