Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाढता जातीय तणाव चिंताजनक  

महाराष्ट्र राज्याची एक वेगळी ओळख आहे. छत्रपती शिवराय, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र म्हणून ओळख आह

झोपडपट्टी उजळवण्याचे गाजर !
उद्धव ठाकरे कुठे चुकले ?
पायाभूत सुविधांचा अभाव

महाराष्ट्र राज्याची एक वेगळी ओळख आहे. छत्रपती शिवराय, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र म्हणून ओळख आहे. संताची पंरपरा आणि विचार याच भूमीत रूजले, मात्र याच भूमीत गेल्या काही महिन्यांपासून जातीय तणाव वाढतांना दिसून येत आहे. विविधतेत एकता सांगणारा महाराष्ट्र आज जातीय तणावामध्ये कसा अडकत चालला, यावर विचारमंथन होणे गरजेचे आहे. तसेच या वाढत्या जातीय तणावाला वेळीच रोखण्याची गरज आहे, तरच आगामी काळ महाराष्ट्रासाठी सुख-समृद्धी आणि शांततेचा असेल, यात शंका नाही. महाराष्ट्र अशांत करण्याचे षडयंत्र गेल्या काही वर्षांपासून म्हणजेच 2018 पासून सुरू आहेत, आणि त्याचे पडसाद आजही उमटतांना दिसून येत आहे. सातारा जिल्ह्यात उसळलेली दंगल त्याचेच प्रतिबिंब असल्याचे दिसून येत आहे. गेल्या सहा महिन्यामध्ये नऊ शहरांमध्ये जातीय हिंसाचाराच्या बातम्या झळकल्या आहेत. यावरून या घटनांची तीव्रता लक्षात येते. रामनवमीच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगर शहरात झालेली दंगल, त्याचदिवशी मालाड-मालवणी भागात असलेला हिंसाचार आणि जळगावमध्ये प्रार्थनास्थळासमोर मोठ्याने ध्वनीक्षेपक लावण्यावरून सुरू झालेला वाद आणि त्यानंतर 13 मे रोजी अकोल्यात सोशल मीडियावरून उसळलेली दंगल, त्यात एकाचा मृत्यू, तर अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात छत्रपती संभाजीमहाराज जंयतीनिमित्त निघालेल्या मिरवणूकीत झालेला वाद आणि हिसांचार, नाशिक, संगमनेर, कोल्हापूर, सातारा या शहरातील जिल्ह्यातील घटना एकाएकी घडलेल्या नाहीत. तर त्या नियोजनबद्धरित्या घडवून आणल्या जात आहेत. महाराष्ट्राने नेहमीच शांततेची भूमिका घेत आंदोलने करत आपली भूमिका मांडली आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राला अशांत करण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्या प्रयत्नांना रोखण्याची गरज आहे. राज्य सरकार कसोशीने हा जातीय हिंसाचार, तणाव आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करत असले तरी, हे प्रयत्न अपुरे ठरतांना दिसून येत आहे. महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्‍न गंभीर होतांना दिसून येत आहे. मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाचा पेच वाढत चालला आहे. मराठा समाजानंतर चौंडीमध्ये धनगर समाजबांधवांकडून आरक्षणासाठी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मुस्लिम बांधव देखील आंदोलन करतांना दिसून येत आहे. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्‍न गंभीर होतांना दिसून येत आहे. त्यातच वाढता जातीय तणाव, औरंगजेबाचे उदात्तीकरण, आक्षेपार्ह पोस्टयामुळे तणाव वाढतांना दिसून येत आहे. हा तणाव रोखणे काळाची गरज आहे. दोन धर्म, दोन जातींमध्ये समन्वय साधून एकोपा राखणे आजची गरज आहे. मात्र याला तडा देण्यासाठी काही शक्ती पद्धतशीरपणे नियोजन आखतांना दिसून येत आहे. या देश महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या विचारावर मार्गक्रमण करणारा देश म्हणून या देशाची ओळख आहे. त्यामुळे जातीय तणावाला या देशात थारा नाही. महाराष्ट्रात तर संतपरंपरा आहे. त्यामुळे सर्व जाती-धर्माचे लोक एकोप्याने नांदत असतांना, अलीकडच्या काही दिवसांमध्ये नेमके काय झाले, की हा जातीय तणाव वाढतांना दिसून येत आहे. त्यामुळे हा हिंसाचार रोखण्याची खरी गरज आहे. त्याचबरोबर प्रत्येक वक्तव्याला धार्मिक रंग देणे चुकीचे आहे. प्रत्येक राजकीय नेत्याचे वक्तव्य असो की, धार्मिक पोस्ट असो त्यामध्येे आजकाल चुकीचे शोधण्याचा प्रयत्न मोठ्या प्रयत्नावर होतांना दिसून येत आहे. त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टीतून वादंग माजवण्याचा प्रयत्न होत आहे, आणि त्याला जातीय, धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, त्यामुळे या रंग देणार्‍या, दुही माजवणार्‍या बाबींना आळा घालण्याची खरी गरज समाजाची आहे, तरच एकोपा नांदेल आणि जातीय दंगली, हिंसाचार कमी होईल. 

COMMENTS