मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येत असून, राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते शरद पवार यांनी पक्षात सर्व काही आलबेल असल्याचे स्पष्ट केल
मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येत असून, राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते शरद पवार यांनी पक्षात सर्व काही आलबेल असल्याचे स्पष्ट केले असले आणि अजित पवार यांनी देखील आपण शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे निक्षून सांगितले असले तरी, बंडाच्या चर्चां थांबायला तयार नाहीत. कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले ट्विट पुरेसे बोलके असून, राज्यात सत्तापालट होण्याच्या दिशेने हालचाली होतांना दिसून येत आहे.
बुधवारी सकाळीच अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर ज्येष्ठ नेत्यांची खलबते सुरू होती. त्यामुळे अजित पवार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. अजित पवारांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या बैठकीला रायगडचे खासदार सुनील तटकरे, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांच्यासह आमदार अनिल पाटील देखील उपस्थित आहेत. अजित पवारांच्या घरी बैठक झाल्याने चर्चांना उधान आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अखेर माध्यमांसमोर येत त्यांच्या बंडखोरीबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय. तुम्हाला बाँडपेपरवर लिहून द्यावे लागेल का? असा प्रश्न अजित पवारांनी पत्रकारांसमोर उपस्थित केला. तसेच जीवात जीव असेपर्यंत पक्षासाठी काम करत राहणार असल्याचेही ते म्हणाले. मात्र त्यांनी राष्ट्रवादी काँगे्रस भाजपसोबत जाण्याच्या प्रश्नांवर कोणतेही उत्तर दिलेले नाही. याचाच अर्थ असाही निघतो की, राष्ट्रवादी काँगे्रस पक्षच भाजपला पाठिंबा देवू शकतो. मात्र राजकीय समीकरण पूर्णत्वास जात नाही, तोपर्यंत राजकारणात काहीही बोलता येत नाही. अजित पवार आजही भाजपच्या वाटेवर आहेत, अशाही चर्चा रंगल्या. त्यावर आता अजित पवारांनी स्पष्टोक्तीही दिली, पण मुळातः प्रश्न हा की, या चर्चाची सुरुवात कुठून झाली. त्याची अनेक कारणेही समोर आली आहेत. राज्यातील सोळा आमदारांचा अपात्रतेचा मुद्द्यांसह सत्तांतराच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. या प्रकरणी निकाल कधीही येऊ शकतो. निर्णय जर शिंदेंच्या शिवसेनेच्या विरोधात लागला तर राज्यातील सरकारला धक्का पोहचू नये यासाठी भाजपने प्लॅन ’बी’ची तयारी केली आहे. त्यातच जर ठाकरे गटाविरोधात निकाल गेला तर राष्ट्रवादीसमोर पर्याय काय? हा मुद्दा आहे, त्यामुळे या दोन्ही पक्षात पर्यायाने अजित पवार यांच्यात काहीतरी शिजतेय अशी शक्यता निर्माण झाली आहे. तशा चर्चाही होत आहेत.
फडणवीसांच्या ’मिशन नो पेन्डसी’च्या ट्विटने चर्चेत भर – उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ’मिशन नो पेन्डसी’ म्हणत एक फोटो ट्विट केला आहे. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे कार्यालयीन काम करताना दिसत आहे. मिशन नो पेन्डसी म्हणजेच राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. किंवा मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांनी यामुळे बळ मिळतांना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. स्वत: अजित पवार यांनी या चर्चांचे खंडण केले असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांवर सर्वोच्च न्यायालयाकडून अपात्रतेची टांगती तलवार आहे.
COMMENTS