सांगली प्रतिनिधी - शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे आज आकस्मिक निधन झाले. मृत्यूसमयी ते 74 वर्षांचे होते. सांगली जिल्ह्यातील आटपाडी
सांगली प्रतिनिधी – शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे आज आकस्मिक निधन झाले. मृत्यूसमयी ते 74 वर्षांचे होते. सांगली जिल्ह्यातील आटपाडी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. न्यूमोनियाचे निदान झाल्यानंतर त्यांना सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आमदार बाबर एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले होते. महाविकास आघाडीवर त्यांनी जोरदार टीका करत शिंदे गटाला साथ दिली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती.
शिंदे आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले होते तेव्हापासूनच आमदार बाबर त्यांच्या सोबत होते. आमदारांच्या अपात्रता प्रकरणात ठाकरे गटाने जी नावं दिली होती त्यात बाबर यांचेही नाव होते. सन 2019 मध्ये शिवसेनच्या चिन्हावर निवडून आले होते. सदाशिव पाटील या अपक्ष उमेदवाराचा पराभव त्यांनी केला होता. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बाबर यांनी वयाच्या 19 व्या वर्षापासूनच राजकारणाला सुरुवात केली होती. सर्वात आधी खानापूर तालुक्यातील गर्दी गावचे सरपंच म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 1990, 1999, 2014 आणि 2019 या चार विधानसभा निवडणुकीत ते आमदार म्हणून निवडून आले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.
COMMENTS