मुंबई/प्रतिनिधी ः केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क 40 टक्क्यांनी वाढवल्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांमध्ये संताप असतांनाच, मंगळवारी केंद्र सरक
मुंबई/प्रतिनिधी ः केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क 40 टक्क्यांनी वाढवल्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांमध्ये संताप असतांनाच, मंगळवारी केंद्र सरकारने दोन टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महायुतीमध्ये चांगलीच श्रेयवादाची लढाई रंगतांना दिसून येत आहे. कांदा प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. त्यापाठोपाठ सध्या जपान दौर्यावर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्वीट करत केंद्र सरकारने दोन टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला.
धनंजय मुंडे हे पियुष गोयल यांना भेटण्यापूर्वीच जपानमध्ये असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवरून बातचीत केली. तसेच पियुष गोयल यांनाही फोन करून याप्रकरणी काय तोडगा काढता येईल याबाबत चर्चा केली. त्यापाठोपाठ फडणवीस यांनी ट्वीट करून कांदा प्रश्नावर केंद्र सरकार काय काय करतंय याबाबत माहिती दिली. त्यामुळे कांदा प्रश्नावर भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचे चर्चा रंगली आहे. दरम्यान, कांदा प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी श्रेयवादाच्या लढाईबाबत प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार म्हणाले, धनंजय मुंडे पियुष गोयल यांना भेटले, देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून माहिती दिली तर यात तुमची अडचण काय? दोघेही सरकारमधील घटक आहेत. ही श्रेयवादाची लढाई अजिबात नाही. आम्ही या असल्या लढाईत नाही. आम्ही शेतकर्याला मदत करण्याच्या भूमिकेत आहोत.
COMMENTS