लेकी बाळींचे संरक्षण कुणी करायचे?

Homeताज्या बातम्यासंपादकीय

लेकी बाळींचे संरक्षण कुणी करायचे?

गल्ली पासून दिल्लीपर्यंत महिला आणि मुली सुरक्षीत आहेत का? असा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.अनेक महिला आणि मुली बेपत्ता झाल्यानंतर त्यांचे काय हो

महागाईचा विस्फोट !
पक्वानांच्या ताटात पालीची लघुशंका!
आघाडीच्या चाकाला केंद्राची खुट्टी !

गल्ली पासून दिल्लीपर्यंत महिला आणि मुली सुरक्षीत आहेत का? असा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.अनेक महिला आणि मुली बेपत्ता झाल्यानंतर त्यांचे काय होते याचाही तपास लागत नाही.समाजातील महत्वाचा हा घटक एव्हढा असुरक्षीत का आहे? याचा शोध घेत असतांना पुरूष प्रधान संस्कृतीला आव्हान देतांना महिला नेतृत्वही हतबल ठरल्याचा निष्कर्ष काढावा लागतो.व्यवस्थेच्या विविध पातळीवर जवळपास पन्नास टक्के सहभाग असूनही महिला प्रतिनिधीत्व आपल्याचजातकुळीचे संरक्षण करू शकत नाही ही बाब लज्जास्पदच म्हणावी लागेल..*लिड*

