बेंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले
बेंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून देशभरातून प्रतिक्रीया उमटू लागल्यानंतर खर्गे यांनी आपल्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केलीय.
कर्नाटकच्या निवडणूक प्रचारात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विषारी साप म्हंटले होते. त्यांच्या या विधानानंतर भाजपने त्यांच्या विरोधात देशभरात टीकेची झोड उठवली. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी हुबळी येथे बोलताना म्हटले की, आज काँग्रेस कोणत्या प्रकारचे विष ओकत आहे, हे देश पाहत आहे. काँग्रेस नेत्याने पंतप्रधान मोदींवर अपमानास्पद टिप्पणी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशा शेरेबाजीने त्यांनी कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचा पराभव निश्चित केला आहे. हे शब्द खर्गेंचे असतील, पण हे विष गांधी घराण्याचे आहे असा घणाघात ईराणी यांनी केले. तर महाराष्ट्रातही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मल्लिकार्जुन खर्गेंचे मानसिक संतुलन ढळले आहे, म्हणूनच ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वारंवार वाईट बोलतात, अशी टीका त्यांनी केली. कर्नाटक निवडणुकीत खर्गेंनी सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्या. गांधी परिवाराला मोदीजींबद्दल आकस आहेच. ’मौत का सौदागर’पासून सुरु झालेला काँग्रेस नेत्यांचा पोटशूळ आज ’जहरीला साप ’इथंपर्यंत पोचला. यांना कधीच चांगले शब्द सापडत नाहीत. बोलताही येत नाहीत. त्यांच्या शब्दकोशातच नाहीत. त्यांची सत्ता गेली, राज्ये गेली, मतदार गेले, समर्थक गेले, नेते गेले, खासदारकी गेली, घर गेले पण डोक्यातली विकृत विचारांची मस्ती जात नसल्याची टीका बावनकुळे यांनी केली.
वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण देताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, माझ्या विधानाने कुणाच्या भावना दुखावल्या असतील. वक्तव्याचा चुकीचा अर्थ निघाला असेल आणि कुणाला दु:ख झाले असेल तर मी त्यासाठी खेद व्यक्त करतो. आमच्यात वैचारिक मतभेद असू शकतात. आरएसएस-भाजपा यांची विचारधारा विषारी आहे. माझे विधान वैयक्तिक पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा कुठल्याही व्यक्तीसाठी नव्हते असे स्पष्टीकरण खर्गेंनी दिले. पंतप्रधानींशी आमची वैयक्तिक लढाई नसून ही वैचारिक लढाई आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. परंतु, नकळत कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर तो माझा हेतू कधीच नव्हता आणि माझ्या प्रदीर्घ राजकीय जीवनाचा तो आचारही नाही. मी नेहमीच मित्र आणि विरोधकांसाठी राजकीय शुद्धतेचे नियम आणि परंपरांचे पालन केले आहे आणि माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते करेन असेही खरगेंनी म्हंटले आहे.
COMMENTS