लस, इंजेक्शन व ऑक्सिजन…जिल्ह्यात खडखडाट ; आरोग्य सेवा कोलमडण्याच्या स्थितीत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लस, इंजेक्शन व ऑक्सिजन…जिल्ह्यात खडखडाट ; आरोग्य सेवा कोलमडण्याच्या स्थितीत

कोविशिल्ड लस संपली आहे...रेमडीसिवीर इंजेक्शनचाही तुटवडा जाणवत आहे व आता रुग्णांसाठी ऑक्सिजनही केवळ एक दिवस पुरेल एवढा राहिला आहे.

कोपरगावात ब्लॅक बेल्ट कराटे कॅम्प परीक्षा उत्साहात
धक्कादायक! अल्पवयीन मुलाने घेतला गळफास
निलंबनातून शिक्षकांची हानी मात्र प्रशासनाची चांदी

अहमदनगर/प्रतिनिधी-कोविशिल्ड लस संपली आहे…रेमडीसिवीर इंजेक्शनचाही तुटवडा जाणवत आहे व आता रुग्णांसाठी ऑक्सिजनही केवळ एक दिवस पुरेल एवढा राहिला आहे. जिल्ह्याची आरोग्यसेवा कोलमडून पडण्याच्या स्थितीत आहे. यामुळे जिल्हा प्रशासन अस्वस्थ झाले असून, शुक्रवारी सायंकाळी बैठकांवर बैठकांतून नियोजन सुरू होते. दरम्यान, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना शनिवारच्या जिल्हा दौर्‍यात आरोग्य सेवेच्या अनेक प्रश्‍नांना सामोरे जावे लागणार आहे. 

जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची वाढ मोठ्या प्रमाणावर होत असतानाच दुसरीकडे आता रेमडीसिवीर इंजेक्शनबरोबरच ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. अवघा एक दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक असल्यामुळे प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे शहर व जिल्ह्यात पुन्हा कोरोनावरील कोविशील्ड लसीचा तुटवडा निर्माण झाला असून, गुरुवारी नगर शहर व जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांसह जिल्हा शासकीय रुग्णालय, तालुका उपजिल्हा रुग्णालये व आरोग्य केंद्रातील लस संपल्याने अनेकांना लस न घेतात परतावे लागले आहे. जिल्ह्याला आतापर्यंत कोविड लसीचे तीन लाख डोस मिळाले आहे. लसीकरण देखील 3 लाखांच्या पुढे झाले आहे. जिल्ह्याला आतापर्यंत तब्बल पंधरा वेळा कोरोना डोस प्राप्त झालेले आहेत. पहिल्या टप्प्यात लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळाला होता. मात्र, फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढताच लसीकरण प्रतिसाद देखील वाढला होता. नगर शहर व जिल्ह्यात सर्व खासगी व शासकीय यंत्रणेमार्फत 14 हजार जणांचे दररोज लसीकरण केले जात आहे. मागणी वाढल्याने लसीचा देखील मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवू लागला आहे. गुरुवारी नगर शहरातील व जिल्ह्यातील सर्वच यंत्रणेकडे लस शिल्लक नव्हती, त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना लस न घेताच परतावे लागले आहे. दरम्यान कोविशिल्ड लस संपली असली तरी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचे 12 हजार 500 डोस गुरुवारीच जिल्हा आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाले आहेत. मात्र, हे डोस केवळ जिल्हा शासकीय रुग्णालय व तालुका उपजिल्हा रुग्णालयांमध्येच उपलब्ध आहेत.

 तेथे इंजेक्शन्स नाहीत

प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयातच ऑक्सिजन बेड व रेमडिसिवीर इंजेक्शनच्या उपलब्धतेसाठी नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. या नियंत्रण कक्षामार्फत रेमडेसिवीरसाठी पंधरा मेडिकलचे नंबर देण्यात आले आहे. मात्र, त्यापैकी कुठल्याही मेडिकलमध्ये गुरुवारी रेमडेसिवीर उपलब्ध नव्हते. जिल्ह्यामध्ये गेल्या आठवडाभरात रुग्णांची संख्याही सातत्याने वाढत चालली आहे. बाधित रुग्णांचा रोजचा आकडा तीन हजाराच्या पार झाला आहे. त्यातच रुग्ण वाढत असल्यामुळे जिल्हा रुग्णालय व खासगी दवाखाने सुद्धा रुग्णांनी भरले आहेत. चार दिवसांपूर्वी खासगी दवाखान्यांमध्ये 80 टक्के जागा आरक्षित ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याची अंमलबजावणी कमी-अधिक प्रमाणामध्ये सध्या पाहायला मिळत आहे. जिल्ह्यामध्ये इंजेक्शनचा काळा बाजार उजेडात आला होता. कोतवाली व भिंगार हद्दीमध्ये दोन ठिकाणी कारवाया करण्यात आल्या आहेत. जे ब्लॅक करून त्याची विक्री करत होते, त्यांना गजाआड करण्यात आले. मात्र, भिंगार येथे ज्या ठिकाणी ही घटना घडली, तेथील रुग्णाचे हाल होत आहे. त्यांना इतरत्र हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक रुग्णांचे नातेवाईकांनी थेट जिल्हा प्रशासनाकडे धाव घेऊन याची माहिती दिली आहे. जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन व वेंटिलेटरचे बेड उपलब्ध नाही अशी अवस्था झाली आहे. जिल्ह्यामध्ये अवघा एक दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजनच्या साठा शिल्लक असल्यामुळे प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी भोसले यांनी दोन दिवसांपूर्वी आरोग्य संघटनेच्या पदाधिकार्‍यांसोबत बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चाही केली होती. त्यात रेमडीसिवीर इंजेक्शन कशा पद्धतीने उपलब्ध करता येईल, यासंदर्भात चर्चा झाली होती. पण आता नवा पेच हा ऑक्सिजनच्या तुटवड़्याचा निर्माण झाला आहे. तो वेळेत मिळाला नाही तर अनेकजणांचे हाल होणार आहेत. एकीकडे ऑक्सिजनचे बेड मिळाला तयार नाहीतर आता बेड मिळाला तर त्याला ऑक्सिजन मिळत नाही, अशी बिकट अवस्था नगर जिल्ह्यामध्ये झाली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी भोसले यांनी एमआयडीसी येथील असलेल्या काही कंपन्यांना नोटीस पाठवून तेथील सर्व ऑक्सिजन ताब्यात घेतला असल्याचे समजते.

पालकमंत्र्यांसमोर आव्हान

पालकमंत्री हसन मुश्रीफ शनिवारी जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. कोपरगाव शिर्डी येथे ते कोविड सेंटरला भेट देणार आहेत न जिल्हा प्रशासनसमवेत दुपारी बैठकीचे नगर येथे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा होणार आहे. त्यातच नागरिकांचे प्रश्‍न व सध्याची सुरू असलेली लस, इंजेक्शन व ऑक्सिजन गैरसोय याचेसुद्धा आव्हान आता प्रशासन समोर उभे आहे. त्यामुळे पालकमंत्री काय निर्णय घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS