अर्बन बँक घोटाळा आणखी किती बळी घेणार?

Homeसंपादकीयदखल

अर्बन बँक घोटाळा आणखी किती बळी घेणार?

केंद्रातील सत्तेच्या जोरावर मल्टीस्टेटचे बुजगावणे पांघरूण सहकाराच्या तत्वांना मुठमाती देणाऱ्या नगर अर्बन मल्टीस्टेट कोआॕपरेटीव्ह बँकेच्या मनमानी कारभ

बंडाच्या स्वल्पविरामाला अंकूर फुटेल?
शेवट गोल्ड झाला! पण….
आघाडीच्या चाकाला केंद्राची खुट्टी !

केंद्रातील सत्तेच्या जोरावर मल्टीस्टेटचे बुजगावणे पांघरूण सहकाराच्या तत्वांना मुठमाती देणाऱ्या नगर अर्बन मल्टीस्टेट कोआॕपरेटीव्ह बँकेच्या मनमानी कारभाराचे पिसे निघाली.पापाचा भरलेला घडा पालथा झाला.एकापाठोपाठ एक बेकायदेशीर प्रकरणे बाहेर येऊ लागली आहे,याच साठी अट्टाहास केलेल्या बँक बचाव समितीच्या परीश्रमाला यश येतांना दिसत असले तरी अद्यापही काही झारीतील शुक्राचार्य वळवळ करीत असल्याने या बँकेचे शाखाधिकारी गोरख शिंदे यांना आत्महत्या करावी लागली.यातूनच बँक बचाव समितीला स्व. गोरक्षनाथ शिंदे यांचे बलिदान व्यर्थ तर जाणार नाही ना? अशी शंका भेडसावत आहे.त्याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न !
लालफितीतील जिवघेणा सुस्त कारभार आणखी किती बळी घेणार?संवेदनशील व्यक्तीचे जीवन अवघड होत आहे हे समाजमनाचेच अपयश म्हणायचे का? असे काही प्रश्न अहमदनगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात उपस्थित केले जात आहेत.शंमर वर्षाहून अधिक इतिहास असलेल्या नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत शाखाधिकारी असलेले गोरख शिंदे यांच्या आत्महत्येनंतर असे काही प्रश्न ऐरणीवर आले आहेत.स्व गोरक्षनाथ शिंदे यांनी भ्रष्टाचाराच्या  वाहत्या गंगेत हाथ धूवून घेण्यास नकार देऊन  ज्या संस्थेची 35 वर्षाहून अधिक काळ  चाकरी केली त्या संस्थेशी  प्रामाणिक राहीले, मात्र  भ्रष्टाचाराच्या  दलदलीने आणि  सर्वच स्तरावरील सुस्त यंत्रणेने त्यांचे जीवन असह्य करून टाकले. नगर अर्बन बँकेचे शेवगाव शाखेत शाखाधिकारी म्हणून काम पाहताना बँकेचे गोल्ड व्हल्युअरचे वर्तन संशयास्पद वाटले. काही ठराविक सोनेतारण पिशव्यांचे अनेक वर्षापासून केवळ व्याज भरले जात असून त्या संशयीत खातेदारांचे व गोल्ड व्हल्युअरचे संबंध संशयास्पद असल्याची शंका त्यांना होती.शेवगाव शाखेतील एकूण ५१०० पिशव्यांपैकी २५०० पिशव्यांचे कर्ज संशयीत. गोल्ड व्हल्युअरच्या कारनाम्यांमुळे  काळजात धडकी भरविणारी परिस्थिती.
स्व. गोरक्षनाथ शिंदे यांनी या संशयास्पद कर्जदारांपैकी काही कर्जदारांकडे चौकशी केली असता त्यांनी दिलेले उत्तर धक्कादायक असल्याची माहीती आता बाहेर येऊ लागली आहे.या खातेदारांच्या   नांवावर ठेवलेले सोने त्यांचे नाही,तर  ते गोल्ड व्हल्युअरचेच आहे. ऑगस्ट 2018 ला हा गंभीर गौप्यस्फोट झाल्यावर संवेदनशील असलेल्या गोरक्षनाथ शिंदे यांनी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी पत्राद्वारे गैरकारभाराची जाणीव करून दिली होती.तातडीने चौकशीची मागणीही केली. दुर्दैवाने स्व. शिंदे यांच्या पत्राची आणि भावनांचीही   दखल तत्कालीन कारभाऱ्यांनी घेतली नाही . २०१८ ला नगर अर्बन बँकेत बँकेचे चेअरमन, संचालक मंडळ व वरिष्ठ अधिकारी यांनी काही ठराविक कर्जदारांशी संगनमत करून बँकेची लूटमार करण्याची चरणसिमा गाठलेली होती. खोट्या मल्टीस्टेट दर्जाचा गैर फायदा घेत धडाधड बोगस कर्ज प्रकरणे करणेत येत होती. त्यातलाच हा एक घोटाळा.यासारखे अनेक घोटाळे आता चर्चेत येऊ लागले आहेत.