नगरमध्ये चार ठिकाणी दरोडे, लाखो रुपयांचा ऐवज लुटला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरमध्ये चार ठिकाणी दरोडे, लाखो रुपयांचा ऐवज लुटला

सहाजणांच्या टोळीने चाकूचा दाखवला धाक

अहमदनगर/प्रतिनिधी ः सहा जणांच्या टोळीने सोमवारी (26 डिसेंबर) पहाटे धारदार शस्त्रांसह नगर-कल्याण रोडवरील विद्या कॉलनी, गाडळकर मळा व आगरकर मळ्यात धुमाक

या तालुक्यामध्ये हत्ती गवताचे मळे फुलणार
संजीवनीच्या आठ अभियंत्यांची नोकरीसाठी निवड
मुख्यमंत्री सडक योजनेसाठी खर्च होणार 65 कोटी

अहमदनगर/प्रतिनिधी ः सहा जणांच्या टोळीने सोमवारी (26 डिसेंबर) पहाटे धारदार शस्त्रांसह नगर-कल्याण रोडवरील विद्या कॉलनी, गाडळकर मळा व आगरकर मळ्यात धुमाकूळ घातला. या टोळीने चाकूचा धाक दाखवत चार ठिकाणी केलेल्या धाडसी चोरीत सुमारे 13 तोळ्यांचे सोन्याचे दागिने तसेच चांदी, रोख रक्कम, बँकेची कागदपत्रे, दुचाकी असा चार लाख 30 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला. शहरात एकाचवेळी चार ठिकाणी धाडसी दरोडे पडल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे व नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी यश उमेश शेळके (वय 22, रा. विद्या कॉलनी, नगर-कल्याण रोड) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घराच्या पुढील दरवाजाचा आवाज आल्याने शेळके उठले असता त्यांच्या घराच्या दरवाजाची आतील बाजूने लावलेली कडी तोडून सहाजणांनी घरात प्रवेश केला. त्यातील दोनजणांनी घरातील तिघांना एकत्रित बसवून त्यांना चाकूचा धाक दाखवला तसेच अंजली उमेश शेळके यांच्या गळ्याला चाकू लावून सोन्याचे दागिन घेतले. तर चारजणांनी घरातील सामानाची उचकापाचक करुन घरातील रोख रक्कम चोरी केली. त्यानंतर घरातील सर्वांचे मोबाईल फोन त्यांनी घेतले व घरातून सर्व चोरटे बाहेर गेले. जाताना शेळके यांच्या घराच्या दरवाजाची बाहेरुन कडी लावून घेतली. ते गेल्यानंतर शेळके कुटुंबीयांनी आरडा ओरडा केला असता समोर राहणारे गर्जे यांनी घराची बाहेरून लावलेली कडी उघडली. त्यानंतर शेळके यांनी बाहेर येऊन झाला प्रकार त्यांना सांगितला.

या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी पहाटे घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते. सुरुवातीला सहा जणांच्या टोळक्याने शेळके यांच्या घरात प्रवेश केला. चोरट्यांनी अंजली शेळके यांच्या गळ्याला चाकू लावून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने काढून घेतले. शेळके यांच्याकडील सात हजार रुपये, दीड तोळ्याचे दागिने व मोबाईल घेवून दरोडेखोर पसार झाले. जाताना त्यांनी दरवाजाची कडी बाहेरून बंद केली. शेळके कुटूंबाने आरडाओरडा केल्यानंतर नागरिक जमा झाले. यानंतर कोतवाली पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

याच चोरट्यांनी पुढे गाडळकर मळा येथे एका ठिकाणी तर आगरकर मळ्यात दोन ठिकाणी चोरी केली. गाडळकर मळ्यातील आकाश सुभाष सूर्यवंशी (वय 29) यांच्या घरी याच सहा दरोडेखोरांनी सोन्या-चांदीचे दागिने लुटले. पुढे आगरकर मळ्यात राजू गंगाधर पडाळे व वसंत रभाजी चांदणे यांची घरे फोडून सोन्या-चांदीचे दागिने, बँकेची कागदपत्रे व दुचाकी चोरून नेली आहे. दरोडेखोरांच्या हातामध्ये धारदार शस्त्रे होती. काही ठिकाणी ते सीसीटीव्ही कॅमेर्‍यात दिसत आहे. एकाच वेळी चार ठिकाणी दरोडे पडल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस उपअधीक्षक अनिल कातकाडे, पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या चोरट्यांचा तपास सुरू केला आहे.

