जालना/मुंबई ः मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा तीव्र होतांना दिसून येत आहे. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेेली 40 दिवसांची मुदत संपली असू
जालना/मुंबई ः मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा तीव्र होतांना दिसून येत आहे. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेेली 40 दिवसांची मुदत संपली असून, मनोज जरांगे यांनी बुधवारी जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला सुरूवात केल्यानंतर राज्य सरकारची कोंडी झाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने बुधवारी दिल्ली दौर्यावर गेल्यामुळे मराठा आरक्षणासाठी राजकीय नेत्यांची धावपळ सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
मनोज जरांगे यांनी बुधवारी पुन्हा आंतरवली सराटी इथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारने वारंवार आश्वासने देऊनही यंदा जरांगे आपल्या मागणीवर ठाम असल्याने आता सरकारपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर केंद्र सरकारशी चर्चा करुन काही तोडगा काढता येतोय का? यासाठी त्यांनी दिल्लीकडे धाव घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांनी पुन्हा आमरण उपोषणाला सुरूवात केली असून, या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधतांना, सरकारवर थेट टीका केली. जरांगे पाटील म्हणाले, मी मुख्यमंत्री यांचा सन्मान करतो पण त्यांना मराठ्यांना आरक्षण देण्यापासून कोण रोखतेय, ते शोधणार आहे. मुख्यमंत्री जे शब्द देतात ते पाळतात अशी त्यांची ख्याती आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक आणि आदर देखील आहे. पण, आमच्या आयुष्याचा हा प्रश्न आहे. आम्हाला आरक्षण मिळालेच पाहिजे, असे जरांगे पाटील म्हणाले.
जरांगे पाटील पुढे म्हणाले, इतरांना सर्वांना आरक्षण देता आले. हे त्यांना शक्य झाले. मात्र, मराठ्यांना आरक्षण देणे मात्र यांना शक्य नाही. माझ्या बांधवांचा व्यवसाय काय आहे. कुणबी बांधव आणि मराठा बांधवांचा व्यवसाय काय, कोणत्या निकषामध्ये आम्ही बसत नाही, ते सांगा असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला. पाटील म्हणाले, तुम्ही 30 दिवसांचा वेळ मागितला. त्या एवजी आम्ही 40 दिवसांचा वेळ दिला. मात्र, वेळ देऊन देखील सरकारनेने काय केले ? न टिकणारे आरक्षण दिल्याने आम्हाला न्यायालयात जावे लागले. इतरांना आरक्षण कशातून दिले ? त्यात मराठा समाज बसतो की नाही, मराठ्यांनी सगळे निकष पार केले की नाही, मग सरकारला आरक्षण देण्यात काय अडचण आहे ? असे अनेक प्रश्न यावेळी जरांगे पाटील यांनी उपस्थित केले. मुख्यमंत्र्यांना आरक्षण कोण देऊ देत नाही, यामागचे कारण शोधायला हवे. काय अडचण आहे, ते शोधायला हवे. मराठा आरक्षणात कुणीतरी आडवे येत आहे, असा आरोप देखील त्यांनी केला. आरक्षणासाठी आजपासून उपोषणाला बसणार असल्याचे सांगून त्यांनी मराठा समाजाला आवाहन देखील केले की, राज्यात शांततेत आंदोलन करा. कुणी आरक्षणासाठी आत्महत्या करू नका. आरक्षण कसे मिळत नाही, ते आपण बघू. आजपासून मराठा समाजासाठी, आपल्या समाजावर अन्यास होऊ नये, यासाठी मी आजपासून उपोषणाला बसवतोय, असे जरांगे पाटील म्हणाले.
COMMENTS