पुणे : शहरातील उच्चभ्रू भागात घरफोड्या करून बिहारमधील मूळ गावी रस्त्यांची कामे, तसेच गरजूंना मदत करणार्या चोरट्याला पंजाबमधील जालंदर शहरातून अटक
पुणे : शहरातील उच्चभ्रू भागात घरफोड्या करून बिहारमधील मूळ गावी रस्त्यांची कामे, तसेच गरजूंना मदत करणार्या चोरट्याला पंजाबमधील जालंदर शहरातून अटक करण्यात आली. चोरट्याच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले असून, चोरट्याने देशातील 12 राज्यांत 70 हून अधिक घरफोड्या केल्या आहेत. महागडी मोटार, पिस्तूल आणि महागडी घड्याळे असा एक कोटी 25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
महंमद इरफान उर्फ उजाला उर्फ रॉबिनहूड (वय 30, रा. जोगिया, जि. सीतामढी, बिहार ) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली जग्वार ही आलिशान कार, पिस्तूल व महागडी घड्याळे असा सव्वा कोटी रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. रॉबिनहूडविरुद्ध 12 राज्यांमध्ये 70 हुन अधिक गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यात त्याला मदत करणार्या राजू किसान म्हात्रे (वय 29), अब्रार अहमद शेख ( वय 34, दोघे रा. धारावी, मुंबई) आणि शमीम महंमद शेख ( वय 50, रा. बिहार ) यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. रॉबिनहूड याच्याविरुद्ध उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, गोवा, तामिळनाडू या राज्यांमध्ये 27 गुन्हे दाखल आहेत. त्याचे साथीदार सुनील यादव, पुनीत यादव, राजेश यादव ( तिघे रा. गाझियाबाद, उत्तरप्रदेश) यांच्यासह तीन साथीदार तामिळनाडू पोलिसांच्या कोठडीत आहेत. तेथील पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर त्यांना तपासासाठी पुण्यात आणले जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. बाणेर रस्त्यावरील सिंध सोसायटीत एका व्यावसायिकाच्या घरी पंधरवड्यापूर्वी झालेल्या चोरीचा तपास करताना 200 सीसीटीव्ही कॅमेर्यांनी केलेल्या चित्रीकरणाची पडताळणी करण्यात आली. तपासात पोलिसांना महंमद उर्फ रॉबिनहुडची माहिती मिळाली. दिल्ली, हरयाणा परिसरात सातत्याने ठावठिकाणे बदलून तो पोलिसांना गुंगारा देत होता. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर, सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, अजय वाघमारे, गणेश माने, सहायक निरीक्षक विकास जाधव, नरेंद्र पाटील, पोलीस कर्मचारी हवालदार अस्लम अत्तार, हरीष मोरे, प्रवीण भालचिम, शैलेश सुर्वे, सारस साळवी, राजेंद्र लांडगे, विनोद महाजन, अशोक शेलार, संजय आढारी आदींनी सलग पंधरा दिवस माग काढून त्याला पंजाबमधील जालंदरमध्ये पकडले. रॉबिनहूडची पत्नी बिहारमध्ये जिल्हा परिषदेची सदस्य म्हणून निवडून आली आहे. चोर्यांमध्ये मिळवलेले पैसे तो गावी रस्त्यांच्या विकासकामात, तसेच गरजू नागरिकांना वैद्यकीय मदतीसाठी खर्च करायचा, अशी माहिती प्राथमिक तपासात निष्पन्न झाली आहे. रॉबिनहूडने मंत्री, न्यायाधीश तसेच उच्चपदस्थ अधिकार्यांच्या घरात घरफोडी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
COMMENTS