दूध दर वाढीवरून राज्यात राडा होणार, जोपर्यंत राडा होत नाही, तोपर्यंत सरकारही लक्ष देत नाही. शेतकर्यांच्या तरुण पोरांच्या हातात दगड येऊ देऊ नका.
औरंगाबाद / प्रतिनिधीः दूध दर वाढीवरून राज्यात राडा होणार, जोपर्यंत राडा होत नाही, तोपर्यंत सरकारही लक्ष देत नाही. शेतकर्यांच्या तरुण पोरांच्या हातात दगड येऊ देऊ नका. 25 जूनपर्यंत दुधाला 35 रुपये लिटर भाव द्या, अन्यथा राडा घालू, असा धमकीवजा इशारा शेतकरी किसन सभेच्या डॉ अजित नवले यांनी दिला आहे.
लाख गंगा गावात झालेल्या ग्रामसभेत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. टाळेबंदीचा गैरफायदा घेत खासगी वसहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर 10 ते 15 रुपयांनी पाडले आहेत. शेतकर्यांना कोट्यवधीचे नुकसान सहन करावे लागले आहे. टाळेबंदीमुळे मागणी घटल्याचे कारण देत दूध खरेदीचे दर सातत्याने पाडले जात आहेत. प्रत्यक्षामध्ये मागणी किती कमी झाली व त्यामुळे दरामध्ये किती घट करणे अपेक्षित आहे, याचा कुठलाही ताळमेळ स्पष्ट न करता, दूध उत्पादकांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन दूध संघ व दूध कंपन्या घेत आहेत. या पार्श्वभूमीवर या लुटमारीच्या विरोधामध्ये राज्यव्यापी संघर्ष उभा करण्याची भूमिका दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने घेतली आहे. शेतकरी नेते बच्चू कडू, डॉ. अजित नवले, विठ्ठल पवार, धनंजय धोरडे, अनिल देठे, खंडू वाकचौरे, रोहिदास धुमाळ, लाखगंगामध्ये झालेल्या या ग्रामसभेसाठी आवर्जून उपस्थित होते. लाखगंगा गावात दूध उत्पादकांच्या बाजूने पहिला ठराव करण्यात आला. त्यानंतर राज्यभर अशाच प्रकारच्या ग्रामसभा गावोगाव घेत ग्रामसभांचे ठराव घेतले जाणार आहेत. टाळेबंदीच्या काळात दूध उत्पादकांच्या झालेल्या लुटीची चौकशी करा, दोषींवर कारवाई करा व दूध उत्पादकांची केलेली लूट वसूल करून ती दूध उत्पादकांना परत करा, दूध उत्पादकांना अशा प्रकारे वारंवार लुटता येऊ नये यासाठी सहकारी व खासगी दूध संघांना लागू होईल अशा प्रकारचा कायदा करा, ऊस धंद्याप्रमाणेच दूध व्यवसायासाठीसुद्धा एफआरपी व रेव्हेन्यू शेअरिंगचे दुहेरी संरक्षण लागू करा, दुधातील भेसळ रोखण्यासाठी कठोर पावले उचला, एक राज्य एक ब्रँड स्वीकारून राज्यात सुरू असणारी अनिष्ट ब्रँड कॉम्पिटिशन थांबवा या प्रमुख मागण्या करणारा ठराव ग्रामसभेत करण्यात आला.
COMMENTS