मुंबई/प्रतिनिधी ः सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष यांना शिवसेनेतील त्या 16 आमदारांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय लवकरच घेण्यासंदर्भात दिलेल्य
मुंबई/प्रतिनिधी ः सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष यांना शिवसेनेतील त्या 16 आमदारांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय लवकरच घेण्यासंदर्भात दिलेल्या निर्देशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तातडीने बैठक बोलावली आहे. या बैठकीत आमदार अपात्रते संदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
16 आमदार अपात्रते संदर्भात राहुल नार्वेकर यांनी शिंदे आणि ठाकरे गटाच्या आमदारांना नोटिसा दिल्या होत्या. याला उत्तर मिळाल्यावर ही बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत किती आमदारांनी नोटीसला उत्तर दिले आणि किती आमदारांनी मुदतवाढ मागितली याचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस जारी केली होती. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा कालावधी त्यांनी दिला होता. अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी शिंदे गटाच्या आमदारांना सबळ पुरावे सादर करावे लागणार आहे. याशिवाय बंडखोर आमदारांच्या पुराव्यांनी समाधान न झाल्यास विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे शिवसेनेच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करू शकतात. दरम्यान, आमदारांना नोटिस दिल्यावर त्यांनी त्याला उत्तर दिले आहे. त्यानंतर राहुल नार्वेकर यांनी ही बैठक बोलावली आहे. शिवसेनेच्या मूळ घटनेचा अभ्यास करून यावर निर्णय घेतला जाईल असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. त्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेची मागणी केली. निवडणूक आयोगाकडून घटनेची प्रत मिळताच त्यांनी कारवाईला सुरुवात केली आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना शिवसेनेतून बंड केलेल्या पहिल्या 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर अन्य 24 आमदारांना नोटीस जारी करण्यात आली. त्यामुळं नियमानुसार पहिल्या याचिकेवर अर्थात 16 आमदारांच्या प्रकरणाचा निकाल देण्यात येणार आहे. 16 आमदारांच्या यादीत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, संजय शिरसाट, तानाजी सावंत, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, भरत गोगावले, लता सोनवणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, महेश शिंदे, अनिल बाबर, संजय रायमूलकर, बालाजी कल्याणकर आणि रमेश बोरनारे यांचा समावेश आहे.
COMMENTS