मुंबई/प्रतिनिधी ः मुंबईतील कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी ईडीने दोन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले
मुंबई/प्रतिनिधी ः मुंबईतील कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी ईडीने दोन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे संजय राऊत यांच्या जवळचे असल्याचे बोलले जात आहे. सुजीत पाटकर आणि डॉक्टर किशोर बिसुरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यामुळे ठाकरे गटात खळबळ उडाली आहे.
किशोर बिसुरे हे बीएमसीचे डॉक्टर आहेत, तसंच दहिसर कोविड फील्ड हॉस्पिटलचे डीन होते. दहिसर कोविड फील्ड हॉस्पिटलचा करार सुजीत पाटकर यांच्या लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंटशी करण्यात आला होता अशी माहिती आहे. या दोघांना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सुजित पाटकर यांच्यावर 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्या प्रकरणाची ईडीने दखल चौकशी केली होती. सुजीत पाटकर यांची अनेकदा चौकशीही केली होती. तसेच त्यांच्या घरावर छापेमारीही केली होती. त्यानतंर अखेर त्यांना आज अटक करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात ईडीचा तपास सुरू आहे. ईडीने मुंबईत अनेक ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी यात असल्याचे झाडाझडतीत समोर आले आहे. या कथित घोटाळ्याची व्याप्ती वाढत असून, तपासात अनेक धक्कादायक बाबी उघड होत आहेत. सुजीत पाटकर यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे पदाधिकारी सुरज चव्हाण हेही ईडीच्या रडारवर होते. गेल्या महिन्यात ईडीने सुरज चव्हाण यांच्यासह 15 जणांच्या घरावर छापे मारले होते. यात महापालिकेच्या तत्काली अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांचाही समावेश होता. सुरज चव्हाण यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी ही धाड टाकली होती. चव्हाण यांची चौकशीही करण्यात आली होती. कोव्हिड घोटाळ्या संदर्भातच चव्हाण यांचीही चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता ईडीने पाटकर यांना अटक केल्यामुळे सुरज चव्हाण यांच्यावरही अटकेची टांगती तलवार असल्याचे सांगितले जात आहे.
100 कोटींचा कोविड सेंटर घोटाळा – कोरोना काळात लाईफलाईन कंपनीने वैद्यकीय साहित्य खरेदीत घोटाळा केला होता. हा 100 कोटींचा घोटाळा होता. ही कंपनी सुजीत पाटकर यांची होती. वाढीव दरात वैद्यकीय साहित्य खरेदी करण्यात आले होते. आरोग्य क्षेत्रातील कोणत्याही कामाचा अनुभव नसतानाही लाईफलाइ कंपनीला टेंडर देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच ईडीने ही मोठी कारवाई केली आहे.
COMMENTS