पुणे/प्रतिनिधी ः पुणे शहरामध्ये भीक मागण्यासाठी आपल्या पोटच्या चार वर्षाच्या चिमुरडीला केवळ दोन हजार रूपयांमध्ये विकण्याचा गंभीर आणि धक्कादायक प्
पुणे/प्रतिनिधी ः पुणे शहरामध्ये भीक मागण्यासाठी आपल्या पोटच्या चार वर्षाच्या चिमुरडीला केवळ दोन हजार रूपयांमध्ये विकण्याचा गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी मुलीच्या आई-वडिलांवर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही चिमुरडी अहमदनगर जिल्ह्यातील मिरजगाव येथील असल्याचे पोलिस तपासामध्ये स्पष्ट झाले आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, मुलींचा सांभाळ करणे अवघड झाल्याने मुलीच्या आई-वडिलांनी मुलीची भीक मागण्यासाठी दोन हजार रुपयांना विक्री केल्याचा आणि त्यांना जात पंचायतीचे पंचानी साथ दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मरीआई देववाले समाजातील दहा पंचासह पिडित मुलीचे आई-वडीलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अॅड. शुभम शंकर लोखंडे (वय-26, रा.हडपसर,पुणे) यांनी पोलिसांकडे आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मुलीचे आई निलाबाई अनिल पवार, वडील अनिल हिरा पवार (रा.मिरजगाव, ता.कर्जत, अहमदनगर) आणि जात पंचायतीचे पंच अनिल जाधव, लक्ष्मी अनिल जाधव, लक्ष्मण भगवान निंबाळकर, आण्णा बाळू पवार, रामा निंबाळकर, नारायण पवार, बाळू पवार, मार्या पवार, पंडया पवार, आण्णा निंबाळकर, शेटण्णा पवार, सोनिया पवार व ढेर्या पवार यांच्यावर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वकील असून त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीने त्यांना याबाबतची कल्पना दिलेली होती. एक महिला मागील दोन महिन्यापासून कल्याणीनगर, विमाननगर परिसरात चार ते पाच वर्षाच्या एका मुलीला घेऊन भीक मागत असताना दिसून येत होती. पुरेशी भीक न मिळाल्यास सदर महिला मुलीला मारहाण करत होती. त्यामुळे याबाबत अधिक माहिती घेतली असता, अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील एका दाम्पत्याला सहा मुली आहे. त्यांच्याकडून सदर पुण्यातील दाम्पत्याने समाजातील पंचाच्या सहमतीने दोन हजार रुपयांना विकत घेतले. त्यासाठी जात पंचायतीने पैसे घेतल्याची माहिती मिळाली. समाजातील चारजणांनी त्या मुलीला विकत घेऊ नये यासाठी विरोध केला. परंतु समाजातील दहा पंचांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही. तसेच याप्रकारला मान्यता दिली, विरोध करणार्यांना जातीचे बाहेर काढून त्यांच्यावर बहिष्कार टाकला जाईल असा दम जातपंचायतीने दिला. त्यामुळे याबाबतची माहिती तक्रारदार यांना मिळाल्यावर त्यांनी पोलिसांकडे यासंर्दभात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अनिल जाधव व लक्ष्मण जाधव या दोनजणांना अटक केलेली आहे. याप्रकरणी पुणे पोलिस अधीक तपास करत आहेत.
COMMENTS