देशात एकाच दिवशी दोन लाखांहून अधिक रुग्ण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशात एकाच दिवशी दोन लाखांहून अधिक रुग्ण

देशात कोरोनाचा कहर अद्यापही सुरू असून दैनंदिन रुग्णसंख्येने दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

किरीट सोमय्यांना शहरात कायमची प्रवेशबंदी… नगरपालिकेने केला ठराव
IPL 2023 चा 57 वा सामना आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे
किरीट सोमैया यांनी कोल्हापुरात येऊन माझ्या कामाविषयी माहिती घ्यावी –  हसन मुश्रीफ

नवीदिल्ली : देशात कोरोनाचा कहर अद्यापही सुरू असून दैनंदिन रुग्णसंख्येने दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशात गेल्या 24 तासांत तब्बल दोन लाखांहून अधिक बाधित आढळले आहेत. तसेच सलग दुसर्‍या दिवशी एक हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 93 हजार 528 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. 

देशात गेल्या 24 तासांत दोन लाख 739 कोरोना रुग्ण आढळले असून 93 हजार 528 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच 1038 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासोबतच देशातील एकूण रुग्णसंख्या एक कोटी 40 लाख 74 हजार 564 वर पोहोचली आहे. आतापर्यंत एक कोटी 24 लाख 29 हजार 564 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. 14 लाख 71 हजार 877 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून मृत रुग्णांची संख्या एक लाख 73 हजार 123 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत 11 कोटी 44 लाख 93 हजार 238 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. बुधवारी देशात कोरोनाचे एक लाख 84 हजार 372 रुग्ण आढळले होते. दैनंदिन रुग्णवाढीचा हा आतापर्यंतचा उच्चांक होता; मात्र गुरुवारी रुग्णसंख्या दोन लाखांच्या पुढे गेली आणि नव्या उच्चांकाची नोंद झाली. बुधवारी कोरोनाने एक हजार 27 जणांचा बळी घेतला. गेल्या सहा महिन्यांतील कोरोनाबळींचा हा उच्चांक होता. देशात सर्वाधिक रुग्णवाढ महाराष्ट्रात नोंदवली जात आहे. इतर राज्यांतही रुग्णवाढ झपाट्याने होत असून, गेल्या 24 तासांत उत्तर प्रदेशात 20 हजार 512 नवे रुग्ण आढळले. याच कालावधीत तिथे 67 रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रापाठोपाठ छत्तीसगडमध्ये 156 कोरोनाबळींची नोंद झाली. 

इतर राज्यांतही कहर

छत्तीसगडमध्ये दैनंदिन रुग्णवाढीने 15 हजारांचा टप्पा ओलांडला. मध्य प्रदेशात दिवसभरात 8,998 रुग्ण आढळले तर 51 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. देशात फेब्रुवारी अखेरपासून कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ नोंदवली जात आहे. सुरुवातीला एकूण रुग्णवाढीमध्ये महाराष्ट्रातील रुग्णसंख्येचे प्रमाण निम्म्याहून अधिक होते. मात्र, आता महाराष्ट्राबरोबरच उत्तर प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड, मध्य प्रदेश आदी राज्यांत मोठी रुग्णवाढ होत आहे.

COMMENTS