दांडेकर पुलाजवळील सर्व्हे नंबर 133 येथील आंबील ओढ्यालगत असलेली अतिक्रमणे हटविण्याच्या महापालिकेच्या कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
पुणे/प्रतिनिधी: दांडेकर पुलाजवळील सर्व्हे नंबर 133 येथील आंबील ओढ्यालगत असलेली अतिक्रमणे हटविण्याच्या महापालिकेच्या कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. न्यायालयाने हा आदेश दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने तात्काळ कारवाई थांबवली आहे. जेसीबी मशीन परत जात असताना स्थानिक रहिवाशांनी जोरदार जल्लोष केला. तसेच, काही संतप्त नागरिकांनी पालिकेच्या अधिकार्यांना साडी भेट देण्याचा प्रयत्न केला.
आंबील ओढ्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत. ओढ्यामध्ये भर टाकून बांधकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात आसपासच्या परिसरात पाणी तुंबते. तसेच, मोठे नुकसान होते, असे महापालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळेच येथील अतिक्रमणे हटविण्याची नोटीस महापालिकेने काढली होती. त्यानुसार आजपासून कारवाई सुरू करण्यात आली; मात्र ही नोटीस बिल्डरच्या लेटरहेडवरून काढली असून त्याच्या हुकूमावरून ही कारवाई सुरू असल्याचे सांगत स्थानिक नागरिकांनी जोरदार विरोध केला. या परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर करण्यात आला आहे. त्यासाठी महापालिकेकडून ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घालण्यात आल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. ही जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न असून त्यात लोकप्रतिनिधींचाही हात आहे, असा आरोप करत नागरिकांनी कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला. त्यातून पोलिस आणि स्थानिकांमध्ये जोरदार झटापट झाली. सुमारे आठ तास महापालिका प्रशासन व पोलिस अतिक्रमणे काढण्यासाठी प्रयत्न करत होते; मात्र नागरिक मागे हटायला तयार नव्हते. काहींनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. हनुमंत फडके यांनी या संदर्भात महापालिका न्यायालयात धाव घेतली. फडके यांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी काही कागदपत्रेही न्यायालयात सादर केली. त्यावर तातडीची सुनावणी झाली. सुनावणीअंती न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत कारवाईला स्थगिती देत महापालिकेकडून स्पष्टीकरण मागवले आहे. त्याअगोदर ’आमची घरं तोडण्याचं काम सुरु आहे. आम्ही जायचं कुठे, पोलिसांनी आमच्या लोकांना चौकात नेलं. काही लोकं दुसर्या ठिकाणी गेले. खाली जाऊन बघितलं तर सगळी घरे तुटली,’ असा आक्रोश एका चिमुकल्यानं केला. महापालिकेने आज सकाळी सात वाजता आंबिल ओढ्यालगतच्या घरावर कारवाई केली आहे. या वेळी नागरिकांनी महापालिकेने कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई केल्याचा आरोप केला आहे. भाडोत्री कामगार आणून लोकांच्या घरातील साहित्य बाहेर काढले, पोलिसांनी विरोध करणार्यांना उचलून नेले आणि कारवाई करण्यात आली, असे स्थानिकांचं म्हणणं आहे.
अतिक्रमणात मोठा गैरव्यवहार
दरम्यान, या अतिक्रमणामागे मोठा आर्थिक गैरव्यवहार आहे, असा आरोप काँग्रेस नेते अरविंद शिंदे यांनी केला आहे. पुणे महापालिकेचे सत्ताधारी आणि बिल्डरचे लागेबंधे असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.
COMMENTS