दिल्लीतील निर्भया अत्याचार प्रकरणाने अवघ्या पुरूष प्रधान संस्कृतीचे धिंडवडे काढल्यानंतर हैद्राबाद येथील वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थीनीवर झालेला सामूहिक अत्याचाराने देशाच्या हृदयाचे ठोके बंद केले. अत्याचार करणार्‍या नराधमांना पकडून न्यायालयात हजर करण्याऐवजी पोलिसांनी एन्काऊंटर करून प्रकरण निकाली काढले. मोटर सायकलवरून उतरवून आपल्या प्रेयसीला रस्त्यातच पेट्रोल टाकून जाळून टाकणार्‍या घटनेने अवघा महाराष्ट्र हळहळला होता. अत्यंत क्रुरपणाने मुलींवर अत्याचार करून त्यांना ठार मारण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. ग्रामिण महाराष्ट्रात  अंगावर रोमांच उभे करणार्‍या अनेक घटना घडत  आहेत. मृत देहावरसुध्दा पुन्हा अत्याचार करण्यापर्यंत विकृती वाढत चालली आहे. यावर समाज  विचार करणार आहे की नाही? सामाजिक संघटनांना मर्यादा आहेत, आणि राज्यकर्त्यांना एक दुसर्‍याचा भ्रष्टाचार काढण्यात वेळ नाही. महिला सबलीकरण, महिला सशक्तीकरण या घोषणांच्या व्यतिरिक्त सरकार पातळीवरून अधिक  काही  करू शकत नाही. घटना घडतात, त्यापाठोपाठ आपत्तीग्रस्त व्यक्ती आणि अन्याय करणाऱ्या संशयीतांच्या   जातीचा शोध घेतला जातो आणि जात स्पष्ट झाल्यावर त्या समाजातील संघटनांकडून   निवेदनांचा भडीमार सुरू होतो. ही पध्दत खरोखरच मनाला वेदना देणारी आहे. मृताचीही जात शोधली जात असेल तर माणूस खरोखरच माणूसकी विसरत चालला आहे. परंतू हे घडतांना दिसते आहे, वारंवार दिसते आहे. खुप घटनांचे संदर्भ लिहिण्याची आमची अजिबात इच्छा नाही. परंतू माझ्या गावातील मुलींची, महिलांची सुरक्षा आम्ही स्विकारतो अशी भावना तरूण मंडळींच्या मनात का निर्माण होत नाही ? केवळ  वर्तमान पत्रातील घटनांचा उल्लेख केला तरी मुलींवर ज्या क्रुरतेने अमानुष पध्दतीने अत्याचार करून मारून टाकण्यात आले ते वाचून अंगावर काटे उभे राहतात.घटनांची दाहकता लक्षात यावी यासाठी उत्तर महाराष्ट्रातील सामाजिक दृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुळे जिल्ह्यातील हे एक उदाहरण. वडील वारलेल्या आणि आई मजुरी करत असलेल्या दोन तरूण मुलींचे दिवसा अपहरण करण्यात येते. त्यांचा अद्यापही पत्ता लागलेला नाही. १४ वर्ष आणि १६  वर्षाच्या या तरूणी कोणी पळविल्या याचा तपास पोलिसांनाही लागत नाही. पुणे येथे अल्पवयीन मुलीचा गर्भपात, पुणे येथे नर्सवर डॉक्टराचा अत्याचार, शिंदखेडा तालुक्यातील चिलाणे गावातून १५ वर्षीय तरूणीचे अपहरण, मध्यप्रदेशात १२ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करून झाडाला उलटे लटकविण्यात आल्याची ‘हैवानी’ घटना, आणि दिल्लीतील ९ वर्षीय बालिकेवर सामुहिक अत्याचार करून धर्मगुरूंसह चौघांनी केलेली हत्या व अंत्यसंस्कार या घटना केवळ प्रातिनिधीक स्वरूपात या ठिकाणी मांडल्या  आहेत. या घटना वारंवार लिहून समाजातील संवेदनशीलता जागृत करण्याचे काम लेखणी करू शकते.बाकी सारा प्रपंच समाजाला सांभाळायचा आहे. अशा  घटना दररोज का घडतात ? यावर चिंतन होण्याची आवश्यकता आहे. सिनेमामधील आयटम साँग, सेन्सॉरच्या पलिकडे असलेली दृश्ये, विविध वृत्त वाहिन्यांवरील वेगवेगळ्या मालिका ज्यामध्ये नको त्या कथा दाखविण्यासाठी लागलेली स्पर्धा, एका स्त्रीचे अनेक पुरूषांशी दाखविले जाणारे अनैतिक संबंध, तोडक्या कपड्यांचे प्रदर्शन, महिला म्हणजे जाहिरातीसाठीचे एक मॉडेल, मोबाईलवरील हजारो पोर्न साईट, विनोदाच्या नावाखाली अश्लील संवाद असलेल्या मालिका, मुलींचे मद्य पिण्याचे, सिगारेट पिण्याची दृश्ये यामुळे कळत न-कळतपणेे मनावर खोलवर रूजणार्‍या घटनाक्रमांनी पारिवारिक वातावरणसुध्दा कलुषित झाले आहे. मुली आपल्या मनाप्रमाणे वागत आहेत. पाचवीच्या मुला-मुलींच्या हातात पालकांनी मोबाईल दिलेले आहेत. परंतू त्यात मुले काय पाहतात याची काळजी घेण्याचे