Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जतच्या तहसीलदारांकडून उत्खनन पंचनाम्यास टाळाटाळ

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तक्रार

कर्जत/प्रतिनिधी ः कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील शेतकरी रामचंद्र विठ्ठल जगताप यांच्या गट नंबर 913/3 मधील मुरूम व मातीचे बेकायदेशीरपणे उत्खनन करून

आमदारांनीच दिला महापालिकेत धरणे आंदोलन करण्याचा इशारा
मी कधीही पक्षीय राजकारण केले नाही :-माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड
संगमनेरमध्ये ईडीविरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन

कर्जत/प्रतिनिधी ः कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील शेतकरी रामचंद्र विठ्ठल जगताप यांच्या गट नंबर 913/3 मधील मुरूम व मातीचे बेकायदेशीरपणे उत्खनन करून मुरूम व माती गट नंबर 916/1 मध्ये टाकण्यात आली. याप्रकरणी जगताप यांनी 13 जून 2023 रोजी तहसीलदार यांच्याकडे तक्रार दाखल करून उत्खननाचा पंचनामा व संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली. मात्र तब्बल 85 दिवसानंतरही तहसीलदारांनी या उत्खननाचा पंचनामा व त्यावर कारवाई केली नाही. त्यामुळे शेतकर्‍याने राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देवून तहसीलदारांना मुरूम उत्खननाचा पंचनामा करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, कुळधरण येथील माझ्या नावे असलेल्या गट नंबर 913/3 मधील शेतात जेसीबीचा वापर करून भरत बापू खराडे, रा. कुळधरण, ता. कर्जत यांनी बेकायदेशीरपणे जेसीबी, पोकलेन मशिन लावून मुरूम व माती हे त्यांच्या व त्यांची पत्नी केशरबाई बापू खराडे यांच्या गट नंबर 916/1 मध्ये टाकले. 4-5 ट्रॅक्टरद्वारे ही वाहतूक करण्यात आली. काही महिन्यांपूर्वीही खराडे यांनी मुरुमाचे उत्खनन केले होते. पोकलेन व हायवा या वाहनांच्या क्रमांकासह ही तक्रार तहसील विभागाकडे करण्यात आली होती. एकूण 800 ते 1000 ब्रास उत्खनन केलेले आहे. एमएच 16, सीओ 3285 या जेसीबीद्वारे मुरूम व मातीचे मोठ्या प्रमाणावर उत्खनन करण्यात आले. या बेकायदा उत्खननाची लेखी तक्रार कर्जतचे तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली. उत्खनन स्थळाची पाहणी करून त्याचा पंचनामा करावा तसेच उत्खनन व वाहतूक करणारी वाहने व संबंधित व्यक्तींविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र आजपर्यंत महसूल विभागाकडून उत्खनन स्थळाचा पंचनामा करण्यात आलेला नाही. 913/3 गटातील खासगी क्षेत्रात मोठे उत्खनन केल्याने जमीनीचे मोठे नुकसान झाले असून जमीन नापीक झाली आहे. त्यामुळे शेतीतील उत्पन्न बंद झाले आहे. त्यामुळे मला उपजीविका करणे मुश्किल झाले आहे. या प्रकरणात तहसीलदार गणेश जगदाळे, नायब तहसीलदार कारंडे यांनी कुचराई करून संबंधित शेतकर्‍याची पाठराखण करत असल्याचे दिसत आहे. उत्खनन झालेल्या क्षेत्राचा पंचनामा करण्याबाबत त्यांच्याकडून टाळाटाळ केली जात आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी गेलो असता कर्जतच्या तहसील कार्यालयातील लिपिक नरोड हे उद्धटपणे बोलत असून अर्जाच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून तहसीलदार यांनी या प्रकरणात अर्ज दिल्याच्या 13 जून 2023 पासून कोणती कार्यवाही केली त्याची तपासणी करण्याचे आदेश देण्यात यावेत. तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या कामात दिरंगाई झालेली आहे. त्यामुळे 3 महिन्यानंतरही मुरूम व माती उत्खननाचा पंचनामा करण्यात आलेला नाही. त्याबाबत आपल्या स्तरावरून या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना द्यावेत. तसेच तहसीलदार यांच्या कामातील दिरंगाईबाबत योग्य कारवाई होवून उत्खनन क्षेत्राचा पंचनामा करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

COMMENTS