राज्यात कोरोनाची परिस्थितीत दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. दुसरीकडे रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे.
मुंबई/प्रतिनिधीः राज्यात कोरोनाची परिस्थितीत दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. दुसरीकडे रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. अशातच राज्य सरकारला कमी दरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यास कोणताही पुरवठादार तयार नाही.
राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे राज्य सरकारने इंजेक्शन खरेदीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत; पण पुरवठादारांनी इंजेक्शन देण्यास नकार दिला आहे. राज्य सरकारला 654 रुपये दराने रेमडेसिवीर इंजेक्शन हवे आहे; पण खुल्या बाजारात बाराशे रुपये किंमत असताना कंपन्या सरकारला रेमडेसिवीर द्यायला इच्छुक नाहीत. राज्य सरकारने ज्या दरात मागणी केली आहे, त्या दरात द्यायला कंपन्या तयार नाहीत, म्हणून बाराशे रुपयांना इंजेक्शन घ्या, अशी भूमिका कंपन्यांनी घेतली आहे. कच्या मालाचे भाव वाढले आहे, त्यामुळे कमी दरात देणे शक्य नाही, असे कंपन्या म्हणतात. निर्यात करणार्या कंपन्यांना देशांतर्गत विक्रीस मुभा मिळाली आहे. त्यामुळे या कंपन्या टेंडरमध्ये सहभागी होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे टेंडरला पुन्हा तीन दिवस मुदतवाढ द्यावी लागली आहे. रेमडेसिवीरचा पुरवठा आणखी लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे आगामी काळात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, केंद्र सरकारने रेमडेसीवीर इंजेक्शनबरोबरच रेमडेसिवीर अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रिडिएंटच्या निर्यातीवरही बंदी घातली आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत ही निर्यातबंदी लावण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत रेमडेसिवीरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. देशात विविध राज्यांमध्ये आणि विशेषतः कोरोनाचा स्फोट झालेल्या महाराष्ट्रातून सर्वाधिक मागणी आहे. पुरवठा प्रमाणात होत नसल्यामुळे अनेक ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत आहे. देशातील ही स्थिती पाहता केंद्र सरकारने निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे.
COMMENTS