तीन कोटींचा चिल्लर घोटाळा, २२ कोटीचे चिंचवड शाखेचे बोगस कर्जप्रकरण याच कालावधी दरम्यानचे. स्व. शिंदे यांचे लेखी पत्र वरिष्ठ अधिकारी व संचालक मंडळाला मिळाले त्याच कालावधीत म्हणजे ऑगस्ट २०१८ ते ऑक्टोबर २०१८ मध्ये बँकेचे चेअरमन, संचालक मंडळ व वरिष्ठ अधिकारी हे सोलापुर येथील  वादग्रस्त 36 कोटीचे कर्जप्रकरण करण्याच्या भानगडीत व्यस्त असल्याचा आक्षेप शिंदे यांच्या आत्महत्येनंतर पुन्हा ऐरणीवर आला आहे. सोलापुर मध्ये बँकेची शाखा नाही एवढेच नाहीतर  जवळपासच्या शंभर किमी परिसरात बँकेची एकही शाखा नसताना  सुद्धा हे वादग्रस्त कर्जप्रकरण मंजूर करण्याचा  खटाटोप सुरू  होता. ही ३६ कोटींची बाब बँकेशी संबधीत  आणखी एका संवेदनशील व्यक्तीला  खटकली होती.ती संवेदनशील व्यक्ती म्हणजे बँकेवर तब्बल ५०  वर्ष सलग संचालक राहीलेले,१३ वर्ष चेअरमनपद भूषविलेले सहकारमहर्षी स्व. सुवालालजी गुंदेचा. त्यांनीही  या ३६ कोटींच्या कर्जप्रकरणाला कडाडून विरोध केला होता, सत्तेची मस्ती चढलेल्या शिशूपालांनी  स्व. सुवालालजींचा विरोध डावलून  हे कर्जप्रकरण करायचेच असा चंग पुर्णत्वास नेला. तत्कालीन चेअरमन, काही ठराविक संचालक व वरिष्ठ अधिकारी यांच्या या कारस्थानाविरूध्द स्व. सुवालालजींनी पत्रकार परिषद घेवून जाहीर पोलखोलही  केली होती.या दरम्यान सुवालालजी गुंदेचावर प्रचंड दडपणही आणले गेले होते.त्याचा प्रतिकार म्हणून त्यांच्या चिरांजीवांनी संबंधीत संचालकांना भविष्यात  ते अडचणीत येतील असा गर्भित इशाराही दिला होता त्याचे परिणाम आता दिसत आहेत.हे या ठिकाणी उधृक्त करण्याचे कारण एव्हढेच की ही बँक सुदृढ व्हावी,मालक असलेल्या सभासदांना बँकेचा लाभ मिळावा म्हणून पदराला गाठ मारून मेहनत घेणारे सुवालाल गुंदेचा यांच्या सारख्या जेष्ठ श्रेष्ठांच्या मताला किंमत दिली जात नव्हती तिथे गोरख शिंदे यांच्या सारख्या बँकेचा कर्मचारी असलेल्या सामान्य माणसाच्या पत्राला कोण किंमत देणार.चिल्लर घोटाळा, चिंचवडचे २२  कोटी, सोलापुरचे ३६ कोटी यासारखे  इतर  अनेक गैरप्रकार आणि त्या अनुषंगाने शिजवले गेलेले  कारस्थानांबरोबर शेवगाव चे बनावट सोनेतारणाचे कारस्थान तत्कालीन संचालक मंडळाच्या मर्जीनेच झाले  असे म्हणण्यास  पुष्कळ वाव आहे. बँकेचे भ्रष्टाचारी चेअरमन व संचालक मंडळाची ऑगस्ट २०१९ ला हाकलपट्टी झाल्यानंतर या बनावट सोनेतारण प्रकरणाची पोलीसात फिर्याद दाखल होईल अशी अपेक्षा होती, बँक बचाव समितीनेही  याबद्दल पाठपूरावा, आंदोलन करून उचल घेतली होती.तरीदेखील काल परवा पर्यंत प्रशासनाने कुठलेच पाऊल उचलले नाही ही खरी गोम आहे. स्व.शिंदे यांच्या  मनाला ही गोष्ट रूचली नसावी. २०१८ पासून तळमळ करून काहीच उपयोग होत नाही याचे नैराश्य त्यांना आले असावे.सोबतच कुणाचा तरी  दबाब देखील असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. शेवगाव बनावट सोनेतारणाचा पाठपूरावा सोडून द्यावा यासाठी  बँक बचाव समिती वर देखील खोटा गुन्हा दाखल करण्यासारखी  धमकी देऊन  दबाव टाकण्याचाही  प्रयत्न झाला होता. बँक बचाव समिति या पोकळ धमकीला घाबरली नाही मात्र   गोरक्षनाथ शिंदे यांचा हाकनाक बळी गेला. स्व शिंदे यांचे हे बलिदान व्यर्थ  जावू नये,नगर अर्बन बँकेतील सर्वच घोटाळ्यांचा सखोल व जलद तपास होवून दोषींना कडक शासन होणे हीच स्व शिंदे व स्व सुवालालजींना खरी श्रध्दांजली ठरणार आहे. असल्याने बँक बचाव समितीने आता आणखी पाषाण हृदयी होणे काळाची गरज आहे.

COMMENTS