मुंबई/प्रतिनिधी ः राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बुधवारी सकाळी सुरू होताच विरोधकांनी संभाजी भिडेंना अटक करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेत गदारोळ घातला. सं
मुंबई/प्रतिनिधी ः राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बुधवारी सकाळी सुरू होताच विरोधकांनी संभाजी भिडेंना अटक करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेत गदारोळ घातला. संभाजी भिडेंना अटक करण्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. भिडेंना अटक करा नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा घोषणा यावेळी विरोधकांनी दिल्या. राष्ट्रपुरुषांचा अपमान करणार्या भिडेंना अटक झाली पाहिजे, म्हणत विरोधक आक्रमक झाले आहेत. गांधी टोपी घालत त्यांनी विधानसभेच्या पायर्यांवर आंदोलन केले.
सभागृहात भिडे यांना अटक करण्याची मागणी होत आहे. काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेतच संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे. तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी तर भिडे यांना असेल तिथून उचलून अटक केली पाहिजे, अशी मागणी केली आहे. यावर निवेदन करतांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महापुरूषांचा अवमान करण्याचा अधिकार कुणालाही नसून, त्याविरोधात कारवाई करण्यात येईल. संभाजी भिडेंनी अमरावतीत आपल्या सहकार्याला पुस्तक वाचायला लावले आणि त्यातील आशयावरून काही कमेंट केल्या. ही दोन पुस्तके डॉ. एस. के. नारायणाचार्य व डॉ. घोष यांची आहेत. ते काँग्रेसचे नेते आहेत असे त्यांचे म्हणणे आहेत. त्यांच्या पुस्तकातील मजकूर भिडेंनी त्यांच्या सहकार्यामार्फत उद्धृत केला. अमरावती राजापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्हाला ते संभाजी भिडे गुरुजी वाटतात. त्यांचे नाव गुरुजी आहे. त्यांना नोटीस पाठवली आहे. अमरावती पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली आहे. त्यानुसार चौकशी होईल. अमरावतीतील सभेचे व्हिडीओ उपलब्ध नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. माध्यमात जे व्हायरल होत आहे, त्याचे व्हॉइस सॅम्पल घेण्यात येतील, असे अमरावती पोलिसांनी सांगितले आहे. कुठल्याही राष्ट्रीय नेत्याच्या संदर्भात कुणीही अवमानकारक वक्तव्य केले, तर त्यांच्यावर कारवाई होईल. संभाजी भिडे गुरुजी हे हिंदुत्वाकरता काम करतात. छत्रपती शिवाजी महाराजांशी बहुजन समाजाला जोडतात. तरीही त्यांना महापुरुषांवर असे वक्तव्य करण्याचा कुणीच अधिकार दिलेला नाही. तसा अधिकार कुणालाच नाही. त्यामुळे असे करणार्यांवर कारवाई होईल, असे यावेळी फडणवीसांनी स्पष्ट केले.
संभाजी भिडे बोगस माणूस : पृथ्वीराज चव्हाण – संभाजी भिडे बोगस माणूस आहे. अनेक ठिकाणी जाऊन राज्यातील समाजसेवक आणि देव देवतांवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तसेच खालच्या पातळीवर जाऊन टीका करतो आणि हा माणूस मोकाट फिरत आहे. भिडे मुक्तपणे वावरत आहे त्याला पोलिस संरक्षण दिले गेले. ज्या अर्थी सरकार कुठलीही कारवाई करत नाही त्यामागे पोलिसांचे संरक्षण त्याला मिळालेले आहे. या माणसाला एवढे संरक्षण कसे मिळते निवडणुकीला फायदा करून घेण्यासाठी हे उद्योग सुरू नाहीत ना? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात उपस्थित केला. पृथ्वीराज चव्हाणांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. भिडे यांना कोणतीही सुरक्षा पुरवली नसल्याचे फडणवीस म्हणाले.
COMMENTS