लातूर प्रतिनिधी - बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीच्या बार्शी रोड शाखेत 3 कोटी 26 लाख रुपयांचा अपहार झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली असून, एमआयडीस
लातूर प्रतिनिधी – बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीच्या बार्शी रोड शाखेत 3 कोटी 26 लाख रुपयांचा अपहार झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली असून, एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणूक तसेच कट रचणे आणि अपहाराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले, लातूर येथील बार्शी रोड परिसरात असलेल्या बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीची शाखा आहे. या शाखेत 5 एप्रिल 2021 ते 1 नोव्हेंबर 2022 या कालावधीमध्ये सोसायटीतील कर्मचारी कल्याण श्यामराव कुलकर्णी (रा. केशवनगर, लातूर) व उमेश सीताराम राठी (प्रोप्रा. पीयुष ट्रेडर्स) या दोघांनी संगनमत केले. कल्याण कुलकर्णी याने पीयुष ट्रेडर्सच्या चालू ठेव व्यतिरिक्त सोसायटीच्या जमा रकमेतील 3 कोटी 26 लाख रुपयांची फसवणूक केली. कर्ज खात्याच्या व्यतिरिक्त संस्थेच्या बँक खात्यामधील जमा रकमेचा कल्याण कुलकर्णी याने उमेश सीताराम राठी यांच्या नावे धनादेश जारी केला व त्याने तो स्वीकारला. अशाप्रकारे या दोघांनी संगनमत करून 3 कोटी 26 लाख रुपयांचा अपहार केला, असे बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीचे वसुली अधिकारी सुरेश मधुकर वाघ (बार्शी रोड प्रकाशनगर लातूर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार सोसायटीचे कर्मचारी कल्याण श्यामराव कुलकर्णी व उमेश सीताराम राठी यांच्याविरुद्ध कलम 120 (ब), 409, 420 भादंविप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असल्याचे तपासिक अधिकारी पोलिस निरीक्षक दिवे यांनी सांगितले.
COMMENTS