मुंबई : समाज माध्यमांवर प्रभाव असणारी कोकणची हार्टगर्ल अंकिता प्रभू वालावलकर अर्थात कोकण हार्टेड गर्लने काही दिवसांपूर्वी मराठीतील ज्येष्ठ अभिनेत
मुंबई : समाज माध्यमांवर प्रभाव असणारी कोकणची हार्टगर्ल अंकिता प्रभू वालावलकर अर्थात कोकण हार्टेड गर्लने काही दिवसांपूर्वी मराठीतील ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांचा एक व्हिडिओ शेअर केला होता. ती जेव्हा गिरगावात शूट करण्यसाठी गेली होती तेव्हा तिला माहिमकर काका भेटले होते आणि त्यांनी तिच्याकडे काम देण्याची विनंती केली. अंकिता आता पुन्हा एकदा माहिमकर काकांपर्यंत पोहोचली आणि तिने त्यांचा आणखी एक व्हिडिओ शेअर केलाय, ज्यात ती काकांना धीर देताना दिसतेय. अंकिताने शेअर केलेल्या व्हिडिओच्या सुरुवातीला अभिनेते मनमोहन माहिमकर त्यांच्यावर ओढावलेल्या परिस्थितीमुळे रडताना दिसत आहेत. त्यावर अंकिता त्यांना सांगते की काका आता रडायचं नाही तर आपल्याला लढायचं आहे. तिच्या बोलण्याने त्यांना धीर मिळतो. अंकिता पुढे म्हणते की, ‘काकांना काम मिळावं यासाठी आमचे प्रयत्न चालूच आहेत. स्वेच्छामरणासाठी काकांनी जो अर्ज लिहिला आहे तो मी आज हातात घेतला आणि त्यांना सांगितलं की असा अर्ज वगैरे आपल्याला काही करायचं नाहीये. त्यांनी मला त्यांचे जुने फोटो, आर्टिकल्स दाखवले. मीडियाही त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे. सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे.’ अंकिताने आशा व्यक्त केली की माहिमकर काकांना लवकरच काम मिळेल. या व्हिडिओच्या शेवटी अंकिता गंमतीने त्यांना विचारते की काका मी लग्न करावं का? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तरही ऐकण्यासारखं आहे. माहिमकर म्हणाले की, ‘तुम्ही तर लग्न केलं पाहिजे. लग्नाशिवाय राहू नये. वय झालं की माणसाला त्रास होतो. आता आपल्याला वाटतं, पण पुढे म्हाताऱ्या माणसाला आधार मिळतो. आधारासाठी लग्न करायचं.’ गिरगावमध्ये काही दिवसांपूर्वी अंकिता तिच्या एका शूटिंगनिमित्त पोहोचली होती. तेव्हा तिची भेट ज्येष्ठ मराठी अभिनेते मनमोहन माहिमकर यांच्याशी झाली. काम मिळत नसल्याने काकांनी इच्छामरणाची इच्छा व्यक्त केल्याचे अंकिताने तिच्या व्हिडिओद्वारे सांगितले. त्यांनी अंकिताकडे विनंती केली होती की, ‘मुली मला काम देशील का गं? मला कामाची फार गरज आहे.’ अंकिता म्हणाली की त्यांच्या डोळ्यातील ते पाणी बघून तिलाही खूप वाईट वाटलं होतं. कारण एका कलाकाराला तिच्याकडे काम मागण्याची वेळ आली होती. माहिमकर यांनी तिला सांगितले की त्यांचे लग्न झालेले नाही, वेळ घालवण्यासाठी कुटुंब नाही. ते इच्छामरणासाठीही तयार होते, पण भारतात तसा अर्ज देता येत नाही. अंकिताने सांगितल्यानुसार माहिमकर यांना केवळ पैसे नको आहेत तर त्यांना काम हवं आहे. अंकिताने शेअर केलेल्या व्हिडिओवर अनेकांनी मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
COMMENTS