सातारा / प्रतिनिधी : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातर्फे बुध्द पौर्णिमेनिमित्त घेण्यात आलेल्या निसर्गानुभव कार्यक्रम 2023 अंतर्गत मचाणावरील वन्य प्
सातारा / प्रतिनिधी : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातर्फे बुध्द पौर्णिमेनिमित्त घेण्यात आलेल्या निसर्गानुभव कार्यक्रम 2023 अंतर्गत मचाणावरील वन्य प्राणी गणनेत निसर्गप्रेमींना एकूण 374 वन्यप्राण्यांचे दर्शन घडले असल्याची माहिती सह्याद्री व्यघ्र प्रकल्पाचे उपसंचालक यु. एस. सावंत यांनी सांगितले.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोयना, बामणोली, चांदोली, ढेबेवाडी आणि हेळवाक या वन परिक्षेत्रांतील जंगलातील 60 मचाणावर बसून अरण्य वाचनाचा अनुभव घेण्याची संधी निसर्गप्रेमींना मिळाली. या वन्य प्राणी गणनेत बिबट्यासह एकूण 18 सस्तन वन्य प्राणी प्रजातींचे तसेच 10 वन्य पक्षी प्रजातींचे दर्शन निसर्गप्रेमींना घडले. मागील वर्षी 54 मचाणींवर एकूण 308 वन्य प्राण्यांची नोंद करण्यात आली होती.
दि 5 जानेवारी 2010 रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आला आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ 1165.57 चौ. किमी आहे. व्याघ्र प्रकल्प हा सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यात येतो. पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा एकमेव आहे. येथील जंगल हे सह्याद्रीतील उर्वरित घनदाट व चांगल्या श्रेणीतील शिल्लक राहिलेले जंगल आहे. पश्चिम महाराष्ट्राला समृध्द करणार्या कोयना व वारणा जलाशयाचे गाळान भरण्यापासून संरक्षण हे जंगल करत आहे. 15 नद्यांचा उगम या जंगलातून होतो. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा भाग असलेले कोयना वन्यजीव अभयारण्य आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान हे युनेस्कोने घोषित केलेले जागतिक नैसर्गिक वारसास्थळ आहे. तसेच Birdlife International या जागतिक संस्थेने Important Bird area म्हणून घोषित केले आहे. येथिल जैवविधतेसाठी व्याघ्र प्रकल्प प्रसिध्द आहे.
COMMENTS