शेळके यांच्या घरी पडलेल्या दरोड्याच्या ठिकाणी पोलिस बारकाईने पाहणी करत असतानाच गाडळकर मळा येथे देखील चोरी झाल्याची माहिती समजली. गाडळकर मळा तसेच आगरकर मळा येथे ज्यांच्या घरी चोरी झाली आहे, ते लोक सुध्दा तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशन येथे गेले होते. तेव्हा तक्रार देण्यासाठी आलेल्यांसोबत चर्चा झाली असता चौघांच्याही घरी चोरी करणारे तेच 6 जण आहेत, असे समजले. आकाश सुभाष सूर्यवंशी (वय 29 वर्षे, रा. गाडळकर मळा, सुयोग पार्क शेजारी, नगर-कल्याण रोड, अहमदनगर), वसंत रभाजी चांदणे (वय 48 वर्षे, रा. रंगनाथ रेसीडेन्सी, आगरकर मळा, अहमदनगर) व राजू गंगाधर पडोळे (वय 45 वर्षे, रा. रंगनाथ रेसीडेन्सी, आगरकर मळा, अहमदनगर) यांच्याकडेही चोरी झाली आहे. वसंत चांदणे यांच्या घरीही चाकूचा धाक दाखवला गेला. त्यांची पत्नी सौ. मीनाक्षी व मुलगी कु. तेजश्‍वीनी यांना हॉलमध्ये बसवले. एकाने त्यांना चाकूचा धाक दाखविला व बाकीच्यांनी दागिने, चांदीचे पैंजण, रोख पैसे, एटीएम व पेटीएम कार्ड असा 65 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला. तर राजू पडोळे यांच्या घराच्या मागील दरवाजाचे कोयंडे कटावनीने तोडून आत प्रवेश केला. रुममधील झोपलेल्या संपूर्ण परिवाराला चाकूचा धाक दाखवून 1 लाख 18 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहा अनोळखी चोरट्यांविरुद्ध दरोड्याच्या गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास पोलिस उप निरीक्षक महाजन करीत आहेत.

कटावनीने कडी-कोयंडे तोडले – बंद घरांच्या दरवाजाचे कुलूप तसेच कडी-कोयंडा कटावनीच्या सहाय्याने तोडून या सहा चोरट्यांनी चोरी केली तसेच काही घरांत बळजबरीने प्रवेश करुन घरातील व्यक्तींना चाकूचा धाक दाखवून त्यांचा ऐवज लुटला. चार घरातील 3 लाख 84 हजार रुपये किमतीचे 12 तोळे 9 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 5 हजार 500 रुपये किमतीचे 110 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, 16 हजार रुपये रोख रक्कम, 25 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन आणि एसबी आय बँक तसेच आयसीआयसीआय बँकेचे एटीएम व पेटीएम कार्ड असा एकूण 4 लाख 30 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज बळजबरीने चोरुन  नेला. या घटना दि. 26 डिसेंबर पहाटे 1 ते 3 वाजण्याच्या दरम्यान प्लॉट नं.148, विद्या कॉलनी, नगर- कल्याण रोड, अहमदनगर, गाडळकर मळ्यातील सुयोग पार्क, नगर-कल्याण रोड अ.नगर व रंगनाथ रेसीडेन्सी आगरकर मळा, अ.नगर येथे घडल्या. चोरट्यांनी नेलेले मोबाईन फोन घराजवळ रस्त्यावर मिळून आले. चोरी करणारे अंदाजे 25 ते 30 वर्षे वयोगटातील असून त्या सर्वांनी फुल बाह्यांचे शर्ट व फुल पँट परिधान केलेल्या होत्या. यापैकी एकाचे पाय फेगडे होते.

नगर-कल्याण रोडवरील चार ठिकाणी सोमवारी पहाटे दरोडे पडले. घरातील व्यक्तींना चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आले. पोलिसांनी या घरांमध्ये पाहणी करून पंचनामे केले.

COMMENTS