धाराशिव प्रतिनिधी - धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील सोलापूर-हैद्राबाद मार्गावर ट्रकने ऑटोला धडक दिल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झा
धाराशिव प्रतिनिधी – धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील सोलापूर-हैद्राबाद मार्गावर ट्रकने ऑटोला धडक दिल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हे कुटूंब कर्नाटकातील अमृतकुंड येथे देवदर्शन आटोपून गावाकडे परतत असताना ही घटना घडली. ज्यात चौघे जागीच ठार असून, तिघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सोलापूर-हैद्राबाद मार्गावरील मन्नाळी येथे घडली. उमरगा तालुक्यातील सुंदरवाडी येथील सुनिल महादेव जगदाळे (३५) हे श्रावण सोमवारच्या निमित्ताने आई, पत्नी, मुलगी, भाची व अन्य दोघी, असे सात जण ऑटोरिक्षाने कर्नाटकच्या बसवकल्याण तालुक्यातील अमृतकुंड येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परत गावाकडे निघाल्यानंतर सोलापूर-हैद्राबाद महामार्गावरील मन्नाळी कॉर्नर येथे एका ट्रकने जगदाळे यांच्या ऑटोरिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर ऑटोरिक्षा दुभाजकावर चढला. त्याच क्षणी रस्त्यावर पडलेले प्रमिला सुनिल जगदाळे (३२) यांचा ट्रकखाली चिरडल्याने जागीच मृत्यू झाला. तर सुनिल जगदाळे, अनुसया महादेव जगदाळे (७०), पूजा विजय जाधव (१७, रा. शहापूर, ता. तुळजापूर) या तिघांचा उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिवाय, गीता शिवराम जगदाळे (४०) या गंभीर जखमी असल्याने उपचारासाठी लातूरला हलवण्यात आले आहे. लक्ष्मी सुनिल जगदाळे (८) व अस्मिता शिवराम जगदाळे (१०) या जखमी मुलींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अपघाताचे वृत्त कळताच बसवकल्याणचे आमदार शरणू सलगर यांनी अपघातस्थळी भेट दिली. तर उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.
COMMENTS