मुंबई ः खारघर येथे शिंदे सरकारने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यात 14 श्रीसेवकांचा उष्माघाताने मृत्यू झाला होता. 16 एप्रिलरोजी ही दुर्घ

मुंबई ः खारघर येथे शिंदे सरकारने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यात 14 श्रीसेवकांचा उष्माघाताने मृत्यू झाला होता. 16 एप्रिलरोजी ही दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी शिंदे सरकारने चौकशी समिती नेमली होती. तसेच, एका महिन्यात अहवाल देण्याचे आदेश दिले होते. मात्र, आज या चौकशी समितीला शासनाने आणखी एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. दोन महिने उलटूनही ही दुर्घटना नेमकी का घडली? दुर्घटनेला कोण जबाबदार? याबाबतच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे. 16 एप्रिल रोजी भरउन्हात ‘महाराष्ट्र भूषण’ सोहळा आयोजित केल्याने सोहळ्याला उपस्थित शेकडो लोकांना उष्माघाताचा त्रास झाला होता. त्यातील 14 जणांनी त्यांचे जीव गमावले आणि अनेकांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यावरून विरोधी पक्षांनी सत्ताधारी शिंदे-भाजप सरकार जोरदार टीका केली होती. तसेच, या दुर्घटनेला जबाबदार कोण? याबाबत चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीसाठी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती नेमली होती. ही समिती महिनाभरात आपला अहवाल सादर करेल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले होते. मात्र महिनाभरात अहवाल सादर झालाच नसल्याने या समितीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
COMMENTS