साहस पालकांमध्ये नाही. मुलींमध्ये मद्य पिण्याचे प्रमाण वाढले आहे. खाण्या पिण्याच्या पध्दतीत आमुलाग्र बदल झालेले आहेत. शिक्षणाच्या नावाखाली 30-32 वय वर्ष झालेल्या मुलींचे लग्न करणे अत्यावश्यक आहे असे पालकांना वाटत नाही. एकेकाळी मुलगी वयात येत  असतांना कुटूंबातील कारभारी मंडळींना  मुलीचा विवाह करण्याची चिंता लागल्याने झोप लागत नसे. आजच्या उच्चशिक्षित, बुध्दीमान पालकांना त्याबद्दल कोणतीही खंत वाटत नाही. मुलाचे पॅकेज किती, त्याचा स्वत:चा फ्लॅट आहे का ? या पालकांच्या अहंकारापोटी हजारो मुली अविवाहित आहेत. मोठ्या शहरांमध्ये ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये मुले-मुली राहतात. हे आई-बापालाही कळत नाही, ही वस्तूस्थिती आहे. परंतू मान्य करायला कुणीही तयार नाही. मोठ्या शहरापासून तर ग्रामीण भागापर्यंत महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. गावाची मुलगी म्हणून आता मुलींकडे बघितले जात नाही. शिक्षणाच्या आणि आधुनिकतेच्या नावाखाली मर्यादा सोडून वागण्याचे प्रकार देखील मुलींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. आणि अश्लील, बिभस्त पोर्नसाईट पाहून तरूणांची विकृती वाढत चालली आहे. अपहरण झालेल्या मुलींना बारपर्यंत पोहोचविणारे रॅकेट कार्यरत आहेत. तर पळवून नेल्या जाणार्‍या तरूणींची फसवणूक करून त्यांच्यावर अत्याचार करून सोडून देण्याची किंवा ठार मारण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. पोलिसांना दोष देण्यात उपयोग नाही. माझे घरात आग लागेल तोपर्यंत वाट पाहण्याची पालकांची उदासिन मानसिकता देखील यासाठी कारणीभूत आहे. पती-पत्नी दोन्ही पैशांच्या मागे लागल्याने घरातील तरूण मुला-मुलींवर संस्कार करणार तरी कोण ? अशी सध्याची परिस्थिती आहे. आपल्या मुलांवर अविश्वास दाखविण्याची आवश्यकता नाही. परंतू विश्वास किती आणि कुठपर्यंत ठेवायचा यालाही मर्यादा आहेत. लॉकडाऊन उठल्यानंतर विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात वाईनशॉप समोर जिन्स पँट घातलेल्या तरूणींच्या रांगा मन अस्वस्थ करणार्‍या होत्या. तर काल पुण्याच्या टिळक रोडवर एका उच्चशिक्षित  मद्यधुंद तरूणीने रात्री ११ वाजेच्या सुमारास घातलेला धिंगाणा पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारा आहे. अशा घटनांची संवदेनशिलता जर आम्ही आजच समजून घेतली नाही तर उद्या रस्त्यावर काय काय होईल ? याची कल्पना न केलेलीच बरी. त्यामुळे पालकांनो सावधान. या देशातील सरकार द्रुतगती न्यायालयाची स्थापना करू शकते. शंभर दिवसात गुन्हेगाराला शिक्षा देणारा ‘दिशा कायदा’ कोणत्या न्यायालयात पोहोचला याचा शोध घ्यावा लागेल अशी परिस्थिती आहे. परंतू घटना थांबविण्यासाठी सरकारकडे कठोर कायदे नाहीत. नव्या जगात नारी पुजनाची संकल्पना बदलली आहे. सर्वत्र राक्षसाच्या नजरा भिरभिर फिरत असल्याने आपल्या घरातील मुलगी सुरक्षित आहे का ? याची काळजी स्वतःला घ्यावी लागणार आहे. सरकार, पोलीस यांच्या भरोवशावर राहणे परवडणारे नाही.सरकार एका मर्यादेपलिकडे तुमच्या आमच्या लेकीबाळींची सुरक्षा करू शकत नाही.अगदी दिल्लीत घडलेले ताजे उदाहरण बोलके आहे.बेटी बचाव बेटी पढाव चा नारा देऊन महिला सबलीकरणाच्या गप्पा मारणाऱ्या भाजप सरकार मध्ये नव्याने मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या मिनाक्षी लेखी यांच्या मतदार संघात एका आठ नऊ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली.स्मशान भूमीत तिचे पार्थीव परस्पर जाळण्याचा प्रयत्न करून पुरावा नष्ट करण्याचा खटाटोप झाला.त्या मतदार संघाच्या प्रतिनिधीत्व करणाऱ्या नामदार लेखी महिला असूनही चकार शब्दही उच्चारत नसतील तर आपल्या लेकीबाळींचे संरक्षण सरकारच्या भरवशावर सोडता येणार नाही.हाच धडा प्रत्येकाने घ्यायला हवा.

COMMENTS