मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागात येत्या 5 महिन्यांत वर्ग 3 आणि 4 च्या पदांची भरती केली जाणार असून एकूण 667 पदे भरण्यात येणार असल्याचे राज्य उत
मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागात येत्या 5 महिन्यांत वर्ग 3 आणि 4 च्या पदांची भरती केली जाणार असून एकूण 667 पदे भरण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि विधानसभा सदस्य विजय वडेट्टीवार, भास्कर जाधव, छगन भुजबळ, जयकुमार रावल यांनी याबाबतचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.
देसाई म्हणाले की, राज्य उत्पादन शुल्क विभागात प्रथमच इतकी मोठी पदभरती केली जात आहे. टीसीएस या कंपनीमार्फत ही पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याशिवाय या विभागासाठी 290 पदांच्या भरतीची मागणी करण्यात आली असून यापैकी 114 पदांची मागणी मंजूर करण्यात आली आहे. तर उर्वरित 176 पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जाणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गुन्हे नोंदविण्याच्या संख्येत 7.6 टक्क्यांवर वाढ झाली आहे. याशिवाय आरोपी पकडण्याचे प्रमाण 31.26 टक्के आहे तर मुद्देमाल जप्त करण्याचे प्रमाण 21.16 टक्के आहे. राज्यात सध्या 57 भरारी पथके कार्यरत आहे तर 12 तपासणी नाके असून येत्या काळात 13 तपासणी नाके वाढविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. देसाई म्हणाले की, चंद्रपूर जिल्ह्यातील अनधिकृत मद्य कारखान्यांबाबतची माहिती घेऊन याबाबत कारवाई करण्याचे निर्देश तत्काळ देण्यात येतील. मोह फुलांपासून चांगल्या प्रतीची वाईन करता येईल का याबाबतचा अभ्यास 4 मद्यनिर्मिती कंपनी करीत आहे. याबाबतचा सूचना त्यांच्याकडून आल्यानंतर याबाबतचा विचार करण्यात येईल. मध्यप्रदेश, गुजरात आणि गोवा येथून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अवैध मद्याची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे अवैध मद्याची वाहतूक करणार्या चालक, मालक आणि सूत्रधार यांना अटक करुन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे.
COMMENTS