Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही उभी फूट

अजित पवारांचे बंड उपमुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील रविवारची सकाळ पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडविणारी ठरली असून, राष्ट्रवादी काँगे्रसच्या 30 आमदारांनी बाहेर पडत सत्तेत सहभ

चक्क! गुन्हेगारच रक्ताच्या थारोळ्यात l LokNews24
बालाघाटवर पाच प.स. गणातील मतदारांचा एकमुखी पाठिंबा
दिवाळीत एसटी महामंडळ मालामाल

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील रविवारची सकाळ पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडविणारी ठरली असून, राष्ट्रवादी काँगे्रसच्या 30 आमदारांनी बाहेर पडत सत्तेत सहभागी होणे पसंद केले. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अजित पवारांनी साडेतीन वर्षांमध्ये तीनवेळेस उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याचे पहायला मिळत आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ तर, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
राष्ट्रवादीच्या 54 आमदारांपैकी 36 आमदारांना सोबत घेऊन अजित पवार सरकारमध्ये सामील झाले आहेत. राज्यपाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, या सर्व नाट्यमय घडामोडींवर आपण शरद पवारांशी बोललो आहोत. आपण खंबीर असल्याचे शरद पवारांनी आपल्याला सांगितले असल्याचे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. राज्यात सकाळीच मंत्रिमंडळ विस्ताराचे सूत्र हलत होते. त्यासंदर्भात  मंत्रिमंडळ विस्तार होणार असेल तर आमची संपूर्ण तयारी झाली आहे, अशी महत्त्वाची माहिती राजभवनाकडून सकाळीच देण्यात आली होती. तसेच, अजित पवारांनीही रविवारी सकाळी मुंबईत तातडीने राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यामुळे सकाळपासूनच अजित पवार सरकारमध्ये सामील होणार व त्यांचा शपथविधी होणार या चर्चांना उधाण आले होते. राष्ट्रवादीचे 54 पैकी 36 आमदार अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळे शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे. अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीला दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, नीलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील अतुल बेनके, सुनील टिंगरे, अमोल मिटकरी, अदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे हे सर्व नेते सरकारमध्ये सामील झाले आहेत.

दरम्यान, अजित पवार यांच्यासोबत जे आमदार सरकारमध्ये सामील झाले आहेत, त्यातील बहुतांश आमदार राष्ट्रवादीत परत येतील, अशी माहिती आता सुत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते हजर झाले आहेत. दरम्यान, आजचा शपथविधी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत भूमिका नाही, असे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी सांगितले आहे. महेश तपासे म्हणाले की, भाजपच्या ऑपरेशन लोटसचा हा भाग आहे. काही आमदार शरद पवारांसोबत गेले असले तरी कार्यकर्ते अजूनही शरद पवारांसोबत आहेत.

विकासाचा नवा अध्याय ः उपमुख्यमंत्री फडणवीस – शपथविधीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज जे घडले ते महाराष्ट्राच्या हिताचे आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्राच्या विकासाचा नवीन अध्याय लिहू. आम्ही तिघे मिळून महाराष्ट्राच्या विकासाला आणखी गती देऊ. राज्याला अतिशय प्रगल्भ सरकार देवू असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

ट्रिपल इंजिन सरकार ः मुख्यमंत्री शिंदे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आमचे पूर्वी डबल इंजिनचे सरकार होते. ते आता ट्रिपल इंजिनचे सरकार झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा विकास आता बुलेट ट्रेनच्या वेगाने होईल. आमच्या डबल इंजिनच्या सरकारला आता आणखी एक डबा जोडला गेला आहे. अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्याने महाराष्ट्राच्या जनतेचाच फायदा होणार आहे.

प्रफुल्ल पटेलांना मिळणार केंद्रात मंत्रिपद – अजित पवारांसोबत राष्ट्रवादी काँगे्रसचे नवनियुक्त कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल देखील अजित पवारांसोबत असल्यामुळे या बंडात पटेल देखील सामील झाले असून, त्यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र तत्पूर्वी सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना समजवायचा प्रयत्न केला. पण अजित पवार ऐकायला तयार नव्हते. महत्त्वाचे म्हणजे शरद पवारांचे विश्‍वासू प्रफुल्ल पटेल व छगन भुजबळही शिंदे गट-भाजपसोबत सरकारमध्ये सामील झाले आहेत. दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS