नगर जिल्ह्यामध्ये रुग्णांना बेड मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही, रेमडीसिवीर इंजेक्शन्सचा काळाबाजार सुरू आहे, व्हेंटीलेटर न मिळाल्याने रुग्ण रस्त्यावर मृत होत आहेत व जिल्ह्यात भयाजन स्थिती आहे.
नगर : नगर जिल्ह्यामध्ये रुग्णांना बेड मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही, रेमडीसिवीर इंजेक्शन्सचा काळाबाजार सुरू आहे, व्हेंटीलेटर न मिळाल्याने रुग्ण रस्त्यावर मृत होत आहेत व जिल्ह्यात भयाजन स्थिती आहे. प्रशासनाच्या आवाक्याबाहेर सारे गेले आहे. पण जिल्ह्यातील तीन मंत्री व पालकमंत्री याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप भाजपचे माजी आमदार व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी गुरुवारी येथे केला.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोविड संदर्भातील निवेदन प्रा. शिंदे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना दिले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, नगरचे शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे आदी यावेळी उपस्थित होते. माजी मंत्री शिंदे म्हणाले, रुग्णांना इंजेक्शन मिळत नाही, व्हेंटीलेटर उपलब्ध नाहीत, बेड उपलब्ध नाही, सरकार व लोक प्रतिनिधी यामध्ये लक्ष घालायला तयार नाही. रुग्णांना उपचार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. देशातील दहा जिल्ह्यांमध्ये आपला जिल्हा आहे. सर्व यंत्रणा हतबल झाली आहे, असा दावा करून ते म्हणाले, पालकमंत्री सुद्धा या ठिकाणी लक्ष देत नाही. उपचार मिळाले नाही म्हणून लोक रस्त्यावर मयत झाले आहेत, ही गंभीर बाब आहे. जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन त्यांना याची माहिती दिलेली आहे. त्यांनी निश्चितपणे यामध्ये सुधारणा होईल, असे सांगितले आहे. नागरिकांनी पण यासंदर्भामध्ये प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे, असे ते म्हणाले.
जिल्हा वार्यावर सोडला
जिल्ह्यातील तीन मंत्री व पालकमंत्र्यांनी जिल्हा वार्यावर सोडला आहे. पालकमंत्र्यांना येथे बैठक घ्यायला वेळ नाही, लोकप्रतिनिधींना भेट द्यायला वेळ नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे व ही गंभीर बाब आहे. जमावबंदीचे 144 कलम लागू असल्याने रस्त्यावर उतरून आंदोलन करता येत नाही म्हणून भारतीय जनता पक्षाच्यावतीने आम्ही निवेदन दिले, असे सांगून ते म्हणाले, लोकांचे जीव वाचले पाहिजे यासाठी राज्य सरकारने व प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. परंतु यापुढे ही सुधारणा न केल्यास वेगळ्या पद्धतीचा विचार करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला. आपल्याकडे सोळाशे ऑक्जिन बेड असून, सव्वादोनशे व्हेंटिलेटर आहे आणि तीन हजार रेमडीसिवीर इंजेक्शनची गरज असताना फक्त 2 हजार मिळाले आहेत, असे सांगून प्रा. शिंदे म्हणाले, जिल्ह्याची आरोग्य सुविधा वाढवण्याची गरज आहे. कोरोनाच्या पहिल्या फेजमध्ये सहा हजारापर्यंत रुग्णसंख्या गेली होती, पण या फेजमध्ये रोज 2 हजारावर रुग्ण होत आहे. ही भयानक स्थिती आहे. जिल्ह्यातील 3 मंत्री व पालकमंत्री काय करीत आहेत. यात राजकारण आम्ही आणणार नाही व प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याची आमची तयारी आहे. पण पालकमंत्री केवळ सहल करायची म्हणून येतात व बैठका घेतात. पण येथील जबाबदारी घ्यायची कोणी? बारा बलुतेदारांना वार्यावर सोडले आहे, असा आरोपही प्रा. शिंदे यांनी केला.
राहुरीचा तपास उपअधीक्षकांकडे
राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर हत्या प्रकरणांचा तपास उपअधीक्षकांकडे देण्याची ग्वाही पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे. तसेच या तपासात प्रगती झाली नाही तर अतिरिक्त पोलिस अधीक्षकांकडे तपास देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले असल्याचे प्रा.शिंदे यांनी सांगितले तसेच दातीर यांनी पोलिस संरक्षणाची मागणी केली असतानाही त्यांना ते दिले गेले नसल्याने ज्या पोलिसांनी दातीर यांना पोलिस संरक्षण दिले नाही, त्यांच्यावरही दोन दिवसात कारवाई करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली असल्याचे ते म्हणाले. राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही या प्रकरणाची माहिती दिली जाणार असून, तेही येत्या काही दिवसात राहुरीला येऊन दातीर परिवाराची भेट घेणार असल्याचे प्रा. शिंदे यांनी सांगितले. राहुरी तालुक्यात आतापर्यंत झालेल्या चार खुनांचा तपास झालेला नाही, त्यामुळे तेथील पोलिस स्टेशन संशयाच्या भोवर्यात आहे. दातीर खून प्रकरणातील आरोपी निष्पन्न झाले असताना त्यांचा तपास लागत नाही, यामागे मोठ्या राजकीय हस्तीचा दबाव आहे, असा दावा कोणाचेही नाव न घेता त्यांनी केला. कोणालाही पाठीशी घालता काम नये, कायद्याच्या कचाट्यात त्याला शासन झाले पाहिजे ही आमची मागणी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
त्यांचे तालुक्यात नाही, देशात लक्ष
आमचा कर्जत-जामखेड तालुका हा देशात जास्त गाजत आहे. कारण, तेथील लोकप्रतिनिधींचे राज्यात नाही, देशात लक्ष आहे, असा टोलाही प्रा. शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता लगावला. कर्जत-जामखेडच्या स्थानिक लोकांना त्रास होतोय, इंजेक्शन मिळत नाही. पण आमच्या लोकप्रतिनिधीचे महाराष्ट्राच्या बाहेर लक्ष आहे, महाराष्ट्र सुद्धा नाही, हे दुर्दैवाने म्हणावे लागेल, असे स्पष्ट करून ते म्हणाले, अडचणीच्या कालखंडामध्ये राजकारण न आणता लोकांना मदत करायची संस्कृती आहे, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून लोकांना दिलासा मिळाला पाहिजे. परंतु तो कर्जत-जामखेडच्या जनतेला व तेथील पॉझिटिव्ह रुग्णांना मिळताना दिसत नाही. कर्जत-जामखेडला पाण्याचे फार दुर्भिक्ष्य झालेले आहे, कुकडीचे पाणी 10 मे रोजी येणार आहे, असे सांगत आहेत. परंतु फेब्रुवारी, मार्च, एप्रिल गेला व आता पाणी येणार नसेल तर सगळ्या फळबागा जिकडेतिकडे होतील. पण केवळ कोविड असल्यामुळे लोक गप्प आहे, असे प्रा. शिंदे म्हणाले.
COMMENTS